त्रिवार मुजरा!

त्रिवार मुजरा!
Published on
Updated on

सामाजिक विषमतेच्या घनदाट अंधकारात ज्यांनी समतेची मशाल पेटवली, प्रज्वलित ठेवली, त्या लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची आज स्मृती शताब्दी. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही फे्रंच राज्यक्रांतीची सर्वसामान्य जनतेला मिळालेली देणगी आणि मानवतेची सनद. या मानवतेच्या सनदेची खर्‍या अर्थाने द्वाही फिरवली, ती या लोकराजाने! सव्वाशे वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात जी सामाजिक क्रांती घडवून आणली, त्यावेळची सामाजिक स्थिती विलक्षण बिकट होती.

समाज अज्ञानाच्या खाईत बुडाला होता आणि समाजाचा एक भाग माणुसकीला पारखा होऊन जातिभेदाच्या दगडी पायाखाली चिरडला जात होता. 'सामाजिक समता' हा शब्दही कोणाच्या कानावर नव्हता, तेव्हा अशा प्रतिकूल परिस्थितीत शाहूरायांनी सामाजिक समतेचे शिवधनुष्य उचलले. त्याचबरोबर या रयतेच्या राजाने आपल्या संस्थानात शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या अंगणात पोहोचविली. कृषी उद्योगाला चालना दिली. आपल्या संस्थानात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि त्यातून या भागाच्या विकासाचा भक्कम आणि मजबूत पाया घातला. आज जो कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झालेला दिसतो, त्याचे एकमेव शिल्पकार राजर्षी शाहू छत्रपती महाराज आहेत. तत्कालीन ब्रिटिश पारतंत्र्यात सहाशेवर संस्थानिक ख्याली-खुशालीत, रंगढंगात आकंठ बुडालेले असताना, या महामानवाने केवळ रयतेच्या हिताचीच चिंता केली आणि म्हणूनच 'राजर्षी' हा त्यांचा बहुमान सार्थ ठरला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज ही आमची आराध्य दैवते. शिव-शाहू विचार आणि महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यांचा जागर आम्ही प्रथमपासूनच करीत आलो आहोत. आम्ही 'पुढारी'ची सूत्रे हाती घेतली, त्याला आता पन्नास वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या काळात या थोर विभूतींच्या कार्याची पताका आम्ही लेखणी, वाणी आणि कृतीतून पुढे नेली आहे. 'पुढारी'चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव तथा ती. आबा यांनीच आम्हाला हे बाळकडू दिले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी लढ्यातील त्यांचे उजवे हात, सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू नेकनामदार भास्करराव जाधव यांचा निकट सहवास आबांना लाभलेला होता. त्यांच्या तालमीत आबांचे विचार डोळस झाले. प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर यांच्यासमवेत मुंबईत पत्रकारिता करीत असताना हे विचार प्रगल्भ झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काळाराम मंदिर सत्याग्रहासह अनेक सामाजिक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 5 सप्टेंबर 1943 रोजी आबांच्या अध्यक्षतेखाली डॉ. आंबेडकर यांचा मुंबई चौपाटीवर भव्य सत्कार झाला आहे. या जाज्वल्य विचारधनाचा समृद्ध वारसा आम्हाला लाभला आणि आम्ही तो जीवामोलाने जपत, प्रत्यक्ष कृतीत आणत पुढे चालविला.

1974 साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यारोहणाची त्रिशताब्दी आणि राजर्षी शाहू महाराज यांची जन्मशताब्दी असा मणि-कांचन योग जमून आला. हे दोन्ही उत्सव भव्योदात्त पद्धतीने लोकोत्सव म्हणून साजरे करावयाचे, असा आम्ही निर्धार केला. दोन्ही उत्सवांसाठी पुढाकार घेत, आम्ही महापालिकेत सर्वपक्षीय राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांची व्यापक बैठक घेतली. उत्सवासाठी समिती नेमण्यात आली. तिच्या अध्यक्षपदी आमची एकमताने निवड झाली. तथापि, आम्ही तत्कालीन जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी, असा सयुक्तिक आग्रह धरला. तो मान्य झाला. मात्र, उत्सवाची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारावी, असा एकमुखी आग्रह झाला. तो आम्ही शिरोधार्य मानून झपाट्याने रात्रंदिवस कामाला लागलो. छत्रपती शिवरायांचा राज्यारोहण त्रिशताब्दी सोहळा देवोदुर्लभ उत्साहात साजरा झाला.

हजारोंच्या सहभागाने भव्य मिरवणूक निघाली. त्यापाठोपाठ राजर्षी शाहू जन्मशताब्दी सोहळा अभूतपूर्व जल्लोषात साजरा झाला. शहर/जिल्ह्यातील शेकडो तालमी आणि मंडळांनी चित्ररथांतून शाहू विचार मांडला होता, तर विविध पथकांनी मर्दानी खेळांसह आपल्या कलांचा आविष्कार घडविला होता. सारा जिल्हा शाहूमय झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासह वसंतरावदादा पाटील, शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले अशा पुढे मुख्यमंत्री झालेल्या मंत्र्यांसह सारे मंत्रिमंडळ या सोहळ्याला उपस्थित होते. याचवेळी आम्ही वसंतराव नाईक यांच्याकडे राजर्षींची जयंती सरकारी पातळीवर साजरी व्हावी, असा पाठपुरावा केला आणि त्याला यश आले. त्याचप्रमाणे आता शाहू जयंती सरकारी पातळीवर साजरी होत आहे. तेव्हापासून आजतागायत विविध उपक्रमांतून आम्ही राजर्षी शाहूरायांचा पुरोगामी विचार कृतीत आणला आहे.

1894 साली राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतरच्या अवघ्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी हिमालयाएवढे कार्य उभे केले. तत्कालीन प्रशासन व्यवस्थेत त्यांनी दुर्बल घटकांसाठी नोकर्‍यांमध्ये 50 टक्के आरक्षण ठेवले. हा निर्णय काळाच्या कितीतरी पुढचा होता. या निर्णयामुळे वंचित वर्गाला दिलासा मिळाला. कर्तृत्वाची संधी मिळाली आणि त्यातून पुढे कर्तबगार अधिकारी उदयाला आले. बहुजन वर्गाला नवे बळ प्राप्त झाले. या निर्णयातून राजर्षींचे क्रांतिदर्शित्व स्पष्ट होते. 1902 साली राजर्षींनी हा निर्णय घेतला आणि त्यातून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेत मागासवर्गीयांसाठी नोकर्‍यांमध्ये राखीव जागा ठेवल्या.

शाहूरायांचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा. तत्कालीन बहुजन तरुण हा बहुतांशी अशिक्षित होता. मागासवर्गीयांच्या अनेक पिढ्यांना पाटी-पेन्सिल माहीत नव्हती. अशा अज्ञानी, निरक्षर लोकांच्या घरात राजर्षींनी ज्ञानगंगा पोहोचवली. लोक साक्षर होऊ लागले. आपल्यावरील अन्यायाची त्यांना जाणीव होऊ लागली. शाहूरायांनी त्यांना नवी ओळख दिली. ज्ञानाची कवाडे उघडल्याने समाजात जागृती निर्माण झाली. राजर्षी शाहू महाराजांचे हे कार्य लोकोत्तर स्वरूपाचे म्हटले पाहिजे. गंगाराम कांबळे यांना त्यांनी हॉटेल उभे करून दिले आणि स्वतः त्या हॉटेलात चहा प्यायचे. सामाजिक समतेचा हा कृतिशील क्रांतिकारक क्षण होता. बोलघेवडे सुधारक भरपूर असतात; पण राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखे कृतीवीर क्रांतिकारक अपवादानेच आढळतात. 'भेदाभेद भ्रम अमंगळ' ही उक्ती या महामानवाने वास्तवात आणली. तत्कालीन स्त्रीवर्गाची स्थिती कमालीची दयनीय होती. त्यांचा दर्जा दुय्यम होता. 'स्त्रीमुक्ती' हा शब्द अस्तित्वात यायचा होता.

संमती वयाचा मुद्दा तेव्हा देशात गाजत असताना राजर्षींनी आपल्या संस्थानात स्त्रीचे विवाहाचे वय कायद्याने 18 वर्षे ठरवले. स्त्रियांच्या होणार्‍या छळाविरोधात त्यांनी कायदा केला. 'महिला सक्षमीकरण' असा शब्दही माहीत नव्हता, त्या काळात राजर्षींनी दूरदृष्टीने हा निर्णय घेतला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील पायाभूत सोयींची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. राधानगरी धरणामुळे हजारो एकर जमीन पाण्याखाली आली. बळीराजा सुखावला. रेल्वे मार्ग संस्थानच्या खर्चाने उभा करून त्यांनी व्यापार, उद्योग, दळणवळणाला चालना दिली. कोल्हापूर देशाच्या नकाशावर आणले. शाहू मिलच्या भोंग्याने कोल्हापूरच्या उद्योगाची पहाट झाली.

या कला-क्रीडाप्रेमी राजाने कुस्ती, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा अनेक कला-क्रीडा प्रकारांना उत्तेजन दिले. कोल्हापूर 'कुस्ती पंढरी' म्हणून ओळखले जाते, ते शाहूरायांमुळे! वेठबिगारीची जुलमी प्रथा मोडून काढणारा हा राजा खर्‍या अर्थाने रयतेचा राजा होता. राजर्षी शाहू महाराज यांची अशी महती किती गावी? सध्याच्या अस्वस्थ काळात त्यांचे विचार हेच समाजभान जपायला उपयुक्त ठरणार आहेत. आजही हे विचार तेवढेच अनुकरणीय आहेत. स्मृती शताब्दीनिमित्त या थोर महामानवाला आमचा त्रिवार मुजरा!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news