त्रिपुरातील निवडणुकांचा धडा

त्रिपुरातील निवडणुकांचा धडा
Published on
Updated on

त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे ( tripura election ) निकाल पाहिले असता भाजपविरोधी पक्षांनी घ्यावयाचा धडा असा की, वास्तवातील मुद्दे प्रचारात आणले, तरच भाजपवर विजय मिळविता येईल. धार्मिक ध्रुवीकरणाचा किंवा फॅसिझमचा आरोप करणे विरोधी पक्षांसाठीच अधिक घातक ठरू शकते.

त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ( tripura election ) भाजपने मिळविलेल्या जबरदस्त विजयाने विरोधी पक्षांसह संपूर्ण देशाला आश्चर्यचकित केले. पश्चिम बंगालमध्ये प्रचंड विजय मिळविल्यानंतर ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसने ज्या दिवशी त्रिपुरा हे आपल्या राजकारणाचे दुसरे महत्त्वाचे केंद्र बनविले होते आणि अत्यंत आक्रमकतेने तेथे सदस्य नोंदणी, तसेच प्रचार मोहिमा राबविल्या होत्या. त्यातून भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहील, असे वाटले होते. निवडणुकीच्या निकालांनी हे कयास चुकीचे ठरविले. राजधानी अगरताळा पालिकेसह एकंदर 24 नगरपालिकांसाठी निवडणुका झाल्या. या पालिकांच्या एकूण 334 वॉर्डपैकी 329 वॉर्डमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले. एखाद्या पक्षासाठी याहून मोठा विजय असूच शकत नाही. तृणमूल काँग्रेसला संपूर्ण निवडणुकीत केवळ एक जागा जिंकता आली.

तृणमूल काँग्रेस त्रिपुरात एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विकसित झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला विरोधी बाकांवरून दूर करून त्रिपुरात दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून पक्षाने स्थान मिळविले, तरीसुद्धा भाजप आणि तृणमूल या दोहोंमध्ये एवढे अंतर आहे की, 2023 च्या विधानसभा निवडणुका येईपर्यंत ते अंतर भरून निघेल, अशी कल्पना करणे व्यावहारिक वाटत नाही. तथापि, त्रिपुरात पश्चिम बंगालची पुनरावृत्ती होणार, असेच वातावरण निर्माण केले होते; पण पश्चिम बंगाल म्हणजे संपूर्ण भारत नव्हे. विचार करण्याजोगी गोष्ट अशी की, जर त्रिपुरासारखे बंगालच्या शेजारील राज्य बंगालच्या राजकारणाचा हिस्सा बनू शकले नाही, तर संपूर्ण देश कसा बनणार?

तसे पाहायला गेल्यास त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल हा भाजपविरोधी राजकीय आणि बिगरराजकीय सर्व प्रकारच्या शक्तींसाठी एक धडाच आहे. पश्चिम बंगालचे राजकीय वातावरण आणि सामाजिक-धार्मिक समीकरणे वेगळी आहेत. सुमारे 30 टक्के मुस्लीम मतदार आणि विचारांनी डावे असणारे मतदार मोठ्या संख्येने असताना भाजपसाठी बंगालमध्ये पूर्ण विजय मिळविणे ही सोपी गोष्ट नाही. तिथे भाजपला मुस्लीमविरोधी धार्मिक फॅसिस्टवादी म्हटल्याने त्याचा परिणाम मतदारांवर होईल. त्यातील एक वर्ग आक्रमक होऊन भाजपविरोधात निवडणुकीवेळी कामही करेल. परंतु, प्रत्येक ठिकाणी असेच घडू शकणार नाही.

भारतात अशी अनेक राज्ये आहेत, जिथे भाजपच्या विरोधात केलेला हाच प्रचार वस्तुतः विरोधकांच्याच विरोधात जातो. एखादा समूह भाजपच्या विरोधात आहे, असे सांगायला जावे, तर दुसरा मोठा समूह भाजपच्या बाजूने उभा राहतो. विरोधक जी वातावरणनिर्मिती करतात, त्याहून वास्तव बरेच दूर असते. भारताच्या विविध भागांत हेच पाहावयास मिळाले. जे वास्तव नाही, ते वास्तव म्हणून दाखविले जाते आणि अतिवादी प्रतिमा तयार करून ती प्रचारित केली जाते. असे केल्यास ज्यांना वास्तव माहीत नाही किंवा जे मानसिकतेनेच भाजपविरोधी आहेत, तेवढ्या लोकांवरच त्याचा परिणाम होईल. सामान्य जनता, विशेषतः स्थानिक लोकांवर त्याचा बिलकूल परिणाम होणार नाही. त्रिपुरात नेमके हेच घडले आहे. हिंदूंच्या मोर्चाने मुस्लिमांवर आणि मशिदींवर हल्ले केले, तोडफोड केली असा प्रचार केला गेला आणि हे वास्तव नसल्याचे माध्यमांनी समोर आणले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा असल्याचे निष्पन्न झाले. या विरोधात स्थानिक जनतेने प्रतिक्रिया दिली आणि तीच मतदानाच्या रूपाने समोर आली. त्यातून धडा घ्यायचा की नाही, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. विरोधकांनी त्यांच्या रणनीतीमध्ये बदल करायला हवा. वास्तवाच्या विरोधात जाऊन केवळ हवेतील वातावरणनिर्मिती निवडणुका जिंकण्यासाठी पोषक ठरते, हाही गैरसमजच असल्याचे या निवडणुकांनी दाखवून दिले आहे. 112 ठिकाणी भाजपच्या उमेदवारांची निवड बिनविरोध झाली. याचाच अर्थ असा की, भाजपला ओहोटी लागल्याची वातावरणनिर्मिती विरोधकांनी केली असली, तरी वास्तव तसे नाही.

– विनायक सरदेसाई

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news