एडिनबर्ग : काही मुलांना असा आजार जडतो की, त्यावर आजच्या आधुनिक काळात उपचारही उपलब्ध नसतात. असाच एक दुर्मीळ आजार स्कॉटलंडमधील एका मुलाला जडला आहे. एडिनबर्ग येथील रहिवासी असलेल्या जुली नामक महिलेने आपल्या मुलाच्या आजारपणाची दुर्दैवी कथाच सोशल मीडियावर शेअर केली आहे.
जुलीने दिलेल्या माहितीनुसार तिचा मुलगा जॉश हा 'सिक्लिकल वोमिटिंग सिंड्रोम'ने त्रस्त बनला आहे. हा एक असा आजार आहे की, त्यात रुग्ण दर पाच मिनिटाला उलटी करू लागतो. या आजाराने जॉश हा त्रस्त बनला आहे. तो आपली आई जुलीला सतत प्रश्न विचारतो की, अन्य मुले नॉर्मल आहेत, मग माझीच स्थिती अशी का? बिचार्या आईकडे या प्रश्नाचे उत्तरच नसते.
अत्यंत दुर्मीळ 'सिक्लिकल वोमिटिंग सिंड्रोम'मुळे जॉश याला प्रत्येक सहा आठवड्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागते. तेथे त्याला ताकद येण्याची व अन्य औषधे व इंजेक्शन द्यावी लागतात. कधी कधी जॉशच्या उलटीतून रक्तही पडते. यामुळे त्याला बोलतानाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
जॉशला झालेल्या सिंड्रोमवर सध्या कोठेच उपचार उपलब्ध झालेला नाही. सुरुवातीला जुलीला आपल्या मुलाला नेमके काय झाले आहे, याची कल्पना नव्हती. मात्र, ज्यावेळी तिने उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, त्यावेळी जॉशला अत्यंत दुर्मीळ व उपचार उपलब्ध नसलेला सिंड्रोम जडल्याचे स्पष्ट झाले. सिंड्रोमने त्रस्त जॉशला धड बोलताही येत नाही. यामुळे तो लिहून सांगत असतो. यामुळे त्याचे जीवन अधिक खडतर बनत आहे.