तेलनाडे टोळीचे फायनान्सर अन् आश्रयदातेही ‘रडार’वर

तेलनाडे टोळीचे फायनान्सर अन् आश्रयदातेही ‘रडार’वर

कोल्हापूर; दिलीप भिसे : राजकीय आश्रय आणि काळ्या धंद्यातील विनासायास कमाईने मालामाल झालेल्या कुख्यात 'एसटी सरकार गँग'च्या म्होरक्यासह त्याच्या साथीदारांची दहशत काय असते, हे इचलकरंजीसह परिसरातील अनेक घटकांनी अनुभवले आहेे. मे 2019 पासून फरार असलेल्या तेलनाडे बंधूंचे स्थानिक कनेक्शन सर्वश्रुत होते. फरार काळात पैसा पुरवणारे, आश्रय देणार्‍यांची उघड चर्चा होती. मात्र, स्थानिक तपास यंत्रणांनी कानाडोळा करून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टोळीला अभय दिले. आता म्होरक्या गजाआड झाल्याने फायनान्सरसह आश्रयदातेही 'रडार' वर येणार का? हा कळीचा मुद्दा आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साथीदारांच्या कारनाम्यांचे उदात्तीकरण करून एव्हाना राजकीय वर्चस्व आणि स्वत:ची दहशत वाढविण्यासाठी तेलनाडे बंधूंनी अनेकांच्या आयुष्याची वाताहत केली आहे. शहरासह परिसरात दहशत माजविणार्‍या एसटी सरकार गँगमधील साथीदारांवर खून, खुनाचा प्रयत्न, जीवघेण्या हल्ल्यांसह अत्याचार, मटका, जुगाराचे अड्डे चालवल्याप्रकरणी गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. दहशत आणि संपत्तीच्या बळावर आमदारकीची स्वप्ने रंगविणार्‍या तेलनाडे बंधूंच्या कारनाम्यांना तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कायद्याचा चाप लावला. 'मोका' अंतर्गत कारवाईचा बडगा उगारत खाकी वर्दीचा धाक दाखवला. मात्र, चिरीमिरीला सोकावलेल्या झारीतील काही शुक्राचार्यांनी टोळीला हातभार लावण्याचा उद्योग केल्याचे सर्वश्रुत आहे.

पैशाच्या थैल्या पुरविणार्‍यांनाही आरोपी करा

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी संधीसाधू आणि क्षणिक मोहाला सोकावलेल्यांच्या मुखवट्याचा पर्दाफाश करावा, अशी अपेक्षा वस्त्रोद्योगनगरीतून व्यक्त होऊ लागली आहे. फरार काळात तेलनाडे बंधूंना पैशाच्या थैल्या आणि त्यांना हवे ते नको सुविधा पुरविणार्‍यांचा छडा लावून संबंधितांनाही सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आश्रयदात्यांचा पर्दाफाश करणार : बलकवडे

तेलनाडे टोळीला फरार काळात आश्रय आणि आर्थिक पुरवठा करणार्‍यांचा निश्चित पर्दाफाश करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. म्होरक्या संजय तेलनाडे याचा छडा लावून त्याच्या अटकेसाठी सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले आणि पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news