हैदराबाद : कोणतेही वाहन चालवण्यासाठी चालक परवाना असणे आवश्यक असते. त्यासाठी भारत सरकारने काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. त्यानुसार देशभरात ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात असते. आता देशात प्रथमच तीन फूट उंचीच्या एका व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे.
या माणसाचे नाव आहे गट्टीपल्ली शिवलाल. ते ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणारे देशातील पहिलेच सर्वात कमी उंचीचे व्यक्ती ठरले आहेत. ते तेलंगणामधील हैदराबादजवळच असलेल्या कुकटपल्ली येथील रहिवासी आहेत. 42 वर्षांच्या शिवलाल यांना सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमधून प्रवास करीत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे. कालांतराने त्यांनी स्वतःच वाहन चालवणे शिकण्याचे ठरवले. अर्थातच त्यांना या मार्गातही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा त्यांनी अमेरिकेतील एका बुटक्या व्यक्तीचा गाडी चालवत असतानाचा व्हिडीओ पाहिला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला.
देशात त्यांनी अनेक ठिकाणी ड्रायव्हिंग शिकण्यासाठी अर्ज करून पाहिला, मात्र सर्वत्र त्यांच्या कमी उंचीमुळे नकारघंटाच ऐकावी लागली! अखेर त्यांनी गाडी चालवण्यासाठी थेट अमेरिकाच गाठण्याचे ठरवले. तिथे गाडी चालवणे शिकल्यानंतर त्यांनी हैदराबादमध्ये कस्टम कारचे डिझाईन करणार्या एका व्यक्तीकडून कमी उंचीच्या व्यक्तीसाठी अनुकूल असे काही बदल कारमध्ये करून घेतले.
या कारमधील पेडल्स नेहमीपेक्षा अधिक उंचीवर होती आणि शिवलाल यांचे पाय तिथे सहज पोहोचत होते. आता ते आपल्या पत्नीला कार चालवणे शिकवत असून बुटक्या लोकांसाठी शहरात एक विशेष ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याचेही त्यांनी ठरवले आहे. त्यांच्या नावाची नोंद आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् आणि तेलुगू बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली आहे.