पुणे ; पुढारी वृत्तसेवा : आज येईल, उद्या येईल, असे सर्वांचे अंदाज चुकवत अखेर मान्सून केरळमध्ये नियोजित तारखेच्या तीन दिवस आधीच दाखल झाला. तशी अधिकृत घोषणा रविवारी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केली. केरळसह दक्षिण अरबी समुद्रातही तो आल्याने पुढे मध्य अरबी समुद्राकडे वाटचाल सुरू झाली. हाच वेग कायम राहिला तर तळकोकणात मान्सून 2 ते 5 जूनदरम्यान कधीही दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
अंदाजाप्रमाणे, मान्सून केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होत असतो. त्याची ही नियोजित तारीख असते. मात्र, गेल्या दहा वर्षांत तो केवळ दोनवेळाच नियोजित वेळेत केरळमध्ये आला आहे. पाचवेळा तो नियोजित वेळेनंतर, तर चारवेळा नियोजित वेळेआधी दाखल झाला. यंदा तो तीन दिवस आधीच म्हणजे 1 जूनऐवजी 29 मे रोजी केरळात आला. केरळपाठोपाठ दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाल्याने त्याचा प्रवास आता मध्य अरबी समुद्र व पुढे वेगाने तळकोकणकडे सुरू झाल्याने यंदा राज्यात मान्सून 2 ते 5 जूनदरम्यान येऊ शकतो.
वार्यांचा वेग वाढला
मान्सून अरबी समुद्रात दाखल होताच वार्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी वेगाने वाढला असून केरळ, तमिळनाडू, आंध— प्रदेश, कर्नाटक, बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार या भागांत अतिवृष्टी सुरू झाली आहे. ती आगामी 24 तास सुरू राहील इतके ढग त्या भागात दाटून आले आहेत. 16 मे रोजी अंदमानात आलेल्या मान्सूनने केरळात पोहचण्यास 13 दिवस लावले. कारण, त्याचा प्रवास आठ दिवस मंदावला होता.