तळातून गाळाकडे…

तळातून गाळाकडे…

'यशाला अनेक बाप असतात आणि अपयश मात्र नेहमी अनाथ असते', या मराठीतील म्हणीची प्रचिती काँग्रेस पक्षाबाबत राष्ट्रीय पातळीवर सध्या येत आहे. काळानुरूप या म्हणीमध्ये सुधारणा करून अपयश अनाथ असते याऐवजी अपयशाला अनेक सल्लागार असतात, असे म्हणावे लागेल. कारण, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय विश्लेषक, विरोधी नेत्यांपासून ते पक्षातीलच अनेक नेत्यांकडून काँग्रेस नेतृत्वाला रोज नवनवे सल्ले दिले जात आहेत. काँग्रेस पक्षाने नेतृत्वाबाबत काय करावे, आघाडी करण्याबाबत काय भूमिका घ्यावी, भाजपविरोधात कशा प्रकारे लढावे अशा प्रकारचे सल्ले रोज दिले जात आहेत.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाध्यक्षांना पत्र लिहिलेल्या जी-23 गटाच्या नेत्यांपैकी अनेकांनी निकालानंतर नाराजीचे सूर लावले होते. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही असे सूर उमटले आणि अखेरीस या असंतुष्ट नेत्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन पक्षनेतृत्वाविरोधातील नाराजी जाहीरपणे उघड केली. गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला जी-23 गटातील बहुतेक नेते उपस्थित होते, शिवाय शशी थरूर यांच्यासारखे नवे नेतेही त्यात सामील झाल्याचे दिसले.

बैठकीनंतर या नेत्यांनी एका निवेदनाद्वारे काँग्रेसमध्ये सर्व स्तरांवर सामूहिक, सर्वसमावेशक नेतृत्वाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस पक्ष मजबूत करायला पाहिजे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक आश्वासक पर्याय उभा करण्यासाठी समान विचारधारेच्या पक्षांशी काँग्रेसने चर्चा करायला हवी, अशीही सूचना करण्यात आली. यापुढेही या गटाच्या बैठका होणार असल्याने असंतुष्ट नेते बंडखोरीच्या तयारीत असल्याचेच दिसून येते. अर्थात, कपिल सिब्बल यांनी ज्या रितीने बंडखोर भूमिका घेतली आहे आणि पक्षातील सोनिया गांधी निष्ठावंतांनी ज्याप्रकारे त्यांचा समाचार घेतला, ते पाहता काँग्रेसमधील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमधील संबंध सुधारण्याच्या पलीकडे गेले आहेत.

असंतुष्ट नेत्यांना काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात यापुढे सन्मानाचे स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, यापैकी काही नेत्यांची पावले नजीकच्या काळात भाजपच्या दिशेने पडल्यास आश्चर्य वाटायला नको. भाजपचा मुकाबला करणे काँग्रेससाठी दिवसेंदिवस कठीण बनत चालले असताना सर्व काँग्रेसजनांनी एकत्रितपणे मुकाबला करण्याऐवजी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेच परस्परांशी संघर्ष करीत बसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. काँग्रेसची स्थिती आणि काँग्रेससाठीची राजकीय परिस्थितीही खस्ताहाल असताना नेतृत्वाकडून काही सकारात्मक पावले पडण्याची अपेक्षा गैर ठरत नाही. परंतु, गेल्या साडेसात वर्षांत काँग्रेसची प्रचंड घसरण होऊन पक्ष राष्ट्रीय राजकारणात संदर्भहीन बनण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. अशा स्थितीत नेतृत्वाचा अहंकार किंचितही कमी झालेला नाही आणि हुजरेगिरी करणार्‍यांच्या लाचारीतही फरक पडलेला नाही.

पराभवामुळे खचलेल्या नेतृत्वाबाबत सहानुभूती बाळगून एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी सहकार्याची भूमिका घेण्याची जबाबदारी अशावेळी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर येते. परंतु, हे नेते जुने हिशेब चुकते करण्याच्या उद्देशाने परिस्थितीचा फायदा उठवत नेतृत्वाची कोंडी करताना दिसतात. त्यामुळे आधीच तळात असलेला पक्ष गाळात चालला आहे.

कोणत्याही पक्षाचे नेते विजयानंतर कसे वागतात, याच्याइतकेच ते पराभवानंतर कसे वागतात, हेही महत्त्वाचे असते. देशाच्या स्वातंत्र्यापासून दीर्घकाळ देशाची सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अशा स्थितीत अधिक प्रगल्भतेने वागायला हवे होते; मात्र ही प्रगल्भता ना या नेत्यांना दाखवता आली, ना नेतृत्वाला. त्यामुळे असंतुष्ट नेते आणि पक्षनेतृत्व यांच्यात जी दरी निर्माण झाली ती दिवसेंदिवस वाढतच गेली. पाच राज्यांतील पराभवामागे पक्षातील ही बेदिलीही कारणीभूत असल्याचे ठामपणे म्हणता येते. कारण, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात जिथे पंतप्रधानांसह भाजपचे दोन डझन राष्ट्रीय नेते राज्य पिंजून काढत होते, तिथे प्रियांका गांधी एकट्याच मैदानात दिसत होत्या. या ठिकाणी देशभरातील काँग्रेस नेत्यांनी ताकद लावली असती, तर जो दारुण पराभव झाला तेवढा तो झाला नसता आणि पक्षाला समाधानकारक स्थितीत नेता आले असते. परंतु, तसे काही घडले नाही.

इतर नेत्यांना विश्वासात घेण्याबाबत नेतृत्व कमी पडले की नेत्यांनीच निवडणुकीकडे पाठ फिरवली, हे समजायला साधन नाही. काँग्रेस कार्यकारिणी बैठकीनंतर कपिल सिब्बल यांनी एका मुलाखतीद्वारे, गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडावे, अशी जाहीर मागणी करून बॉम्ब टाकला. गांधी कुटुंबानेच नियुक्त केलेले कार्यकारिणीतले लोक त्यांना नेतृत्व सोडण्यासाठी कधीच सांगणार नाहीत, असे सिब्बल यांनी सुनावलेे. मला 'सब की काँग्रेस' असा पक्ष हवाय, तर काहींना 'घर की काँग्रेस' असा पक्ष हवा असल्याचे सांगून त्यांनी घराणेशाहीवरच आसूड ओढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत सातत्याने घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला. कपिल सिब्बल यांनी तोच सूर पकडला असल्याचे त्यांच्या या वक्तव्यांवरून दिसून येते. सिब्बल यांच्या मुलाखतीनंतर काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. पक्षाचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी असंतुष्ट नेते पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. कपिल सिब्बल हे चांगले वकील असतील; परंतु ते चांगले नेते नाहीत. काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी ते कुठल्याही गावात गेले नसल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनीही कपिल सिब्बल यांचा समाचार घेताना गांधी कुटुंबाच्या जीवावर सत्ता उपभोगलेल्या नेत्यांनाच आता गांधी कुटुंब नेतृत्वास योग्य वाटत नसल्याची टीका केली आहे. काँग्रेसचे नेते आपसात लढत राहिले, तर पक्ष म्हणून ते भाजपविरोधात कधी लढणार, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news