डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी

डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी

– डॉ. अनिल मडके  : 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त…

गेली दोन-अडीच वर्षे कोरोनामुळे आपले जगणेच विस्कळीत झाले. या काळात समाजातील ज्या ज्या घटकांनी अतीव कष्ट घेतले, आपला जीव धोक्यात घातला, त्यात डॉक्टरांचा उल्लेख अग्रक्रमाने करायला हवा. कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला. अनेकजण कोरोनाबाधित झाले. त्यांचे स्मरण 'डॉक्टर्स डे'च्या निमित्ताने करणे औचित्यपूर्ण ठरले.

लॉकडाऊन झाले तेव्हा 'कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नका' असा सर्वांना आदेश होता; पण त्याचवेळी डॉक्टरांना 'घरात थांबू नका, कोरोना रुग्णांची सेवा करा' असा आदेश होता. कोरोनाच्या लाटेत, जिथे कोरोना रुग्णांचे नातेवाईक रुग्णांच्या जवळ यायला घाबरायचे, तेव्हा त्यांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर आणि त्यांची टीम जीवावर उदार होऊन काम करत होती. या काळात हॉस्पिटलमधून घरी गेल्यानंतर कुटुंबीयांमध्ये मिसळण्याचीसुद्धा डॉक्टरांना मुभा नसे. कारण, चुकून कोरोनाची लागण झाली, तर तो कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याची भीती असे. केवळ कोरोना काळातच नव्हे, तर कधीही एखादा रुग्ण जेव्हा आपल्या डॉक्टरकडे जातो, तेव्हा ते डॉक्टर दिवस असो वा रात्र आपल्या रुग्णांसाठी धडपडत असतात.

समाजात शिक्षक, वकील, इंजिनिअर, सुतार, लोहार, शिंपी असे कितीतरी व्यावसायिक असतात. यापैकी प्रत्येकाशी आपला संबंध येतोच असे नाही. पण 'डॉक्टर ' हा घटक असा आहे, ज्यांच्याशी प्रत्येक व्यक्‍तीचा आयुष्यात कधी ना कधी संबंध येतोच. डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काही लपवू नये म्हणतात, हे खरेच आहे. कारण, या दोन व्यक्‍ती आपल्याला अडचणीतून सोडवत असतात.
डॉक्टरी पेशा हा इतर व्यवसायांसारखा नाही. कारण, जेव्हा आपण बिघडलेले आरोग्य घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा सारी मदार त्यांच्यावरच असते. आरोग्य ही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि म्हणूनच आपला डॉक्टर हा ज्ञान, अनुभव, शहाणपण, सचोटी, कर्तृत्व, सहानुभूती, दयाभाव, आपुलकी, प्रामाणिकपणा, वक्‍तशीरपणा अशा सर्व गुणांनी युक्‍त असावा, असे प्रत्येकाला वाटते.

अशा या पेशाची दखल समाजातील प्रत्येक घटकाने घ्यावी, यासाठी आजचा 'एक जुलै' हा दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर दिवस' म्हणून 1991 पासून साजरा केला जातो. 'डॉक्टर्स डे'चा संबंध एका माजी मुख्यमंत्र्यांशी आहे. पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री दिवंगत 'विधांत चंद्र रॉय' यांचा जन्मदिवस आणि निर्वाण दिवसही 1 जुलै हा होता. ते एक उत्तम डॉक्टर आणि राजकारणी होते.

आज 'महाराष्ट्र कृषी दिन'देखील आहे. हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक आणि रोजगार हमी योजनेचे प्रणेते मानले जातात. शेतकरी हा आपला पोशिंदा आहे; पण दुर्दैवाने तो आज सुखी – समाधानी दिसत नाही. तो दुर्लक्षित आहे. बेभरवशाचा निसर्ग, महागाई, आर्थिक ओढाताण, कर्ज, आत्महत्या आणि विवाह या समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस, पण दुर्दैवाने याकडे लक्ष द्यायला कुणालाच सवड नाही. 1 जुलै हा चार्टर्ड अकाऊंटंटस् दिवस म्हणजे 'सीए डे'सुद्धा आहे.

1 जुलै 1949 या दिवशी संसदेच्या कायद्यानुसार 'भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया'ची (खउ-ख) स्थापना झाली. सनदी लेखापालांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस. मोदी सरकारने 1 जुलै रोजीच देशभरात जीएसटी लागू केला होता. 1 जुलै हा पोस्ट कर्मचारी सन्मान दिवससुद्धा आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जमान्यात पत्ररूपातील अक्षर खजिना सांभाळायला जे हातभार (खरे तर फिरून पायभार) लावतात, त्या पोस्ट कर्मचार्‍यांच्या सन्मानासाठी हा दिवस.

पारदर्शकता, विश्‍वास, सचोटी, समाजाप्रती आणि कामाप्रती निष्ठा, कर्तव्यदक्षता, विश्‍वास हे गुण केवळ डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाऊंटंट आणि पोस्टाचे कर्मचारी यांच्याकडूनच अपेक्षित आहेत का? आपणच निवडून दिलेल्या आपल्या नेत्यांकडून, या राजकारण्यांकडून या गुणांची अपेक्षा नाही का? आजचा '1 जुलै 2022' या दिवशी किमान महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी आजपासून या गुणांची कास धरून हा दिवस 'निकोप समाजकारण दिवस' ठरवावा, ही अशी अपेक्षा केली, तर ते चुकीचे ठरू नये.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news