डॉ. ग. गो. जाधव यांचा युवा शिक्षण हिताचा विचार

डॉ. ग. गो. जाधव यांचा युवा शिक्षण हिताचा विचार
Published on
Updated on

दै. 'पुढारी'चे संस्थापक संंपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी विद्यार्थी-युवक हा घटक आपल्या पत्रकारितेच्या केंद्रभागी ठेवला होता. शिक्षण व्यवस्थेत सर्वात वरच्या स्थानावर असलेल्या या घटकाला त्यांनी खंबीर साथ दिली. प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेली ही ऊर्जा विधायक कामासाठी वापरात यावी, असा त्यांचा आग्रह होता. राष्ट्र उभारणीच्या कामात विद्यार्थ्यांची मदत घेतली पाहिजे, हा त्यांचा विचार आजच्या स्थितीतही कालसुसंगत आणि तितकाच अग्रक्रमाचा आहे. आज (दि. 20 मे) त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने…

कोणत्याही समाजात विद्यार्थी-युवक हा महत्त्वाचा आणि तितकाच निर्णायक घटक असतो. राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रक्रियेत विद्यार्थी अनेक पातळ्यांवर सक्रिय सहभागी असतात; परंतु त्यांची वेगळी नोंद अपवादानेच घेतली जाते. प्रचंड ऊर्जा असलेल्या या घटकाकडे 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी मात्र पुरेसे लक्ष दिले होते. शिक्षण हा त्यांचा सुरुवातीपासून जिव्हाळ्याचा विषय होता. अध्ययन, अध्यापनासह संस्थानी काळातील दरबारचे आदेश असो किंवा स्वतंत्र भारतातील सरकारने घेतलेले काही निर्णय असो, ग. गो. जाधव यांनी सातत्याने विद्यार्थ्यांच्या हिताची पाठराखण केली; पण याचा अर्थ त्यांनी प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांचे कोडकौतुकच केले, असे नाही. विद्यार्थी चुकत असतील, तर त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांचे कान धरले होते. एक सम्यक, संतुलित, कुशल, व्यवहारी आणि देशाच्या विकासात योगदान देणारा विद्यार्थी तयार व्हावा, अशी त्यांची भूमिका होती.

सामाजिक न्यायाचा विचार

संस्थानी राजवटीत करवीर सरकारच्या विद्यार्थी विषयक धोरणांवर डॉ. ग. गो. जाधव यांनी सातत्याने आपली भूमिका मांडली होती. राजर्षी शाहू महाराज आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रयत्नांमुळे उच्च शिक्षणाला गती मिळाली. मात्र, शिक्षणासाठी करवीर सरकारवर मोठा बोजा पडू लागल्याने आणि त्यातच युद्धकर लागू झाल्याने हायस्कूलच्या फीमध्ये काहीशी वाढ करण्यात आली होती. या फीवाढीचा करवीर सरकारने पुनर्विचार करावा, असे आवाहन ग. गो. जाधव यांनी 7 जुलै 1941 रोजी लिहिलेल्या अग्रलेखात केले होते. 'हायस्कूलमध्ये बहुजन समाजातील गरीब कुटुंबांतील मुले शिक्षण घेतात. विशेषतः, मागासलेल्या वर्गातील मुलेही हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊ लागली आहेत. फीवाढीमुळे अशा गरीब तसेच मागासलेल्या वर्गातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. म्हणून या फीवाढीचा कौन्सिलने फेरविचार करावा, अशी आमची नम्र; पण आग्रहाची विनंती आहे,' अशी भूमिका त्यांनी घेतली. शिक्षणाच्या प्रक्रियेतून गरीब आणि वंचित समूह बाजूला पडू नये, ही त्यांची तळमळ होती. विद्यार्थी हिताच्या द़ृष्टीने त्यांची ही भूमिका सामाजिक न्यायाचा विचार रूजवणारी होती.

विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आग्रही

करवीर इलाक्यातील सरकारी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची फीवाढ झाल्यानंतर काही दिवसांतच मोफत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींवरही काहीसा शुल्कवाढीचा बोजा टाकण्यात आला होता. हा निर्णयही ग. गो. जाधव यांना रूचला नव्हता. फी वाढल्यास सर्वसामान्य पालक फक्त मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतील आणि मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. 17 जुलै 1941 रोजीच्या अग्रलेखात त्यांनी ही बाब करवीर दरबारच्या निदर्शनास आणून दिली होती. ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 500 रुपयांहून कमी आहे, अशा विद्यार्थिनींना सरकारी हायस्कूलमध्ये पूर्णपणे फी माफी देण्याचा फेरहुकूम काढल्यानंतर ग. गो. जाधव यांनी त्याचे खुलेपणाने स्वागत केले. विद्यार्थिनींच्या शिक्षणाबाबत ते खूपच आग्रही होते. करवीर प्रांतात मुलींच्या शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, याचा लाभ सवर्ण मुलींना जास्त प्रमाणात मिळत होता. गरीब आणि इतर वर्गातील तसेच बहुजनसमाजातील मुली शिकल्या पाहिजेत, यासाठी त्यांची धडपड होती. म्हणून तर त्यांनी मुलींच्या शिक्षणात शुल्कवाढीचा विषय येताच अशा वाढीला विरोध दर्शवला होता.

विद्यार्थी-प्रशासन संबंध

विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात कसे संबंध असायला हवेत, यावरही ग. गो. जाधव यांनी भाष्य केले आहे. विशेषतः, उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांशी कॉलेज प्रशासनाने कसे वागावे, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. कोल्हापुरातील राजाराम कॉलेजचे प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये विविध कारणांवरून संघर्ष झाला होता. त्यावेळी 7 फेब्रुवारी 1941 च्या अग्रलेखात ग. गो. जाधव लिहितात, 'कॉलेजातील विद्यार्थी सामान्यपणे प्रौढ आणि स्वतःवरील जबाबदारी जाणणारे असतात, असे मानले जाते. त्यामानाने त्यांच्यावर जबाबदारी टाकणेही क्रमप्राप्तचे असते. मात्र, कोणी बेजबाबदारपणा करतो आहे, असे वाटल्यास तेवढ्यापुरता हस्तक्षेप करण्याचा हक्क वरिष्ठांनी जरूर बजावला पाहिजे. एरव्हीच्या कामात मात्र विद्यार्थ्यांशी सहानुभूतीने वागून त्यांना आपापल्या जबाबदार्‍या योग्य तर्‍हेने पार पाडण्यास मदत करणे हेच वरिष्ठांचे कर्तव्य आहे.' सध्याच्या काळात महाविद्यालये, विद्यापीठे तसेच अन्य तांत्रिक शिक्षण देणार्‍या संस्थांच्या प्रशासनाने ग. गो. जाधव यांची विद्यार्थ्यांप्रति असलेली संवेदनशीलता समजून घेतली आणि प्रशासनाने कुठपर्यंत हस्तक्षेप करावा याचे तारतम्य बाळगले, तर शिक्षण संस्थांतील संघर्ष कमी व्हायला मदत होईल.

विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव

ग. गो. जाधव यांनी नेहमी विद्यार्थी हिताचा पुरस्कार केला, हे जरी खरे असले तरी विद्यार्थी जर चुकत असेल, तर मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना कधीच पाठीशी घातले नाही. त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिल्या. प्रसंगी त्यांना मार्ग काढण्यासाठी मदत केली. नव्या वाटांचा शोध घेण्यासाठी दिशा दिली. मुंबई प्रांतातील सरकारने 1949 मध्ये त्या काळातील दुय्यम आणि उच्च शिक्षणाचे शुल्क वाढविले. ज्यांना शुल्क भरणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपली आर्थिक स्थिती दर्शवणारी कागदपत्रे सादर करावीत, अशी अट प्रांतिक सरकारने घातली. मात्र, या अटीला न जुमानता विद्यार्थ्यांनी फीवाढीच्या विरोधात आंदोलन पुकारले. ग. गो. जाधव यांना ही बाब खटकली. सरकारने गरीब विद्यार्थ्यांना फीवाढीतून सूट दिलेली होती. आपण गरीब आहोत, हे त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करायचे होते. परंतु, विद्यार्थी या अटीला बगल देऊन चुकीच्या मार्गाने चालले होते. 'फीवाढ डोईजड होत आहे हे दाखविण्याची जबाबदारी विद्यार्थी अगर त्यांचे पालक यांच्यावर आहे. ते तसे पुराव्याने दाखवतील तरच त्यांच्या न्याय्य मागणीस सर्वांचाच पाठिंबा मिळेल,' या शब्दांत ग. गो. जाधव यांनी विद्यार्थ्यांना सुनावले होते. याचाच अर्थ त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मागणीला पाठिंबा दर्शवला नाही. विद्यार्थी चुकीची भूमिका घेत असतील, तर त्यांना या चुकांची जाणीव करूनदेण्याचे महत्त्वाचे काम ग. गो. जाधव यांनी केले होते.

विद्यार्थी चळवळींना मार्गदर्शन

विद्यार्थी तरुण असतात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. शिवाय, तारुण्यात अनेकवेळा योग्य-अयोग्य याची निवड करता येत नाही. अशा स्थितीत काही लोक किंवा संघटना विद्यार्थ्यांच्या या शक्तींचा गैरफायदा घेतात. ग. गो. जाधव ही बाब जाणून होते. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या संघटनांच्या भूलथापांना बळी पडून भरकट जाऊ नये, अशी त्यांची भावना होती. 'विद्यार्थ्यांच्या चळवळीस अनिष्ट वळण' या अग्रलेखात त्यांनी सप्रमाण हे दाखवून दिले आहे. कोल्हापूर स्टुटंड युनियन या नावाच्या संघटनेची फारशी कोणाला माहिती नव्हती तसेच ही संघटना नोंदणीकृतही नव्हती. परंतु, या संघटनेच्या झेंड्याखाली अनेक तरुण एकवटले आणि त्यांनी काही अनिष्ट गोष्टी केल्या. या तरुण विद्यार्थ्यांना आपण कोणाच्या तरी जाळ्यात फसत आहोत, याची जराही कल्पना नव्हती. मात्र, ग. गो. जाधव यांनी त्यांना ही जाणीव करून दिली.

'विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त वेळांत खरोखरच काही लोकहित साधायचे असेल, तर त्यांनी विधायक कार्य हाती घ्यावे. आपल्या अडाणी बांधवांना साक्षर करण्याचे एकच कार्य त्यांनी हाती घेतले, तर ती त्यांची फार मोठी देशसेवा होईल,' असा पर्यायी समाजहिताचा कार्यक्रमही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला होता. एका अर्थाने ग. गो. जाधव विद्यार्थ्यांच्या चळवळीला विधायक मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. चळवळीत सहभागी होणारी बहुजन समाजातील मुले असतात. चळवळ भरकटलेली असेल, तर अंतिमतः बहुजन समाजाचेच नुकसान होणार आहे, हा धोका त्यांनी ओळखला होता आणि आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून ते सातत्याने समाजासमोर या धोक्याची तीव्रता ठळकपणे मांडत होते.

पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या चळवळीला बळ दिले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने प्रचंड क्षमता असूनही शिक्षण अर्ध्यातच सोडून द्यावे लागले असले, तरी ग. गो. जाधव यांची शिक्षणाविषयीची तळमळ तसूभरही कमी झाली नव्हती. या तळमळीतूनच त्यांनी विद्यार्थी हा घटक समोर ठेवून त्यांच्या शक्तीला सकारात्मक वळणावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तरुण विद्यार्थी हेच उद्याचे सुजाण नागरिक आहेत आणि देश पुढे घेऊन जाण्याचा सर्वात मोठा वाटा विद्यार्थ्यांचा असणार आहे, याची त्यांना नीट जाणीव होती. म्हणून त्यांनी विद्यार्थीकेंद्रित पत्रकारितेवर विशेष भर दिला होता आणि हे ग. गो. जाधव यांच्या पत्रकारितेचे वेगळेपण आणि वैशिष्ट्यही आहे.

– डॉ. शिवाजी जाधव,
(समन्वयक, पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन केंद्र, शिवाजी विद्यापीठ)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news