स्टॉकहोम ; वृत्तसंस्था : सन 2021 साठी नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. अमेरिकेतील डेव्हिड ज्युलिअस आणि ऑर्डेन पॅटॅपोशियन यांना वैद्यकाचे नोबेल जाहीर झाले आहे. तापमान आणि स्पर्शाची जाणीव करून देणार्या 'रिसेप्टर्स'चा (संग्राहक) शोध लावल्याने या दोन्ही शास्त्रज्ञांना हा बहुमान देण्यात आला आहे.
नोबेल समितीने स्वीडिश राजधानी स्टॉकहोममध्ये पुरस्कारांची घोषणा करताना सांगितले की, दोन्ही शास्त्रज्ञांच्या या नव्या संशोधनामुळे नव्या पद्धतीची वेदनाशामके तयार करण्यात मोठी मदत होणार आहे.
जुने दुखणे तसेच अन्य अनेक आजारांच्या उपचारातही लाभ होतील. आमची मज्जासंस्था उष्णता, थंडी आणि अन्य यांत्रिक उत्तेजना कशा पद्धतीने जाणून घेते, त्याचा उलगडा या नव्या संशोधनाने झाला आहे.
ऑर्डेन हे स्क्रिप्स रिसर्चमध्ये (कॅलिफोर्निया) प्राध्यापक आहेत. याआधी त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठ तसेच कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत संशोधन कार्य केले आहे. ऑर्डेन हे मूळ आर्मेनियन असून, लेबनॉनमध्ये त्यांचा जन्म झाला होता.
डेव्हिड ज्युलिअस यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्कचा असून, ते पीएचडी आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठात ते प्राध्यापक आहेत. गतवर्षी वैद्यकातील हे नोबेल तिघांना संयुक्तपणे देण्यात आले होते. हार्वे जे आल्टर, मायकल ह्युटन आणि चार्ल्स एम. राईस यांना यकृताला इजा पोहोचविणार्या हॅपेटायटीस सी या विषाणूचा शोध लावल्याबद्दल नोबेल देण्यात आले होते.