सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : माढा तालुक्यातील परितेवाडी येथील 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळवणारे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना आता डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया' या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबाबत डिसले गुरुजी यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
डिसले गुरुजींना आणखीन मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे. यामुळे डिसले गुरुजींच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यामुळे डिसले गुरुजींवर सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डिसले गुरुजींना तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रणजितसिंह डिसले गुरुजींनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे.
27 जुलैला रामेश्वरम येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्ने पाहायला शिकवले अशा आदरणीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली आहे, अशी प्रतिक्रिया डिसले गुरुजी यांनी यानिमित्ताने दिली आहे. डिसले गुरुजींना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे विविध शिक्षक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.