डिजिटल साक्षरता देशात महाराष्ट्र नंबर १

डिजिटल साक्षरता देशात महाराष्ट्र नंबर १
Published on
Updated on

कोल्हापूर ; सुनील कदम : कोरोना महामारीची आपत्ती भारतातील डिजिटल साक्षरता वाढविण्यासाठी इष्टापत्ती ठरली आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला तर ही आपत्ती जरा जास्तच वरदायी ठरली असून, देशभरातील इतर राज्यांमध्ये डिजिटल साक्षरतेत महाराष्ट्र नंबर एक राज्य ठरले आहे.

देशात 2020 मध्ये कोरोनाचे आगमन झाले आणि पाठोपाठ सर्वच क्षेत्रांवर लॉकडाऊनची कुर्‍हाड कोसळली. लॉकडाऊनमुळे शासकीय आणि खासगी क्षेत्रातील लाखो नोकरदारांना 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारावा लागला. विद्यार्थ्यांना 'ऑनलाईन' शिक्षणाशिवाय पर्यायच राहिला नाही. छोट्या-मोठ्या उद्योग-व्यावसायिकांनाही ऑनलाईनचा आधार घ्यावा लागला, एवढेच नव्हे तर गृहिणींनासुद्धा दैनंदिन गरजांसाठी ऑनलाईनचा आधार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सर्वच घटकांसाठी 'ऑनलाईन' हा जणू काही परवलीचाच शब्द होऊन गेला. त्यासाठी आवश्यक होती ती 'डिजिटल साक्षरता'! त्यामुळे बहुतेक घटकांना 'डिजिटल साक्षरतेचे धडे' गिरविण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि त्यातूनच देशात डिजिटल साक्षरतेने भरारी घेतलेली दिसते.

जगात डिजिटल साक्षरतेचे प्रमाण 60 टक्क्यांच्या आसपास आहे, त्यातही पाश्चिमात्य राष्ट्रांचे प्रमाण लक्षणीय आहे. जगाची आजची लोकसंख्या 789 कोटींच्या घरात आहे. त्यामध्ये 400 कोटी 72 लाख लोक डिजिटल साक्षर आहेत. विशेष म्हणजे, त्यापैकी 33 कोटी 12 लाख लोक कोरोना काळातच डिजिटल साक्षर झाले आहेत. जगाची वर्षभरात वाढलेली डिजिटल साक्षरतेची टक्केवारी 7.5 टक्के आहे. या तुलनेत भारतातील डिजिटल साक्षरतावाढीचे प्रमाण काहीसे जास्त असलेले दिसून येते.

देशातील 32 टक्के लोक करतात सोशल मीडियाचा वापर

'डिजिटल इंडिया रिपोर्ट 2021'मधील ताज्या आकडेवारीनुसार, वर्षभरात देशातील इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये तब्बल 4 कोटी 70 लाखांची वाढ झाली आहे. ही वाढ 8.20 टक्के इतकी आहे. देशाची लोकसंख्या 139 कोटी असून, त्यातील 62 कोटी 40 लाखांहून अधिक लोक इंटरनेटचा वापर करतात. याचा अर्थ 44.89 टक्के लोक इंटरनेट वापरकर्ते बनले आहेत, गेल्यावर्षी हेच प्रमाण केवळ 36 टक्के होते.

देशात आजघडीला 100 कोटी 10 लाख लोकांकडे मोबाईल असून, यापैकी 2 कोटी 30 लाख मोबाईल वापरकर्ते केवळ कोरोना काळात वाढले आहेत. देशात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 79 टक्क्यांहून अधिक आहे. देशातील सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल 7 कोटी 80 लाखांनी वाढ होऊन सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या 44 कोटी 80 लाखांवर गेली. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 32 टक्क्यांहून अधिक लोक सोशल मीडियाचा वापर करतात.

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला, तर डिजिटल साक्षरतेच्या बाबतीतही 'मराठी पाऊल पडते पुढे' याचाच प्रत्यय येतो. देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण 36 टक्के असले, तरी महाराष्ट्रातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण 40 ते 60 टक्क्यांवर आहे. महाराष्ट्रातील जवळपास 40 टक्के ग्रामीण आणि 60 टक्क्यांहून अधिक शहरी भाग डिजिटल साक्षर झालेला दिसतो आहे. काही राज्ये डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत अजूनही 20 ते 40 टक्क्यांच्या आसपासच आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राने याबाबतीत बराच मोठा पल्ला गाठला आहे. एकूणच गेल्या वर्ष-दीड वर्षाचा कालावधीचा विचार करता अपरिहार्य कारणामुळे का होईना; पण देशातील आणि राज्यातील डिजिटल साक्षरता वाढीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाल्याचे दिसते.

कोरोना आणि डिजिटल साक्षरता!

जगाची आजची लोकसंख्या 789 कोटी
जगातील डिजिटल साक्षर लोकसंख्या 400 कोटी 72 लाख
कोरोना काळात वाढलेले डिजिटल साक्षर 33 कोटी 12 लाख
भारताची आजची लोकसंख्या 139 कोटी
भारतातील डिजिटल साक्षर लोकसंख्या 62 कोटी 40 लाख
कोरोना काळात वाढलेले डिजिटल साक्षर 4 कोटी 70 लाख
महाराष्ट्राची आजची लोकसंख्या 12 कोटी 49 लाख
महाराष्ट्रातील डिजिटल साक्षर लोकसंख्या 7.49 कोटी
कोरोना काळात वाढलेले डिजिटल साक्षर 1.06 कोटी

80 टक्के पदवीधर डिजिटल साक्षर

'इंडियन टेलिकॉम सर्व्हिस परफॉर्मन्स'च्या 'नॅशनल सॅम्पल सर्व्हे'नुसार, गेल्यावर्षी देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण केवळ 36 टक्के होते.

त्यातही पुन्हा शहरी भागात 61 टक्के आणि ग्रामीण भागात केवळ 25 टक्के असे हे प्रमाण होते.

डिजिटल साक्षरांमध्ये पदवीधारकांचे प्रमाण 80 टक्के, तर केवळ 20 टक्के अल्पशिक्षित लोक डिजिटल साक्षर होते.

या डिजिटल साक्षरांमध्येही प्रामुख्याने शासकीय आणि खासगी क्षेत्रातील नोकरदारवर्गाचा 77 टक्के वाटा होता.

याचा अर्थ समाजातील अन्य बरेचसे घटक डिजिटल साक्षरतेपासून मोठ्या प्रमाणात अलिप्तच होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news