ठाणे : ४ अभियंत्यांचे खड्ड्यांमुळे निलंबन

ठाणे : ४ अभियंत्यांचे खड्ड्यांमुळे निलंबन
Published on
Updated on

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यांवरील खड्डे भरणे आणि रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याने ठाणे महानगरपालिकेच्या चेतन पटेल, प्रकाश खडतरे, संदीप सावंत, संदीप गायकवाड या चार अभियंत्यांचे आज निलंबित करण्यात आले आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डयांंसाठी जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दुसर्‍याच दिवशी तातडीने ही कारवाई केली. ठेकेदारांनाही नोटिसा काढण्यास ठाणे महापालिकेने सुरूवात केली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डयांतून सर्वसामान्यांची लूट करणार्‍या ठेकेदारांचेही धाबे दणाणले आहेत.

प्रकाश खडतरे हे वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये कार्यरत असून चेतन पटेल हे उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यरत आहेत. तर संदीप सावंत आणि संदीप गायकवाड हे लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये कार्यरत आहेत. संदीप सावंत यांच्या अखत्यारीत पालकमंत्र्यांच्या घरासमोरील सर्व्हिस रोड येत असून या सर्व अभियंत्यांवर कामात आणि गुणवत्तेबाबत दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सोबत घेत शुक्रवारी शहरातील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाची पाहणी केली. तसेच कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा शिंदे यांनी सर्व संबंधित अधिकार्‍यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. एकूणच सरकार आणि ठामपा रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल अधिक सजग झाल्याचे दिसत आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स

रस्त्यांची डागडुजी दर्जेदार पद्धतीने होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्याची घोषणा शिंदे यांनी शनिवारी केली. या टास्क फोर्समध्ये जिल्हाधिकार्‍यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते), अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी ठाणे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त यांच्यासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एनएचएआय आदी यंत्रणांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news