‘ट्विटर’ने थांबवली ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन सेवा

‘ट्विटर’ने थांबवली ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन सेवा

वॉशिंग्टन : अ‍ॅलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक बदल घडत होते. त्यामध्येच 'ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन'ची सेवाही दिली जाऊ लागली होती. आता ट्विटरने ही 'ब्ल्यूू टिक सबस्क्रिप्शन' सेवा थांबवली आहे. माध्यम सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरने 7.99 डॉलरला सुरू केलेली ट्विटर 'ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन' सेवा बंद केली आहे. ट्विटरने आपल्या आयओएस वापरकर्त्यांसाठी ही सेवा सुरू केली होती. परंतु, म्याशाबेलच्या अहवालानुसार, 'ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन'ची सेवा घेण्याचा पर्याय जो आयओएस अ‍ॅपच्या साइडर बारमध्ये उपलब्ध होता. तो पर्याय आता दिसून येत नाही. अनेक बनावट खाती निर्माण होऊन त्यांच्यासाठीही ब्ल्यूू टिक मिळू लागल्याने ही सेवा वादग्रस्त बनली होती.

'द व्हर्ज'च्या माहितीनुसार यूजर्सना ही सुविधा आता मिळत नाही. यूजर्सला देखील एक संदेश आलेला आहे. ज्यात लिहिले होते की, तुमच्या आवडीबद्दल धन्यवाद..! ट्विटर ब्ल्यूू टिक सेवा भविष्यात तुमच्या देशात उपलब्ध होईल, कृपया तुम्ही ती नंतर तपासू शकता. पेड व्हेरिफिकेशन फीचर सुरू होताच, ट्विटरवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या सेलिब्रिटींची अनेक बनावट खाती समोर आली. इतकेच नाही तर काही व्हेरिफाईड अकाऊंटस्नी सुपर मारियो आणि बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्सची गेमिंग कॅरेक्टरची बनावट खातीही तयार केली आहेत. अ‍ॅलन मस्क यांनी या प्रकरणात ट्विट द्वारे सांगितले की, येथे कोणाचीही तोतयागिरी चालणार नाही. सेलिब्रिटींच्या नावाने फेक अकाऊंट किंवा विडंबन केले तर खाते बंद केले जाईल.

'द व्हर्ज'च्या वृत्तानुसार, अशाच प्रकारच्या समस्या लक्षात घेता 'ब्ल्यू सबस्क्रिप्शन' सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ब्ल्यू टिक म्हणजेच ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंटसाठी यूजरला आता प्रत्येक महिन्याला 8 डॉलर्स (जवळपास 660 रुपये) द्यावे लागतील. हे शुल्क देशानुसार वेगवेगळे असेल. एलन मस्क यांनी 27 ऑक्टोबर रोजी ट्विटर खरेदी केल्यानंतर पाच दिवसांनी ही घोषणा केली. मस्क यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की फक्त ट्विटर ब्ल्यू वापरकर्त्यांना आता त्यांच्या खात्यावर ब्ल्यूू टिक व्हेरिफाईड बॅज मिळेल.

सत्यापित बॅज असलेल्या विद्यमान वापरकर्त्यांना देखील ट्विटर ब्ल्यूचे सशुल्क सदस्यता आवश्यक असेल. तथापि, या वापरकर्त्यांना सशुल्क सदस्यत्वावर स्विच करण्यासाठी सुमारे 3 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळू शकतो. जर त्यांनी 'ब्ल्यू सबस्क्रिप्शन' घेतले नाही तर त्यांच्या खात्यातून ब्ल्यूू टिक काढून टाकले जाईल. भारतातील काही ट्विटर वापरकर्त्यांना 10 नोव्हेंबरच्या रात्री ब्ल्यू सबस्क्रिप्शनसाठी अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर पॉप-अप मिळाले. यामध्ये ट्विटर 'ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन'ची मासिक किंमत 719 रुपये नमूद करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news