टोमॅटोचे घ्या बारमाही उत्पन्न, जाणून घ्या लागवड कशी करावी?

टोमॅटोचे घ्या बारमाही उत्पन्न, जाणून घ्या लागवड कशी करावी?

सध्या बाजारात पुन्हा एकदा टोमॅटोच्या भावांनी उचल खाल्लेली दिसत आहे. टोमॅटोला बारमाही मागणी असते. रोजच्या आहारातील एक भाग म्हणून टोमॅटोचा विचार केला जातो. अगदी कोशिंबीर करण्यापासून भाजी करण्यापर्यंत याचा वापर केला जातो.

विविध भाज्यांना चव आणण्यासाठीही टोमॅटोचा उपयोग होतो. आपल्याकडे टोमॅटो लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. टोमॅटो विक्रीसाठी सोपे असल्याने किंवा बाजारपेठेची सहज उपलब्धता असल्याने शेतकर्‍यांचा या पिकाकडे कल वाढताना दिसतो. तसेच टोमॅटो पीक योग्य व्यवस्थापनातून प्रचंड उत्पादन मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये आदर्श पीक बनले आहे. परंतु, याचमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात लागवड होऊन बाजारभाव गदगडतात. कधी कधी बी मिळण्यापासून रोपे मिळण्यापर्यंत अडचणी येतात. असे, घडल्यास बाजारभाव कोसळून शेतकर्‍याला प्रचंड मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. टोमॅटो पिकासाठी भांडवली खर्चही मोठा असतो. मग भांडवल फिटणेही कधी कधी अवघड बनते. योग्य व्यवस्थापन करून तोटा न होण्यासाठी काही बाबी महत्त्वाच्या आहेत. जेणेकरून भाव कमी असूनसुद्धा विक्रमी उत्पन्नातून तोटा होणार नाही. शेतकर्‍यांच्या हातामध्ये बाजारभाव नसतात तर उत्पादन असते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त उत्पादनातून नफा वाढवणे गरजेचे आहे.

बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य जातीची निवड करणे आवश्यक आहे. आपण लावलेली जात नुसते जास्त उत्पन्न देणारी किंवा जास्त बाजारभाव मिळणारी असून उपयोग नाही तर आपल्या वाणाचा उत्पादनाला बाजारात उठाव असायला हवा. आपल्याकडील बराचसा माल उत्तर भारतात विक्रीसाठी जात असल्याने वाहतुकीत दोन दिवस माल टिकणे महत्त्वाचे असते. मग अशावेळी व्यापारी वर्गाकडून असा टिकणाराच वाण खरेदी केला जातो.

रोपे तयार करण्यासाठी 3 मीटर लांब, 1 मीटर रूंद, 30 सें.मी. उंचीचा गादीवाफा बनवावा. या प्रत्येक वाफ्यात 5 किलो शेणखत, 35 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 25 ग्रॅम न्यूरेट ऑफ पोटॅश मिसळावे. वाफ्यावर काडीच्या सहाय्याने आडव्या रेषा पाडून घ्याव्यात. अशा रेषांमधील अंतर 15 सें.मी. राखावे. या रेषांमध्येच बी पेरून माती किंवा शेणखताच्या सहाय्याने हलकेसे झाकून घ्यावे. उगवण होताच पाचट काढून घेऊन पाटाचे पाणी सुरू करावे.

रोपे पुनर्लागवडीपूर्वी सोटमुळाचा शेंडा कापावा. अशी रोपे पाच मिनिटांसाठी इमिडाक्लोप्रीडच्या द्रावनात बुडवावीत. यासाठी 10 लिटर पाण्यातून 4 मिली इमिडाक्लोप्रीड वापरावे. अशी प्रक्रिया केल्यामुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव टळतो आणि विषाणूजन्य रोगाचा विस्तार वाढत नाही. या प्रक्रियेनंतर रोपांची फक्त मुळे अ‍ॅझेटोबॅक्टरच्या द्रावणात बुडवून लगेच लागवड करावी. अ‍ॅझोटोबॅक्टर प्रक्रियेमुळे वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण जमिनीत केले जाते.

टोमॅटो मांडवावर बांधण्याची योग्य वेळ साधणे आवश्यक आहे. यामध्ये बांधणी कधी करतो, यावर उत्पादन अवलंबून असते. लवकर बांधणी केल्यास उत्पन्न उशिरा सुरू होते आणि उशिरा बांधणी केल्यास फळे खराब होतात आणि झाडांचे नुकसान होऊ शकते. उशिरा बांधणी केल्याने झाडांची मोडतोड होऊ शकते. बांधणीची योग्य वेळ म्हणजे झाडावर 2-3 फळे कमीत कमी गोटी आकाराची किंवा उंबराच्या आकाराची होऊ द्यावीत.

लागवडीवेळी एकरी 400 किलो सुपर फॉस्फेट, 100 किलो म्युरेट पोटॅश द्यावे. आपल्याकडे युरियाचा किंवा अमोनियाचा वारेमाप वापर केला जातो. या अतिवापराने झाडांची वाढ गरजेपेक्षा जास्त होऊन फळधारणा कमी होते आणि कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. यासाठी लागवड करताना युरियाची मात्रा अजिबात देऊ नये. परंतु, लागवडीनंतर 30 दिवसांनी एकरी 100 किलो युरिया आणि 10 किलो सूक्ष्म अन्नद्रवे घेऊन मातीची भर लावावी. पीक संरक्षणाचा विचार करता रस शोषक किडी, करपा, निमॅटोड किंवा सूत्रकृती यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 4 मिली, अ‍ॅसिडाक्लोप्रीड 5 ग्रॅम, क्यूराक्रॉन 10 मिली, थायोमिथाक्झॉन 5 ग्रॅम यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. करपा नियत्रंणासाठी अँट्रिकॉल 30 ग्रॅम, कुमानएल 35 मिली, कवच 25 ग्रॅम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 10 लिटर पाण्यातून फवारावे. वरील औषधांचे प्रमाण जादा किंवा कमी होऊ नये.

-सतीश जाधव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news