टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. खास ऑलिम्पिकसाठी डिझाईन केलेली ड्रायव्हरलेस कार, रोबोटस् आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातील क्रांतिकारी चमत्कार यानिमित्ताने टोकियोत पाहायला मिळणार आहेत.
टोकियो ऑलिम्पिकला आजपासून सुरुवात होत आहे. खरेतर, जगात कोरोनाचे संकट उद्भवले नसते तर गेल्याच वर्षी ही स्पर्धा पार पडली असती. पण, कोरोना संसर्गामुळे स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलावी लागली. अजूनही कोरोना संसर्गाचे सावट पूर्णतः दूर झालेले नसल्याने प्रेक्षकविरहित होणारी ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी जपानने अनेक वर्षांपासून तयारी केली होती.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर असलेला जपान अनेक अभिनव क्रांतिकारी चमत्कार जगाला या स्पर्धेच्या निमित्ताने दाखवणार आहे. ऊर्जेच्या पुनर्वापराचे अनेक प्रयोग आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळतील. प्रत्येकाच्या जीवनाचे काही पैलू व्यापणार्या सेलफोन, संगणक आणि इंटरनेटमुळे 2021 ची टोकियो ऑलिम्पिक नवतंत्रज्ञानाच्या द़ृष्टीनेही अनुभवण्याजोगी ठरणार आहे! यापूर्वीच्या कोणत्याही क्रीडास्पर्धेत न दिसलेले तंत्रज्ञानाचे आविष्कार तसेच काही व्यावहारिक उपयोग येथे केले जाणार आहेत.
या ऑलिम्पिक स्पर्धांशी संबंधित संगणक-तंत्राची काही वैशिष्ट्ये आपण थोडक्यात पाहू. गुगलचे चालक विरहित वाहन जगभर कुतूहलाचा विषय आहे. अशा हजारो वाहनांचा वापर येथे होताना दिसेल. अत्याधुनिक रोबोट (यंत्रमानव) अनेक कामे करताना दिसतील. सामान उचलण्यापासून, भाषांतर करणार्या दुभाषाचे काम करणारा हा हरहुन्नरी सवंगडी हजारोंच्या संख्येत येथे दिसून येईल.
जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक ही स्पर्धा व्हर्च्युअली पाहणार असल्याने वेबवर नक्कीच ताण येईल. संगणकीय आणि इलेक्ट्रॉनिक दळणवळणावर सायबर-हॅकर्सचा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. वेबसाईटस् हॅक झाल्यामुळे संपूर्ण नेटवर्कमध्येच केवढा गोंधळ निर्माण होऊ शकतो हे आपणास माहीतच आहे! परंतु असे काहीही होणार नाही, असा भरवसा ही तांत्रिक बाजू सांभाळणार्या कंपनीने दिला आहे. कंपनीने स्वतःच शेकडो हॅकर्सना कामावर ठेवले आहे. सर्वसंमतीने हॅकिंग करणार्या अशा तंत्रज्ञांना एथिकल हॅकर्स म्हणतात. ते खरे चोर नसतात तर हॅकर्सचा हल्ला कशाप्रकारे होऊ शकेल, यासंबंधी विविध कल्पना लढवून आणि तशा शक्यता स्वतःच निर्माण करून त्याद़ृष्टीने सिस्टीम सुरक्षित बनवणे, हे त्यांचे काम असते. स्पर्धेच्या ठिकाणचे निकाल दाखवणारे स्कोअरबोर्डस्, खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना पुरवली जाणारी सामन्यांची वेळापत्रके, ऑलिम्पिक समितीद्वारे नेटवर प्रसिद्ध केली जाणारी अधिकृत परिपत्रके अशा अनेक ठिकाणी विशेष काळजी घेतली जाणार आहे. संशयास्पद संगणकीय हालचाली दर्शवणारी लाईन एकसहस्त्रांश सेकंदात ब्लॉक करून पोलिसांना तसे कळवण्यासाठी ही यंत्रणा सज्ज आहे.
हे काम अतिशय अवाढव्य, विस्तृत क्षेत्रावर पसरलेले असल्याने अतिशय जिकिरीचे आहे यात शंकाच नाही. प्रत्येक विभागाचे कंत्राट बाहेरच्या संस्था किंवा कंपन्यांना देण्यात आले आहे. अशा स्पर्धांच्या काळात इंटरनेटवर खूपच जास्तीचे ओझे पडते. जाता जाता चटकन स्कोअर पाहणार्यांची संख्या तर वाढतेच; परंतु सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन्स असल्याने हँडसेटवरून लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडीओ म्हणजे थेट प्रक्षेपण पाहणार्यांची संख्या विलक्षण वाढणार आहे. अर्थात, हे ध्यानात घेऊन जपान सरकारने इंटरनेटची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. प्रथम विशिष्ट मर्यादेपलीकडे डेटा डाऊनलोडिंगवर बंधने लावण्याचा (डेटा कॅपिंग) विचार झाला होता; परंतु व्यावहारिक अडचणी आणि ग्राहकांच्या भावनात्मक प्रतिक्रियांचा विचार करून नंतर तो सोडून देण्यात आला. अर्थात, कोणत्याही मॅचच्या शेवटच्या दोन-पाच मिनिटांत उत्कंठावर्धक खेळ पाहणार्यांची संख्या अचानक हजारो-लाखोंनी वाढत असल्याने थोडेफार कमी-जास्त होऊ शकते; परंतु मुळात इंटरनेटची क्षमताच वाढवण्याबाबत तसेच शहरामध्ये तब्बल 4 लाख 75 हजार वाय-फाय हॉटस्पॉट उभारण्यासाठी ब्रॉडबँड आणि मोबाईल फोन नेटवर्कच्या पुरवठादारांनी सहकार्य केल्यामुळे नेट स्लो होण्याची परिस्थिती निदान हाताबाहेर जाणार नाही, असे दिसते. जगातील प्रत्येक मोठ्या इव्हेंटमध्ये काहीतरी वैशिष्ट्ये राखण्याचे प्रयत्न संयोजक करतातच. स्वतःची खासगी रेडिओ प्रक्षेपण केंद्रे आणि यंत्रणा असणारी ही स्पर्धा असणार आहे.
सर्वसाधारण संवादमाध्यम म्हणून एअरवेव्हने चालवलेलीच रेडिओ यंत्रणा वापरली जाईल; परंतु संयोजक समितीचे स्वतंत्र नेटवर्क असेल. संगणकीय आणि त्यासंबंधित संवादमाध्यमांबाबत थोडीफार माहिती असणार्यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग हा शब्दप्रयोग ऐकला असेल. इंटरनेटसंबंधीच्या विविध सोयीसुविधा आणि त्यासंबंधीची उपकरणे स्वतः विकत न घेता सर्व माहिती आपल्या मालकीच्या एका आभासी स्टोअररूममध्ये ठेवायची आणि हवी तेव्हा वापरायची किंवा शेअर करायची असे या संकल्पनेचे अगदी ढोबळमानाने वर्णन करता येईल. सध्या संगणकविश्वात क्लाऊड कॉम्प्युटिंगची जबरदस्त हवा आहे.
ग्रीन ऑलिम्पिक
हे ऑलिम्पिक सर्वाधिक ग्रीन म्हणजे पर्यावरण संतुलन-संवेदी असणार आहे, असा क्रीडा समितीचा दावा आहे! टोकियो महानगर परिसरातील प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी सिटी-स्कॅन या नवीन यंत्रप्रणालीचे सेन्सर्स उंच इमारतींवर बसवले जात आहेत. असे काही सेन्सर्स एकत्रितपणे संपूर्ण क्षेत्राचे त्रिमिती प्रदूषण चित्र ठराविक वेळाने पुरवतील आणि त्यायोगे कोणत्या भागात प्रदूषण वाढत आहे, हे लगेचच समजून त्यावर उपाय करता येतील. वायू व सौर ऊर्जेचा पुरेपूर वापर वाहतूक व्यवस्थेत केला जाणार आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने सोलर पॅनेल्स शहरभर व ऑलिम्पिक नगरात उभारणे सुरू आहे. विजेत्या, सहभागी खेळाडू व पदधिकार्यांना देणार्या भेटवस्तू व पदकात वापरल्या जाणार्या धातूंमध्ये जुन्या मोबाईल हॅण्डसेटचा पुनर्वापर केला जाणार आहे.
एकंदरीत काय तर कोणताही मोठा इव्हेंट यशस्वी होण्यामागे नवतंत्रज्ञानाचा आणि त्याचा योग्य वापर करून घेणार्या तंत्रज्ञांचा तसेच प्रशासकांचाही फार मोठा वाटा असतो. तंत्रज्ञान पडद्याआडून काम करीत असल्याने आपणास जाणवत तर नाहीच, पण बरेचदा त्याद्वारे पुरवलेल्या सुविधा गृहीत धरल्या जातात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तंत्रज्ञान पडद्यामागे आणि प्रत्यक्षातही महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.