झारखंड, छत्तीसगडचा गांजा येतो महाराष्ट्रात

झारखंड, छत्तीसगडचा गांजा येतो महाराष्ट्रात

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस वाढत असलेल्या ड्रग्जचे लोण आता सर्वत्र पसरू लागले आहे. एका बाजूला महाविद्यालयांच्या परिसरात पेपर ड्रग्जचे अड्डे तयार करून नव्या पिढीला नशिल्या पदार्थांच्या आहारी लोटले जात आहे. दुसर्‍या बाजूला झारखंड, छत्तीसगड येथील गांजा हा महाराष्ट्रात वितरित केला जात आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चार टोळ्यांनी गांजा वितरणाची साखळी तयार केली आहे. 300 किलो गांजा दर महिन्याला मुंबई, ठाण्यात येतो. अशी धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे.

ड्रग्जचे सेवन आणि तस्करीत सर्वाधिक सहभाग हा तरुणांचा असल्याचे पोलिस तपासात वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. विशेष करून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, दिवा, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी भागांत मोठ्या संख्येने ड्रग्जची विक्री केली जाते. त्यात गांजा, चरस, अफीम या नेहमीच्या अंमली पदार्थांसह एमडी, एफेड्रीन, बाटला, क्रिस्टल, एमडीएम, अस्प्रिन, क्रॅक, हॅश, हुक्‍का पेन, बच्चू टॅबलेट, एलएसडी, कोकेन आदी नवनव्या ड्रग्सची सर्रास विक्री केली जात आहे.

ड्रग्जचा हा सारा बाजार मुंब्रा शहरात मोठ्या प्रमाणावर दररोज भरतो. साहजिकच या बाजारात हजारो तरुणांची पडद्याआडची वर्दळ दिवसागणिक फोफावत जात आहे. असे असूनदेखील मुंब्रात वर्षानुवर्षे आपले साम्राज्य बनवून बसलेल्या ड्रग्ज माफियांवर कारवाई का होत नाही, असा सवाल स्थानिक उपस्थित करत आहेत. कर्नाटक सीमेवरूनही नजीकच्या जिल्ह्यात गांजा वितरित होत आहे.

पोलिस कारवाई का होत नाही?

मुंब्रात गांजा, अफीम व एमडी पॉवडर विक्रीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. बाहेरील राज्यातून ठाण्या-मुंबईत येणार्‍या एकूण ड्रग्ज साठ्यापैकी तब्बल 35 टक्के ड्रग्ज साठ्याची विक्री एकट्या मुंब्रातून केली जाते, असा अंदाज ड्रग्जविरोधात काम करणार्‍या सामाजिक संस्थांनी वर्तवला आहे.

या संस्थांनी तशी माहितीदेखील पोलिस दलास वेळोवेळी दिलेली आहे. मात्र, वर्षानुवर्षे ड्रग्ज विक्रीचे साम्राज्य उभारून बसलेल्या ड्रग्ज माफियांवर कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. एका स्थानिक नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिस कारवाई केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी रचलेला खेळ असतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news