’जोतिबा’साठी ’छत्रपतीं’चे सेवाकार्य…राजर्षी शाहू, छत्रपती राजाराम महाराजांकडून विविध लोकोपयोगी उपक्रम

’जोतिबा’साठी ’छत्रपतीं’चे सेवाकार्य…राजर्षी शाहू, छत्रपती राजाराम महाराजांकडून विविध लोकोपयोगी उपक्रम

कोल्हापूर; सागर यादव : दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी वर्षभर अणि चैत्र यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने येणार्‍या भाविकांकरिता रस्ते, पाणी, उन्हापासून संरक्षणासह प्रबोधनाकरिता विविध लोकोपयोगी उपक्रम शंभर वर्षांपूर्वीपासून राबविले जात आहेत. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून सुरू झालेला हा वारसा छत्रपती राजाराम महाराज यांनी विकसित केला. छत्रपती शहाजी महाराज यांच्यानंतर आजतागायत हे सेवा कार्य सुरू आहे.

रस्त्यांची बांधणी आणि वृक्षारोपण

जोतिबाच्या यात्रेसाठी येणार्‍या लोकांच्या बैलगाडी-घोडागाडीच्या प्रवासाकरिता रस्त्यांची व्यवस्था राजर्षी शाहूंनी केली होती. सादळे-मादळेकडून कुशिरे येथे मिळणारा रस्ता पुढे टोप गावापर्यंत जोडण्यात आला होता (इसवी सन 1914). यात्रेला येणार्‍या भाविकांचे उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण व्हावे यासाठी कोल्हापूर ते जोतिबा मार्गावर दुतर्फा सावली देणारी झाडे लावण्याचे आदेश राजर्षी शाहूंनी दिले. कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर आणि केर्ले ते जोतिबा रस्त्यावर असणारे डेरेदार वृक्ष राजर्षी शाहूंच्या प्रेमळ सावलीची साक्ष आजही देत आहेत.

पाणी व्यवस्था अन् स्वच्छता

यात्राकाळात जोतिबा डोंगरावर वास्तव्यास असणार्‍या हजारो भाविकांच्या पाण्याची व्यवस्था म्हणून तेथील चव्हाण तळे, बेडूक बाव आणि कारदगीकरांच्या विहिरीतील गाळ काढण्याकरिता 200 ते 300 रुपयांच्या खर्चाची मंजुरी दिली होती (1903). केदारलिंग देवस्थानचा मोडलेला रथ पूर्ववत दुरुस्त करून घेण्यासाठीच्या खर्चाची तरतूद महाराजांनी केली होती (इसवी सन 1914). केदारलिंगाच्या चैत्र यात्रेनिमित्त डोंगर परिसराच्या स्वच्छतेसाठी 250 रुपयांच्या मंजुरीचे आदेश राजर्षी शाहूंनी इसवी सन 1915 मध्ये दिले होते.

शेती-शैक्षणिक प्रबोधन अन् रथोत्सव

धार्मिक भावनेने आलेल्या यात्रेकरूंच्या सोयीबरोबरच त्यांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने राजर्षी शाहूंनी विविध उपाययोजना केल्या. बहुसंख्येने येणार्‍या शेतकरी भक्तांसाठी डोंगरावर जनावरांचा बाजार भरविण्याचा आदेश 1903 मध्ये दिला होता. शेतकी आणि शैक्षणिक प्रबोधन म्हणून प्रदर्शनेही भरविली जात होती. छत्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी ताराराणी यांच्या कार्यकर्तृत्वाची महती भावी पिढीला समजावी, या उद्देशाने जोतिबा यात्रेनंतर कोल्हापुरात शिवछत्रपती आणि ताराराणींच्या रथोत्सवाची सुरुवात केली (1914).

धार्मिक व इतर सेवाकार्य

छत्रपती राजाराम महाराजांनी जोतिबा डोंगरावर मठ बांधण्यासाठी नेपाळच्या शंभू भारती यांना मोफत जागा दिली (1928). कोडोली-पन्हाळा-जोतिबा रस्त्यासाठी संपादित केलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनींचा मोबदला देण्याचे आदेश 1931 मध्ये देण्यात आले. जोतिबावरील वनराईची जोपासना योग्यरितीने व्हावी यासाठी योग्य मापाचे खड्डे, खत, पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश 1945 ला झाले होते. याचवर्षी जोतिबा मंदिराच्या शिखरांच्या दुरुस्तीसाठी 1 हजार 223 रुपयांचा विशेष निधी देण्यात आला. जोतिबा देवस्थानच्या घोड्याच्या देखभालीसाठी करवीर संस्थानकडून आर्थिक तरतूद केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news