जैवविविधतेच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा ‘पश्चिम घाट वाचवा’ मोहीम

जैवविविधतेच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा ‘पश्चिम घाट वाचवा’ मोहीम

पश्चिम घाटातील जैव विविधतेचे रक्षण करण्यासाठी जनमानसांत आणि सरकारमध्ये जागृती करण्यासाठी 35 वर्षांनी पुन्हा 'पश्चिम घाट वाचवा' मोहिम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मडकई येथे (शुक्रवार) झालेल्या पश्चिम घाट आंदोलनाच्या गाभा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत समितीचे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, पाँण्डिचेरी आणि तमीळनाडूतील प्रतिनिधी उपस्थित होते.

35 वर्षांपूर्वी नवापूर ते कन्याकुमारी अशा पदयात्रेचे आयोजन

समितीचे समन्वयक कुमार कलानंद मणी यांनी दै पुढारीला दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षांपूर्वी नवापूर ते कन्याकुमारी अशा पदयात्रेचे आयोजन पश्चिम घाट वाचविण्याविषयी जनजागृती करण्यासाठी करण्यात आले होते. 1 नोव्हेंबर 1987 रोजी नवापूर व कन्याकुमारी येथून एकाच वेळी पदयात्रेची सुरुवात करण्यात आली होती. या पदयात्रेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यामुळे पश्चिम घाट वाचवण्यासाठी सरकारने योजना केल्या, दोन समित्या नेमल्या.

आता 35 वर्षांनी मागे वळून पाहताना पुन्हा जनजागृतीची गरज दिसत आहे. शुक्रवारी झालेल्या गाभा समितीच्या बैठकीत पर्यावरणप्रेमी निर्मल कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा पश्चिम घाट वाचवा मोहीम आखण्याचा प्रस्ताव ठेवला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्चमध्ये या मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. ३५ वर्षापूर्वी प्रमाणेच पदयात्रा काढायची की सायकलयात्रा काढायची, सलगपणे १०० दिवस चालायचे की काही मोजक्या ठिकाणी भेटी द्यायच्या असे तपशील पुढील बैठकीत निश्चित केले जाणार आहेत.

पश्चिम घाटातील जैवसंपदा नष्ट होत असल्याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, दगडाच्या खाणी पश्चिम घाटात चालतात, वनसंरक्षण कायदे मवाळ करण्याचे सरकारचे धोरण आहे. कोविड काळात वनसंपदेचा ऱ्हास करून सरकारने अनेक प्रकल्प पुढे रेटले आहेत.

निसर्गाशी खेळण्याची शिक्षा निसर्ग मानवाला देत असतो. पूर येणे किंवा अवेळी पाऊस पडणे हे सारे बदललेल्या निसर्गचक्रामुळे घडत आहे. पुढील पिढीसाठी पर्यावरणाचे जतन करण्याची यासाठी युवावर्गाला हाक देण्यासाठी प्रामुख्याने आताची पश्चिम घाट वाचवा यात्रा असेल.

या बैठकीत हरिहर वाटवे, अपूर्वा कुलकर्णी, निर्मल कुलकर्णी, डी. सर्वांनन, आर. शिवकुमार, सरथ चेलूर्, कालिदासन, हिमांशू कुमार, जे. गुरुवायूपुरन, श्री.जी. अंदिथुया आणि डॉक्टर व्ही. टी पद्मनाभन सहभागी झाले होते. पिसफूल सोसायटीच्या सभागृहात ही बैठक झाली.
पश्चिम घाटाविषयी संशोधक, विद्यार्थी, अभ्यासकांना एकाच जागी सर्व माहिती उपलब्ध होण्यासाठी पश्चिम घाट माहिती केंद्र सुरू करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

पीसफुल सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य ब्रायन पारकर यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चित्रफिती, छायाचित्रे, शोधनिबंध, पुस्तके, लेख आदी स्वरूपातील पीसफूल सोसायटी व अन्य संस्थांकडे असलेली माहिती या केंद्रात संकलित केली जाणार आहे.

युवावर्गाला पश्चिम घाट वाचवा मोहिमेत सामावून घेतले जाणार आहे. एन्व्हायमेंट वॉरियर ही संकल्पना राबवली जाणार आहे. नव्या पिढीला रुचेल, समजेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत हा विषय ॲपच्या माध्यमातून पोहचवण्याचेही गाभा समितीने ठरवले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news