जीआय मानांकनासाठी तुळजापूर कवडी माळेसह 35 प्रस्ताव

जीआय मानांकन
जीआय मानांकन

पुणे ः किशोर बरकाले :  महाराष्ट्रातील 13 उत्पादनांचे प्रस्ताव भौगोलिक मानांकनासाठी (जीआय) पाठवण्यात आले असून, त्यात कोल्हापुरी फेट्याचा समावेश आहे. उर्वरित जम्मू-काश्मीर आणि आसाममधील आहेत.

येथील ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीच्या वतीने भौगोलिक मानांकनासाठी (जीआय) चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाकडे 40 प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यातील 29 उत्पादनांना 'जीआय' प्राप्त झाले आहे. शनिवारी (दि. 13) नव्याने आणखी 35 उत्पादनांसाठी जीआय मानांकन प्रस्ताव पाठविले आहेत. देशात एकाच व्यक्‍तीकडून 75 उत्पादनांचे प्रस्ताव दाखल करण्याची किमया या ग्रुपचे संस्थापक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी केली आहे.

जीआय मानांकनासाठी पाठवलेल्या महाराष्ट्रातील अन्य उत्पादनांमध्ये रेणुकामाता तांबूल (नांदेड), कास पठार फूल (सातारा), तेंदूची पाने (चंद्रपूर), बहाडोली जांभूळ (पालघर), लोणावळा चिक्‍की (पुणे), पेण गणेशमूर्ती (रायगड), कुंथलगिरी खवा, पेढा (उस्मानाबाद), तुळजापूर कवडी माळ (उस्मानाबाद), जालना दगडी ज्वारी (जालना), राण्या रोटी (विदर्भ), अडकित्ता (लातूर), पहिली रोटी (विदर्भ) यांचा समावेश आहे.

आपापल्या भागातील वाण, उत्पादनांची वैशिष्ट्ये पिढ्यान्पिढ्या जपणार्‍या शेतकर्‍यांचे हक्‍क अबाधित ठेवण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. त्यातून पहिल्याच प्रयत्नात 29 उत्पादनांसाठी 'जीआय' देशातील शेतकर्‍यांना मिळवून देण्यात यशस्वी झाल्याचे समाधान आहे, असे प्रा. हिंगमिरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील प्रस्तावांशिवाय हिमालयीन लसूण (जम्मू आणि काश्मीर), तसेच बोडोलँड प्रादेशिक प्रदेश – आसाममधील उत्पादनातील अरोनाई स्कार्फ, डोखोना मोती, एरी रेशीम, ज्वाग्रा, गमसा, खेरा डापिनी, नाफाम, थोरका, ऑन्डिया/ऑन्ला, ग्वाका ग्वाकी, जाऊ ग्रॉन, जाऊ गिशी, मैब—ा जो बिडवी, गोंगर डुन्जा, खाम, सर्जा, सायफन, खरडवी, नार्झी, गोंगाना, जोथा आदींचा समावेश आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्‍कर देण्यासाठी
भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांना जगाची बाजारपेठ मिळण्याचा मार्ग खुला होत आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारपेठ काबीज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. ज्याद्वारे त्याचा खप अधिक वाढून बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्‍कर देण्याचे सांघिक बळ आपल्या शेतकर्‍यांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही प्रा. हिंगमिरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news