कोल्हापूर : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वृद्ध दाम्पत्याला दिला धीर

कोल्हापूर : जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दालनाबाहेर येऊन वृध्द नागरिकांची तक्रार ऐकून घेतली.
कोल्हापूर : जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दालनाबाहेर येऊन वृध्द नागरिकांची तक्रार ऐकून घेतली.

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वेळ दुपारी दीडची… जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती… अशातच जिल्हाधिकारी थेट दालनाबाहेर आले… दालनासमोर उभ्या असलेल्या व्हॅनमधील 71 वर्षीय वृद्धाची चौकशी केली…सोबत असलेल्या पत्नीने कैफियत मांडली… दालनाबाहेरच त्यांची तक्रार ऐकून घेतली… सायंकाळपर्यंत अधिकारी गावात येतील, तुम्ही हिम्मत धरा, घाबरू नका, असा धीर दिला, अन् या वृद्ध दाम्पत्याचे चेहरे समाधानाने खुलले.

साके (ता. कागल) येथील 71 वर्षीय केरबा भाऊ कांबळे (तराळ) या वृद्धाने आणि त्याच्या पत्नीने संवेदनशील जिल्हाधिकार्‍यांचा अनुभव घेतला. आपल्यावर अनेक वर्षांपासून बहिष्कार टाकला आहे. आपल्याच जमिनीत येऊ देत नाहीत. त्यात आजारपण, चालता येत नाही, नीट उभे राहता येत नाही. मुलेही जास्त शिकलेली नाहीत. आमची कादगपत्रे बघा आणि आम्हाला न्याय द्या, अशी अपेक्षा घेऊन कांबळे दाम्पत्य जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

चालता येत नसल्याने कांबळे व्हॅनमध्ये बसून होते. ही माहिती कळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्हॅन दालनासमोर आणण्यास सांगितले. यानंतर त्यांनी थेट व्हॅनजवळ जाऊन कांबळे यांची तक्रार ऐकून घेतली. कैफियत मांडताना कांबळे यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या पत्नीलाही अश्रू रोखता येत नव्हते. सुमारे 15 मिनिटे त्यांची तक्रार ऐकून घेऊन, त्यांची विचारपूस करत जिल्हाधिकार्‍यांनी आता तुम्ही हिम्मत धरा, घाबरू नका, असा धीर देत तुम्ही किती वाजेपर्यंत घरी पोहचाल, अशी विचारणा केली. त्यावर संध्याकाळपर्यंत आम्ही जाऊ, असे दाम्पत्याने सांगताच, जिल्हाधिकार्‍यांनी तुम्ही पोहचाल त्यावेळी अधिकारीही तुमच्या घरी पोहचलेले असतील, असे त्यांना आश्वासित केले. जिल्हाधिकार्‍यांच्या या वागणुकीने कांबळे दाम्पत्यासह उपस्थित नागरिक, कर्मचारीही भारावून गेले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news