जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपलिकासह महानगरपालिका निवडणूका दिवाळीतच!

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपलिकासह महानगरपालिका निवडणूका दिवाळीतच!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीच लांबलेल्या निवडणुका आणखी लांबणार आहेत. या निवडणुका आता दिवाळीतच होतील, अशी शक्यता आहे. राज्यातील 25 जिल्हा परिषदा, 14 महापालिका आणि 284 पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. निवडणुका कधी होणार? याबाबतची उत्सुकता आता कमालीची ताणली गेली आहे. राज्याच्या नगरविकास आणि ग्रामपंचायत विभागातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकारने प्रशासकांना आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचे नियोजन केले आहे. राज्यात ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होतील. तत्पूर्वी, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

राज्य सरकारने प्रशासकांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिल्यास निवडणुका जूनपर्यंत पुढे जातील. नंतर पावसाळा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीतच होतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची मागणी लावून धरलेली आहे. महाविकास आघाडीने तर शिंदे-फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य निवडणुका घेऊनच दाखवाव्यात, असे आव्हान दिले आहे.

मुंबई मनपासाठी प्रतिष्ठा पणाला

शिवसेना आणि भाजपची मुंबई महापालिकेत युती होईल. दोन्ही पक्षांचे नेते अनुक्रमे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई महापालिकेवर सत्ता हवी आहे. त्यासाठीच्या व्यूहरचनेकरिता पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवडणुका लांबविल्या जात असल्याचेही बोलले जाते. गेली कित्येक वर्षे मुंबईवर उद्धव ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news