जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चालू महिन्यात देशात फाईव्ह जी सेवा सुरू होणार आहे. भारती एअरटेल ही देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ही सेवा सादर करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंगसोबत करार केले आहेत. दुसरीकडे जिओने 15 ऑगस्ट रोजी देशभरात फाईव्ह जी नेटवर्क सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटचा वेग वाढेल.

एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विठ्ठल म्हणाले की, देशातील ग्राहकांना फाईव्ह जी कनेक्टिव्हिटीचा पूर्ण लाभ देण्यासाठी कंपनी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भागीदारांसोबत काम करेल.

या सेवांचे दर किती असतील, याविषयी अद्याप अनिश्‍चितता आहे. भारती एअरटेलने या सेवेच्या लिलावात 43,084 कोटी रुपये किमतीच्या स्प्रेक्ट्रमसाठी बोली लावली. एकूण 4 कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओने सर्वाधिक म्हणजे 150,173 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांचा वाटा 58.65 टक्के आहे.

दूरसंचार मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, या सेवांचे दर या उद्योगातर्फ ठरवले जातील. त्यामुळे या दरवाढीची प्रतीक्षा करावी लागेल. याचे भाडे फोर जी च्या बरोबरीने आणण्यापूर्वी फाईव्ह जी सेवा सुरुवातीला 10 ते 15 टक्केच्या प्रीमियमवर ऑफर केल्या जातील, अशी उद्योग तज्ज्ञांची अपेक्षा आहे.
भारतात ही इंटरनेट सेवा सुरू झाल्याने बरेच काही बदलणार आहे. यामुळे लोकांचे काम तर सोपे होईलच; पण मनोरंजन आणि दळणवळण क्षेत्रातही खूप बदल होतील. एरिक्सन या फाईव्ह जी साठी काम करणार्‍या कंपनीचा विश्‍वास आहे की, येत्या 5 वर्षांत भारतात तिचे 50 कोटी इंटरनेट वापरकर्ते असतील.

फाईव्ह जी चे फायदे
वापरकर्ते जलद गतीचे इंटरनेट वापरू शकणार आहेत.
व्हिडीओ गेमिंगच्या क्षेत्रात त्याच्या आगमनामुळे मोठा बदल अपेक्षित.
व्हिडीओ हे बफरिंग किंवा न थांबता प्रवाहित करण्यात सक्षम असतील.
इंटरनेट कॉलमध्ये, आवाज अविरत स्पष्टपणे येईल.
2 जीबीचा चित्रपट 10 ते 20 सेकंदांत डाऊनलोड होईल.
कृषी क्षेत्रातील शेतांच्या देखरेखीसाठी ड्रोनचा वापर शक्य.
मेट्रो आणि चालकविरहित वाहने चालवणे सोपे होणार.
व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि कारखान्यांमध्ये रोबोटस् वापरणे सोपे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news