जागतिक दूध दिन विशेष : दुधाच्या महापुरात उत्पादकांच्या ‘गटांगळ्या’

जागतिक दूध दिन विशेष : दुधाच्या महापुरात उत्पादकांच्या ‘गटांगळ्या’

सांगली; विवेक दाभोळे : सुद‍ृढ आरोग्यासाठी दुधाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संयुक्‍त राष्ट्र संघटनेच्या वतीने 'युनो'च्या 'एफएओ'च्या (अन्‍न आणि कृषी संघटना) वतीने यावरच लक्ष केंद्रीत करत दरवर्षी एक जून रोजी जागतिक दूधदिन साजरा केला जातो. यातून दुधाचे महत्त्व, आहारातील गरज स्पष्ट करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यानिमित्ताने..!

देशात दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात दुधाचे वार्षिक उत्पादन 33 लाख टनांनी वाढले आहे. मात्र, राज्यातील दूध संघ केवळ दुधाच्या 'सायी'वर टपले आहेत, त्यामुळे दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादक आर्थिक संकटात गुरफटला आहे. राज्यकर्त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर दुग्ध व्यवसायासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते.

राज्यात गेल्या पंचवीस वर्षांत दुधाचे उत्पादन वेगाने वाढत आहे. राज्यात सन 1987-88 मध्ये प्रतिदिन दुधाचे संकलन 24 लाख 95 हजार 680 लिटर होते. मात्र, मे 2022 मध्ये हाच आकडा प्रतिदिन 1 कोटी 39 लाख 89 हजार 360 लिटर झाला आहे. यावरून राज्यातील दुग्ध व्यवसायाचा विस्तार लक्षात येईल.

दुभत्या पशुधनाची संख्या, प्रतिदिन प्रतिपशू दूध उत्पादन यातदेखील मोठी वाढ झाली आहे. सन 1992-93 मध्ये राज्यात म्हैस दूध उत्पादन प्रतिदिन 3.142 लिटर होते. आता मे 2022 अखेर प्रतिदिन म्हैस दूध उत्पादन 5.312 लिटर आहे. प्रतिदिन गाय दूध उत्पादनदेखील वाढत आहे. सन 2003-04 मध्ये प्रतिदिन गाय दूध उत्पादन 3.149 लिटर होते, आता मे 2022 मध्ये 4.650 लिटर आहे.

दूध उत्पादनाचा वाढता टक्‍का

राज्यात सुरुवातीपासून गाय दूध उत्पादन सातत्याने वाढते राहिले आहे. सन 1992-93 मध्ये 39 लाख 6 हजार टन गाय दुधाचे, तर 24 लाख 71 हजार 70 टन म्हैस दुधाचे उत्पादन झाले होते. सन 2020-21 मध्ये हाच आकडा तब्बल 33 लाख 1 हजार टनांनी वाढला. राज्यात 1 कोटी 37 लाख 3,000 हजार टन दुधाचे उत्पादन झाले होते.

उत्पादकांची खुलेआम लूट

आता दूध उत्पादकांना मिळणारा दुधाचा दर आणि उत्पादन खर्च याचे व्यस्त झालेले अर्थकारण चर्चेत आले आहे. राज्य शासनाच्या दुग्ध विकास विभागाने म्हैस आणि गाय दूध यासाठीचा प्रतिलिटर उत्पादन खर्च अनुक्रमे 40 रुपये आणि 28 रु. (3.50 फॅटसाठी) जाहीर केला आहे. दूध संघ चालक, खासगी व्यावसायिक दूध संकलन करताना दूध उत्पादकांकडून 6.5 फॅटचे म्हैस 43.30 रु. दराप्रमाणे खरेदी करतात. मात्र, हेच दूध प्रक्रिया करून ग्राहकांना प्रतिलिटर 56 ते 57 रुपयांना विकले जाते. गाय दूधदेखील (3.5 फॅटचे) खरेदी होते 27 रुपयांना आणि त्याची ग्राहकांना विक्री होते 46 रु. प्रतिलिटर प्रमाणे! यातील तफावत तब्बल 28 रुपयांची राहते. दूध संघ, संकलकांना खरेदीनंतर ते ग्राहकाला दूध विक्री करेपर्यंतचा खर्च पुढीलप्रमाणे : संस्था कमिशन – 1.20 रु., संकलन, शीतकरण – 4.80 रु., वाहतूक – 1.80 रु., वितरण वाहतूक – 4.65 रु. असा प्रतिलिटरसाठीचा हा खर्च 12.45 रु. होतो. मात्र, हाच खर्च सातत्याने चर्चेत राहतो आहे. याच दरम्यान, सरकी पेंड, गोळी पेंड, कडबा, ओला चारा यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. चाळीस किलोचे 900 रु. पेंडीचे पोते आज 1,400 रुपयांच्या घरात गेले आहे. तुलनेत दुधाला दर मिळत नाही.

ग्राहकांचीदेखील लूट 

राज्य शासन वेळोेवेळी म्हैस आणि गाय दुधासाठी प्रमाणित दर जाहीर करते. शासन निर्णयानुसार 6.00 फॅटचे दूध स्टँडर्ड मानले जाते. याचा दर 40 रु. प्रतिलिटर आहे. फॅटच्या पटीनुसार या पटीत खरेदी दर वाढून मिळतो. मात्र, दूध खरेदी करून, प्रक्रिया करून बाजारात मात्र याच (6.00 ते 6.50 फॅट) दुधाची विक्री होतेय तब्बल 57 ते 58 रुपयांनी. यातून विक्रेते आणि दूध संघांना 17 ते 18 रुपयांचा थेट नफा होतो. गाय दुधाची खरेदी 3.50 फॅट आणि 8.50 एसएनएफ स्टँडर्ड मानून निश्‍चित करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार 3.50 फॅटचा दर 27 रु. प्रतिलिटर आहे. मात्र, गाय दूध खरेदी करून, प्रक्रिया करून बाजारात मात्र याच (3.00 ते 3.50 फॅट) दुधाची विक्री होतेय तब्बल 56 ते 58 रुपयांनी!

किमान 35 रुपये दर द्या

वाढत्या उत्पादन खर्चामुळे सामान्यांना दुधाचे उत्पादन परवडत नाही. यासाठी दूध उत्पादकांना प्रतिलिटर किमान 35 रुपये दर मिळण्याची गरज आहे. दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी दुधाला एफआरपी निश्‍चितीची गरज आहे. दुधाला किमान 35 रुपये प्रतिलिटर दर द्यावा, शेतकर्‍यांची लूटमार थांबवण्यासाठी दुधाला एफआरपीचे धोरण लागू करावे, खासगी व सहकारी दूध क्षेत्राला लागू होईल, असा कायदा करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news