जागतिक आरोग्य दिन : आपली पृथ्वी, आपले आरोग्य!

जागतिक आरोग्य दिन : आपली पृथ्वी, आपले आरोग्य!

जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना 7 एप्रिल 1948 या दिवशी झाली . त्यास्मरणार्थ इ. स. 1950 पासून 'सात एप्रिल' हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो.

आपल्या आरोग्याच्या समस्या संपण्याची चिन्हे अजूनतरी दिसत नाहीत. उलट त्या वेगवेगळ्या पद्धतीने वाढतानाचेच चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना नावाच्या त्सुनामीने सारे जग हादरवून सोडले आहे. कोरोनाच्या महामारीने अनेकांची आयुष्ये विस्कळीत करून टाकली. कोरोनाने ज्यांना प्रत्यक्ष गाठले, त्यांचे आरोग्य काही कालावधीसाठी बिघडून गेले. अजूनही अनेक जण त्याची झळ सोसत आहेत. काहीजणांना इहलोकीची यात्रा जिथल्या तिथे सोडून जावे लागले. कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यावसायिक नुकसान झाले, त्यातून आर्थिक – सामाजिक – कौटुंबिक – मानसिक स्वास्थ्य बिघडले.

एखादी आरोग्यसमस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी काय करता येईल, त्याबाबत विविध मुद्यांवर अवलोकन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी काही उपक्रम राबवते आणि त्यासाठी एक घोषवाक्य जाहीर करते. गेल्या वर्षीप्रमाणेच याहीवर्षीचे घोषवाक्य कोरोनाशी संलग्न आहे. यावर्षीचे WHO चे घोषवाक्य आहे, Our Planet, Our Health म्हणजेच आपली पृथ्वी, आपले आरोग्य.

कोरोनाचा विषाणू वटवाघळांमधून माणसांमध्ये आला, असा अंदाज आहे. चीनमधल्या मासळीबाजारात केवळ मासेच नव्हे तर, कोंबड्यांपासून डुकरे, कुत्री आणि अनेक प्रकारच्या जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात ना शिस्त, ना स्वच्छता, ना पाण्याची व्यवस्था. एखादा विषाणू जेव्हा अनेक वर्षे विशिष्ट प्राण्यांमध्ये किंवा पक्षांमध्ये वास करून राहतो आणि अचानकपणे तो त्याची नेहमीची वस्ती सोडून माणसांमध्ये प्रवेश करतो, याला कारण माणसाची प्रवृत्ती.

चिनी माणसाची कोणताही प्राणी कशाही पद्धतीने खाण्याची प्रवृत्ती हे विषाणूंचा माणसात प्रवेश होण्याचे एक कारण असावे. कोरोनाविषाणू कुठून आणि कसा आला, याबद्दल संशोधन सुरूच आहे. पण प्रचंड वेगाने वाढत असलेली लोकसंख्या हे अनेक प्रकारचे विकार वाढण्याचे मूळ कारण आहे. या लोकसंख्येला जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न लागते. राहण्यासाठी जागा आणि त्याच्या सर्व गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारची साधनसामुग्री लागते.

माणसांची संख्या एवढ्या वेगाने वाढली आहे की, त्यांना लागणारे स्वच्छ पाणी, सकस अन्न आणि त्यांच्या मलमूत्र विसर्जनाची आरोग्यदायी व्यवस्था याचा कुठेच पत्ता दिसत नाही. गेल्या काही वर्षांत जगाच्या कानाकोपर्‍यात प्रदूषणाने परिसीमा गाठली आहे. हवा, पाणी आणि अन्न यांचे पावित्र्य तर पार बिघडून गेले आहे. परिणामी केवळ या प्रदूषणामुळे रोगराई प्रचंड वाढली आहे. प्रगतीच्या नावाखाली गेल्या पन्नास वर्षांत माणसाने निसर्गावर प्रचंड आक्रमण केले आहे. जी झाडे-जंगले जतन करायला हवी होती, ती तोडल्यामुळे आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह माणसांनी अडवल्यामुळे वा बुजविण्यामुळे वारंवार पूर परिस्थिती निर्माण होत आहे.

अतोनात जंगल तोडीमुळे आणि प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे जागतिक तापमानवाढ झाली आहे. त्यामुळे बर्फाचे पर्वत वेगाने वितळत आहेत. समुद्राची पातळी येत्या काही वर्षांत वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या भागात पूर येऊन जातो, त्या भागात पुरापाठोपाठ डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया यासारखे रोग हातपाय पसरतात.

तापमान वाढीमुळे जगभरात दरवर्षी 13 लाख लोक मृत्युमुखी पडतात. जवळपास वीस कोटी लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे दरवर्षी तब्बल आठ लाख व्यक्तींचा मृत्यू गॅस्ट्रोसदृश जुलाब-अतिसार यामुळे होतो. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे अनेक प्रकारचे विकार उद्भवतात. यात सीओपीडी, दमा, आयएलडी यासारखे विकार तर होतातच पण त्याशिवाय फुफ्फुसाचा कॅन्सर, हृदयविकार आणि पक्षाघात यासारखे विकार होण्याच्या शक्यता बळावतात. केवळ वायुप्रदूषणामुळे जगभरात दर मिनिटाला तेरा व्यक्ती बळी पडतात.

सजीव सृष्टी असलेली आपली एकच पृथ्वी आहे. तिचे आरोग्य जपायला हवे. तिचे आरोग्य नीट राहिले तर आपले आरोग्य नीट राहील. आपल्याला प्रगती हवी आहे. ती करायलाच हवी. पण ती कशाच्या बदल्यात? सजीव सृष्टीचा विनाश करून भौतिक सुखसुविधांची रेलचेल करणे योग्य नाही. आज माणसाचे जगणे आरामदायी झाले आहे, पण ते आनंददायी झाले आहे का? याचे उत्तर 'नाही' असे येते. ते 'होय' असे यायचे असेल तर, आपल्या पृथ्वीला सांभाळायला हवे. आपला परिसर सांभाळायला हवा. आपल्या भोवतालचे प्रदूषण कमी करायला हवे. मी एकटा काय करू शकणार? असा नकारात्मक विचार न करता प्रत्येकाने आपापल्या परीने प्रदूषण टाळायचा प्रयत्न केला तर, सारे काही शक्य आहे.

जागतिक आरोग्य दिन साजरा करणे म्हणजे दुसरे काही नसून, आपल्या परीने आपण पर्यावरणपूरकजगणे होय.

डॉ. अनिल न. मडके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news