बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांनी भाजपशी असणारे सर्व संबंध तोडण्याचा निर्धार केला आहे. सामान्यांच्या दबावामुळे आपण नवा राजकीय पक्ष स्थापन करत आहे. कल्याण कर्नाटक प्रगती पक्ष असे आपल्या पक्षाचे नाव असेल, असे त्यांनी रविवारी जाहीर केले. रेड्डी पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, सर्वांना समान न्याय मिळवून देणे आणि सर्वांचे जीवन सारखे बनवणे हाच उद्देश आहे. त्यानुसार विकासकामे हाती घेण्यात येतील. जाती, धर्माचे राजकारण बाजूला ठेवून विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. संपूर्ण राज्यात घरोघरी पक्ष पोहोचवण्यात येईल. आतापर्यंत हाती घेतलेल्या कामात कधीच अपयश आले नाही. नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर प्रचंड समर्थन मिळेल. भाजपशी असलेले संबंध आज संपले आहेत. वाजपेयी, अडवाणी, येडियुराप्पा, श्रीरामुलू यांच्यासह अनेक नेत्यांचे स्मरण करून आज पक्षत्याग करत आहे. येडियुराप्पा आणि श्रीरामुलू यांच्याबाबत चांगली विधाने केली आहेत. यामुळे त्यांना आपल्या पक्षात येण्याचे आवाहन केल्याचा गैरसमज करून घेऊ नये, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत गंगावती मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहे. त्या ठिकाणी घर घेतले आहे. मतदारयादीत नाव समाविष्ट करून घेतले आहे. कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. पुढील १५ दिवसांत पक्षाचे चिन्ह, लोगो, कार्यालय आणि उमेदवार आदी माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.