छाती कफमुक्‍त करण्यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय

छाती कफमुक्‍त करण्यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय
Published on
Updated on

छातीत कफ साठल्यानंतर कमालीचे अस्वस्थ व्हायला होते. यावर वेळीच काही उपाय न केल्यास श्‍वसनमार्गात संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्या व्यक्‍तीच्या छातीत कफ साठलेला असतो त्यांना छातीत दुखणे किंवा घसा दुखणे असे त्रास होतात. तसेच कफवृद्धी होणे असे त्रास होतात त्यामुळे छाती जड होते. काही वेळा परिस्थिती इतकी कठीण असते की अन्‍न गिळणेसुद्धा कठीण होऊन बसते.

अनेक वर्षांपासून भारतामध्ये अनेक आजारांवर घरगुती उपाय केले जातात. ते अगदी साधे साधे असतात. आजारांना बरे करण्याची क्षमता तर असतेच; पण या उपायांचे आरोग्यासाठी अनेक फायदेही असतात. अशाच काही साध्या, पण परिणामकारक औषधांची यादीच इथे पाहू. या उपचारांमुळे कफाने भरलेली छाती मोकळी होण्यास मदत होते.

मध आणि लिंबाचा रस-

एक ग्लास गरम पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळा. असे गरम पाणी दिवसातून 2-3 वेळा प्यावे. मध हे नैसर्गिकरीत्याच डीकन्जेस्टंट आहे. शिवाय मधामुळे घसा, छाती यांना आराम मिळतो तर लिंबामध्ये सी जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रतिकारक्षमतेत वाढ होण्यास मदत होते.

कोमट दूध ः कोमट दुधात मध, हळद आणि काळी मिरी घालून दूध प्यायल्यास छातीचा संसर्ग आणि सर्दी कमी होण्यास मदत होते. हळद जंतुविरोधी असते आणि दाह कमी करण्याचे गुणधर्मही हळदीत आहेत. त्यामुळे जीवाणू मारण्यास मदत होते तर काळी मिरी पचनास मदत करते आणि सर्दी, खोकला कमी करण्यास फायदेशीर असते. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा प्यावे.

कोमट पाणी ः कोमट पाणी प्यायल्याने घशाला आराम पडतोच; पण भरलेली छाती मोकळी होण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्याने छातीतील आणि श्‍वसनमार्गातील कफाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि छातीतील संसर्ग कमी होतो.
गरम पाण्याच्या गुळण्या ः कफाने भरलेल्या छातीसाठी आणि घशाला झालेल्या संसर्गासाठी हा घरगुती उपाय एकदम लागू होतो. एक

ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून त्या पाण्याने 1-2 मिनिटे गुळणा कराव्यात. अशाप्रकारे दिवसातून तीन ते चारवेळा गुळणा कराव्यात. गुळणा करताना पाणी पिऊ नये ते थुंकून टाकावे.

चहा प्यावा ः आले, पुदीना किंवा रोझमेरी चहा घेतल्यास त्याचा खूप फायदा होतो. साखरेऐवजी चहात मध घातल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. जर चहाप्रेमी नसाल तर आल्याचा छोटा तुकडा चघळू शकता.

वाफ घेणे ः निलगिरी तेलाचे थोडे थेंब पाण्यात टाकूनही भरलेली छाती मोकळी होण्यास मदत होते. दीर्घ श्‍वास घेऊन निलगिरीची वाफ घ्या. चोंदलेले नाक आणि छाती मोकळी होण्यास मदत होईल. निलगिरी तेलामध्ये अनाल्जेसिक गुणधर्म असतात आणि जीवाणूविरोधी गुणधर्म छाती मोकळी होण्यास मदत करतात.

हळद ः एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने गुळणा कराव्यात. हळदीमध्ये कुरक्युमिन नावाचा घटक असतो, त्यामुळे कफ विरघळण्यास मदत होते. त्यामुळे भरलेली छाती मोकळी होण्यात मदत होते तसेच सर्दीचे जीवाणू मारण्यासही हळद मदत करते, त्यामुळे सर्दी आणि खोकल्यावर हळद गुणकारी असते.

कांद्याचा रस ः कांद्याचा तिखट वास आणि कडू चव आवडणार नाही; पण भरलेल्या छातील कांद्याचा रस हा उत्तम उपाय आहे. कांद्यातील क्युरसेटीन कफ काढून टाकण्यास मदत करते, शिवाय कफ तयार होण्यापासून मज्जाव करते. कांद्यामध्ये अँटिमायक्रोबियल गुणधर्म असल्याने संसर्ग होण्यापासूनही बचाव होतो. कांद्याचा रस काढून त्यात लिंबाचा रस, मध आणि पाणी मिसळा. हा रस उकळून हे मिश्रण दिवसातून तीन ते चारवेळा प्यावे.

वरील सर्व उपाय हे नैसर्गिक असल्याने ते मूळ स्वरूपात असतात. त्यामुळे हे करून पाहण्याआधी डॉक्टरी सल्ला घेणे कधीही उत्तम.

डॉ. भारत लुणावत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news