छत्रपती संभाजीराजे : महापराक्रमी, सुसंस्कृत राजा

छत्रपती संभाजीराजे : महापराक्रमी, सुसंस्कृत राजा

छत्रपती संभाजीराजे जसे रणांगण गाजविणारे होते, तसेच ते राजनीती, डावपेच यामध्येदेखील निपुण होते. ज्यांच्या धाडसी राजकारणाला वयाच्या आठव्या वर्षी सुरुवात झाली, असा जगातील एकमेव राजपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर न थकता सतत नऊ वर्षे मोगल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंविरुद्ध संभाजीराजे लढत होते. संभाजीराजांनी मोगल फौजांना, साक्षात औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले.

औरंगजेब संभाजीराजे यांच्यासमोर हतबल झाला. त्याने डोक्यावरील विमॉश खाली उतरवला आणि संभाजीचे पारिपत्य केल्याशिवाय तो डोक्यावर धारण करणार नाही, अशी शपथ घेतली, अशा प्रकारची नोंद कारपारकर इंग्रज 1682 च्या पत्रात करतात. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शंभूराजे दोन वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाई यांचे निधन झाले. कमी वयातच संभाजीराजेंनी पराक्रमी, कणखर, निर्भीड वृत्ती प्राप्त केली. पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजे मोगलांच्या गोटात ओलीस गेले. त्याप्रसंगी संभाजीराजांचे धैर्य, निर्भीडपणा, बाणेदारणा, स्वाभिमान, हजरजबाबीपणा, चातुर्य, सौजन्यशीलता, समयसूचकता यांचे वर्णन समकालीन निकोलाओ मनुचीनी केलेले आहे. आईच्या निधनानंतर आजी जिजाऊ, वडील शिवाजीराजे आणि सावत्र मातांनी शंभूराजांची हेळसांड होऊ दिली नाही. जिजाऊंनी त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. शिवरायांचे शौर्य-पराक्रम आणि राजनीती हे संभाजीराजांचे विद्यापीठ, प्रेरणापीठ होते. त्यांचे बालपण खेळण्या-बागडण्यात नव्हे तर स्वराज्यनिर्मितीच्या घडामोडीत गेले. त्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर जबाबदारी पडलेली होती. शंभूराजे वयाच्या नवव्या वर्षी वडिलांबरोबर आगर्‍याला गेले. तेथील राजकारण, शिवरायांचा बाणेदारपणा-निर्भीडपणा याचे बाळकडू त्यांना मिळाले. जीवघेण्या नजरकैदेतून निसटल्यानंतर संभाजीराजे मथुरा-वाराणसीमार्गे स्वराज्यात आले. इतक्या बालवयात त्यांना जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागूनही संभाजीराजे डगमगले नाहीत, हतबल झाले नाहीत, नाउमेद झाले नाहीत. संकटांचे डोंगर पार करून जाण्याचे शिक्षण त्यांना बालपणापासूनच मिळालेले होते. अ‍ॅबे कॅरे हा संभाजीकालीन फे्ंरच पर्यटक भारतात आलेला होता. त्याने संभाजीराजांना जवळून पाहिले होते. तो म्हणतो संभाजींसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात पाहिला नाही. संभाजीराजांच्या शारीरिक सौंदर्याच्या वर्णनाबरोबरच त्यांच्या शौर्याचे, पराक्रमाचे, विद्वत्तेचे वर्णन तो मोठ्या उदार अंत:करणाने करतो. वयाच्या दहाव्या वर्षी शिवरायांनी शंभूराजांना गुजरात मोहिमेवर पाठविले होते. त्याप्रसंगी संभाजीराजे आपल्या सैनिकांशी कसे वागले याचेही वर्णन कॅरे करतो. संभाजीराजे आपल्या ज्येष्ठ सरदारांशी अत्यंत आदराने वागतात. सरकारी सैनिकांना अत्यंत प्रेमाने वागवितात. जखमी सैनिकांची स्वत: विचारपूस करून त्यांना आस्थेने मदत करतात. संभाजीराजांच्या पराक्रमाबरोबरच त्यांच्या विनयशील आणि प्रेमळ स्वभावाचेही अ‍ॅबे कॅरे वर्णन करतो. संभाजीराजांना पराक्रमाचा, विद्वत्तेचा अहंकार नव्हता, बडेजाव नव्हता. आजोबा शहाजीराजे, आजी जिजाऊ, वडील शिवाजीराजे यांचे संस्कार त्यांना लाभले होते. 'बुधभूषण' या ग्रंथात त्यांनी आपल्या वडिलांच्या गुणवत्तेचे प्रतिभाशाली भाषेत वर्णन केलेले आहे. शंभूराजे जसे तलवारबाजीत निपुण होते, युद्धकलेत निष्णात होते, राजकारणात मुत्सद्दी होते, तसेच ते बौद्धिक श्रेत्रात महाविद्वान होते. ज्ञानार्जन ही कोणाची मक्तेदारी नाही हे संभाजीराजांनी दाखवून दिले. त्यांनी विविध भाषांवर प्रभुत्व संपादन केलेेले होते. ते केवळ पारंपरिक संस्कृत पंडित नव्हते, तर ते अवैदिक (तांत्रिक) विचारांचे होते, असे महान प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात. त्यामुळेच ते सनातनी मंत्र्यांच्या विरुद्ध भूमिका घेऊ शकले. संभाजीराजांनी 'बुधभूषण' नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. परंतु, आजचा बुधभूषण प्रक्षिप्त आहे, असे शरद पाटील सांगतात. संभाजीराजांनी केवळ संस्कृतच नव्हे तर हिंदी, पर्शियन, इंग्रजी भाषांवरदेखील प्रभुत्व संपादन केलेले होते. त्यांनी नखशिख, नायिकाभदे आणि सातसतक हे तीन हिंदी ग्रंथ लिहिले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या शिष्टमंडळाबरोबरच ते रायगडावर इंग्रजीमध्ये बोललेले आहेत. यावरून स्पष्ट होते की, संभाजीराजे महाबुद्धिमान, विवेकी राजकारणी होते. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संभाजीराजांनी राज्यकारभार केला. दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवरायांनी संभाजीराजांना सोबत न घेता, कोकणची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. संभाजीराजांना रायगडावर ठेवणे धोकादायक होते, याचा निर्देश समकालीन परमानंद शिवभारत या ग्रंथात करतो.

संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले हा त्यांचा उथळपणा, स्वराज्यद्रोह, किंवा स्वार्थ नव्हता, तर ते दूरद़ृष्टीचे राजकारण होते. मुळात संभाजीराजे आणि दिलेरखान यांचे चांगले संबंध होते. शरद पाटील म्हणतात की, संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले नसते, तर मंत्र्यांनी तेव्हाच त्यांचा घात केला असता. संभाजीराजांना पकडून आगर्‍याला पाठवा, असे दिलेरखानाला औरंगजेबाचे फर्मान असतानादेखील दिलेरखानाने संभाजीराजांना निसटून जाण्यास वाट दिली, असे समकालीन कृष्णाजी अनंत सभासद सांगतो. निसटल्यानंतर शिवाजीराजे-शंभूराजांची भेट पन्हाळगडावर झाली. त्याप्रसंगी संभाजीराजे शिवरायांना म्हणतात "दूधभात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन, पण राज्याची वाटणी नको" यावरून स्पष्ट होते की, संभाजीराजे सत्ताभिलाषी किंवा स्वराज्यद्रोही नव्हते.

शिवरायांच्या निधनानंतर नाउमेद न होता स्वराज्याचे रक्षण करण्याचे महान कार्य संभाजीराजांनी केले. तो काळ कठीण होता. खुद्द औरंगजेब सुमारे पाच-सात लाखांची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. पोर्तुगीज, आदिलशहा, सिद्दी आणि स्वराज्यातील मंत्री अशा अनेक शत्रूंविरुद्ध संभाजीराजांना लढावे लागले. याप्रसंगी संभाजीराजे फक्त 23 वर्षांचे होते; पण न डगमगता त्यांनी सुमारे नऊ वर्षे मोगलांना सळो की पळो करून सोडले. संभाजीराजांच्या पराक्रमाने घायाळ झालेला मोगलांचा दरबारी इतिहासकार खाफीखान लिहितो, संभाजी हा मोगलांसाठी वडिलांपेक्षा दहा पटींनी तापदायक होता.

संभाजीराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोवा जिंकण्यासाठी मांडवी नदी पार करून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोर्तुगीज घाबरून सेंट झेविअरच्या शवापाशी जाऊन धावा करू लागले. बुर्‍हाणपुरावर हमला करून औरंगजेबावर वचक निर्माण केला. औरंगजेब पुत्र शहजादा अकबर हा संभाजीराजांच्या आश्रयाला आला होता. त्याने संभाजीराजांना शेवटपर्यंत साथ दिली. अकबराला समुद्रमार्गे इराणला पाठवून दिल्ली काबीज करण्याचे संभाजीराजांचे नियोजन होते. ज्याप्रमाणे शिवरायांनी दक्षिण भारत जिंकला, त्याप्रमाणे उत्तर भारत जिंकण्याचे नियोजन संभाजीराजांनी केले होते.

रात्रंदिन युद्धमोहिमेवर असणार्‍या संभाजीराजांनी राजधानीची जबाबदारी महाराणी येसुबाई यांच्याकडे दिलेली होती. त्यांच्या नावाचा शिक्का 'श्री सखी राज्ञी' देऊन त्यांना कुलमुखत्यावर केले आणि स्वराज्याचे सर्वाधिकार त्यांना दिले. आपल्या सर्व सावत्र मातांना अत्यंत आदराने-सन्मानाने वागविले. धाकटे सावत्र बंधू राजाराम महाराजांना अत्यंत प्रेमाने वागवले. त्यांचे तीन विवाह संभाजीराजांनी लावून दिले. राजारामाची महाराणी ताराबाईंना युद्धकला-राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. स्वराज्यातील, परराज्यातील महिलांचा आदर सन्मान केला. संभाजीराजे म्हणतात, जो प्रयत्नवादी असतो तो पुरुषसिंह असतो आणि ज्यांचा देवावर विश्वास असतो त्याला दुबळा म्हणतात. यावरून स्पष्ट होते की, संभाजीराजे बुद्धिप्रामाण्यवादी होते. संभाजीराजे गोरगरीब प्रजेचा आधारवड होते. अशा संभाजीराजांना दोन वेळा ठार मारण्याचा प्रयत्न मंत्र्यांनी केला होता. शेवटी औरंगजेबाने संभाजीराजांना तुळापूर – वडू (बु) या ठिकाणी अत्यंत निर्दयपणे ठार मारले याप्रसंगी संभाजीराजांचे वय अवघे 32 वर्षांचे होते. संभाजीराजे जगले असते, तर उत्तर भारत जिंकला असता इतके ते शूर, पराक्रमी, दूरद़ृष्टीचे प्रजावत्सल राजे होते. अशा प्रजावत्सल, महापराक्रमी, सुसंस्कृत राजाला विनम— अभिवादन!

– डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news