सांगोला ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलचे दर वाढवल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्रात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने कारभार चालतो. देशाचे कृषिमंत्री कोण आहेत हे मलाही माहिती नाहीत. त्यामुळे शेतकर्यांसाठी योग्य निर्णय ते घेऊ शकत नाहीत. शेतकरी देशोधडीला लागला आहे, अशी टीका अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.
महूद ता. सांगोला येथे शेतकरी परिषदेच्या वेळी मार्गदर्शन करताना छगन भुजबळ बोलत होते. शेतकर्यांच्या डाळिंबाचे मर व बोअर किडीने अतोनात नुकसान झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये मंत्री व अधिकार्यांची तात्काळ बैठक घेऊन उपाय योजना केली जाईल. यासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतले जाईल असे ते म्हणाले. निश्चितपणे डाळिंब पुनर्लागवडीसाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, जलतज्ञ राजेंद्र सिंह, डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, अभिनेते चिन्मय उदगीरकर आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, देशामध्ये अन्नधान्याची कमतरता नाही. भारताकडून श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा केला आहे. त्याचबरोबर सध्या डाळिंब द्राक्ष आदी पिकांवर विविध रोगामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचे हजार हेक्टर क्षेत्र आहे.
यापैकी 70 टक्के क्षेत्रावरील डाळिंब पीक मर व पिन होल बोरर या रोगामुळे नष्ट झाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे यावर मार्गकाढण्यासाठी व शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शरद पवार यांच्याशी चर्चा करून तात्काळ मंत्रिमंडळ व संबंधित वरिष्ठ अधिकार्यांची बैठक लावून डाळिंब पिकाच्या नुकसानीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल व शेतकर्यांना यामध्ये कशी मदत करता येईल हे पाहिले जाईल.
महुद गावातील ग्रामस्थांनी एकी करून व निधी उभारून गावाच्या शेजारून वाहणार्या ओढ्याचे पुनर्जीवन केले आहे. यामुळे या भागातील शेती पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे हे सर्व श्रेय ग्रामस्थांची आहे असे ते म्हणाले. शेतकरी परिसंवादाच्या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्य सरकारच्या चांगल्या कामामुळे भाजपची पोटदुखी
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार समाजातील सर्व घटकांसाठी अतिशय चांगले काम करत आहे.मात्र जनतेच्या हितासाठी काम करणार्या या सरकारला कामच करू द्यायचे नाही असा उद्योग नाव न घेता भाजपाने चालवला आहे असा आरोप मंत्री भुजबळ यांनी लगावला आहे.