चीनमध्ये कोरोना सुनामी, बीजिंगमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट

चीनमध्ये कोरोना सुनामी, बीजिंगमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट

बीजिंग; वृत्तसंस्था :  कोरोनाच्या नवीन विषाणूने चीनमध्ये रुग्णसंख्येची सुनामी आली आहे. राजधानी बीजिंगमध्ये या साथीने शिखर गाठले आहे; तर इतर शहरांचीही साथीच्या विस्फोटाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. दरम्यान, चीन सरकारने कोरोनाबाधितांची सरकारी आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात चीनमधील कोरोनाची नेमकी स्थिती समजणे आणखीच अवघड होणार आहे.

2019 मध्ये चीनच्या वुहानमधून कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली. सार्‍या जगाला कोरोनाने तब्बल दोन वर्षे वेठीला धरल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाच्या साथीने हाहाकार उडवला आहे. मागील तीन महिन्यांपासून तेथे या वेळच्या लाटेने आता जवळपास शिखर गाठले आहे.

आरोग्य यंत्रणा कोलमडली

विविध माध्यमांतून मिळणार्‍या माहितीनुसार राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तेथे लाटेने शिखर गाठल्याचे सांगण्यात येते तर इतर शहरेही त्याच मार्गावर आहेत. दोनच दिवसांपूर्वी एकाच दिवसात 3 कोटी 70 लाख लोक कोरोनाने बाधित झाल्याने कोरोनाच्या सुनामीने चीनची आरोग्य व्यवस्था पुरती उद्ध्वस्त झाल्याचे दिसते. 1 ते 20 डिसेंबर या 20 दिवसांतच
24 कोटी 80 लाख चिनी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

ग्रामीण भागाला धोका

तज्ज्ञांनी सांगितले की, या लाटेचा सर्वाधिक फटका चीनच्या शहरांना बसला आहे. तेथे आता ही लाट शिखर गाठण्याच्या अवस्थेला आली आहे. पण पुढच्या टप्प्यात ही लाट ग्रामीण भागात पसरणार असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आले आहे. तसे झाल्यास तुटपुंज्या आरोग्य यंत्रणेमुळे त्या भागातील उद्रेक अधिक भयावह असू शकतो.

लस प्रभावी नसल्याचा परिणाम

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार चीनने आपल्याच देशात तयार केलेली लस नागरिकांना दिली. इतर देशांच्या लसींवर बंदी घालण्यात आली होती. मुळात चीनची लस तेवढी परिणामकारक नसल्याने कोरोनाच्या नव्या लाटेत प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी होत आहे.

चीनची लपवाछपवी

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून चीन रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यांबाबत लपवाछपवी करत आहे. खरी आकडेवारी व तपशील समोर येत नसल्याने इतर देशांनाही आपली रणनीती आखण्यात अडचणी येत आहेत. या वेळच्या लाटेतही चीनने हीच लपवाछपवी केली आहे. रोज लाखो लोकांना बाधा आणि शेकडो लोकांचा बळी जात असताना चीन मात्र लागण झालेल्या व मृतांचा आकडा तीन हजारांच्या पुढे नसल्याचेच म्हणत आहे.

दावा खोटा निघाला

चीनच्या आरोग्य मंत्रालयाशी संबंधित एका बैठकीत आकडेवारी सांगण्यात आली. त्यानुसार 1 ते 20 डिसेंबर या कालावधीत चीनची 18 टक्के लोकसंख्या म्हणजे 24 कोटी 80 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होते. हा अहवालच माध्यमांत लीक झाला. रेडिओ फ्री एशियाने हा अहवाल अधिकृत असल्याचे सांगितल्याने चीनचे पितळ उघड पडले. त्यामुळे यापुढे कोरोना बाधितांची कोणतीही आकडेवारी जाहीर केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

चीनमध्ये काय सुरू आहे

राजधानी बीजिंगसह चीनमधील शांघाय, चेंगडू, सिशुआन यांसह सर्वच मोठ्या शहरांची लोकसंख्या प्रचंड मोठी आहे. तेथे कोरोनाचा भयंकर उद्रेक झाला आहे. सर्व रुग्णालयांची आयसीयूची क्षमता संपली असून उपचारासाठी नागरिकांना सैरावैरा धावावे लागत आहे.
अनेक ठिकाणी आयसीयूमध्ये जमिनीवर रुग्णांना झोपवून उपचार सुरू आहेत; तर कोरोनाची बाधा झालेले डॉक्टरच रुग्णांवर उपचार करत आहेत. रुग्णालयांत जागा नसल्याने रस्त्यावर चक्क दोरी बांधून रुग्णांना सलाईन दिले जात असल्याचे नुकतेच समोर आले आहे. बीजिंग आणि चेंग डू शहरांत मृतदेह ठेवण्यासाठी जागा नसल्याने कापडात गुंडाळलेल्या मृतदेहांचे ढिगारे रचून ठेवण्यात आले आहेत. अतिगंभीर रुग्णांना लागणार्‍या रक्ताचीही टंचाई निर्माण झाली असून अवघा दोन दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. औषधांच्या दुकानांत औषधांचा साठा जवळपास संपला असून जीवनावश्यक औषधांसाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तूंची व फळांची टंचाई निर्माण झाली असून त्यावरून काही शहरांत हिंसाचारही झाला आहे. चीन सरकार मृतांचा आकडा अत्यंत कमी दाखवत असले तरी स्मशानांत अंत्यसंस्कारांसाठी लागलेल्या मृतदेहांच्या रांगा पाहता ही व्यवस्थाही पुरती खोळंबली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news