चीनने अंतराळात घेतले भाताचे पीक!

चीनने अंतराळात घेतले भाताचे पीक!

बीजिंग : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वेगवेगळ्या वनस्पती किंवा पिके उगवण्याचा प्रयोग सातत्याने केला जात असतो. आता चीनने स्वतःच्या अंतराळ स्थानकातही हा प्रयोग केला आहे. चीनच्या तियानगोंग अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांनी तिथे भाताचे रोप उगवण्यात यश मिळवले आहे. भाताचे बीज पेरून हे रोप उगवण्यात आले. याशिवाय थेल क्रेस नावाची एक वनस्पतीही स्थानकात उगवण्यात त्यांना यश आले. ही वनस्पती कोबी व ब्रसल्स स्प्राऊटसारख्या हिरव्या भाज्यांसारखी आहे.

चिनी विज्ञान अकादमीने (सीएएस) एका वृत्तवाहिनीला सांगितले की एका महिन्यात थेल क्रेसच्या रोपाला काही पाने आली. तसेच लांब देठाची धान्याची रोपे 30 सेंटीमीटर व छोट्या देठाची भाताची रोपे 5 सेंटीमीटरपर्यंत वाढली. चिनी अंतराळवीरांनी अंतराळात विविध प्रकारच्या पालेभाज्या उगवण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, चीनच्या तियानगोंग अंतराळ स्थानकातील शून्य गुरुत्वाकर्षण प्रयोगशाळेत सुरू असणारे हे प्रयोग अत्यंत यशस्वी ठरले आहेत.

प्लांट कल्टिव्हेशन एक्सपिरिमेंटच्या माध्यमातून अंतराळ स्थानकात असलेल्या 'शेनझू-14' क्रूमधील अंतराळवीरांकडून या रोपांच्या जीवनचक्राचा अभ्यास केला जाणार आहे. रोपांची गुणवत्ता अधिक चांगली करण्यासाठी अंतराळातील वातावरणाची कशी मदत घेता येईल, हे संशोधकांना पहावयाचे आहे. अंतराळात उगवण्यात आलेली ही रोपे वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरपर्यंत पृथ्वीवर आणली जातील. ही रोपे वाढण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. त्यानंतर त्यांची तुलना पृथ्वीवर उगवण्यात आलेल्या धान्याच्या रोपाशी केली जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news