चीनचे आव्हान!

चीनचे आव्हान!
Published on
Updated on

चीनने तिबेटमधील प्रमुख हवाई तळांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि लढाऊ विमाने तैनात केल्याच्या वार्तेमुळे चीनचा धोका पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. भारतासाठी चीन हा पाकिस्तानपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे वारंवार सिद्ध होऊ लागले असून, चीनच्या कारवायांमुळे भारताची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आर्थिक महासत्ता बनलेल्या चीनचा अहंकार टोकाला पोहोचल्यामुळे शेजारी राष्ट्रांच्या कुरापती काढून उपद्रव देण्याचे सत्र चीनने सुरू ठेवले आहे.

गेल्या दोन वर्षांत चीनकडून भारतासाठी वाढलेला उपद्रव लक्षणीय म्हणण्याजोगा आहे. भारताच्या सबुरी आणि सहिष्णुतेचा गैरफायदा चीनकडून घेतला जात आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटल्याप्रमाणे, सध्याचा भारत हा 1962चा भारत नाही, तर 2022 चा नवा भारत आहे, हे चीनने ध्यानात घ्यावयास हवे. भारताने प्रारंभापासून उपखंडातील शांततेला प्राधान्य दिले आहे आणि त्यासाठी प्रसंगी दोन पावले मागे घेण्याची तयारीही दर्शवली. परंतु पाकिस्तान असेल किंवा चीन हे दोन्ही देश भारताच्या या सबुरीचा गैरअर्थ काढतात. पाकिस्तान समोरासमोर लढाईसाठी येण्याऐवजी छुप्या पद्धतीने उपद्रव सुरू ठेवतो.

काश्मीर खोर्‍यातील फुटीरतावाद्यांना रसद पुरवणे किंवा सीमेपलीकडून दहशतवादी घुसवून शांतता भंग करणे अशा कारवाया पाकिस्तान करीत असतो. याउलट चीनने थेट समोरासमोरच आव्हान उभे केले आहे. दोन वर्षांपूर्वी गलवान खोर्‍यात चीनने घुसखोरी केली आणि आता अरुणाचल प्रदेशालगतच्या तवांग सेक्टरमध्ये उपद्रव सुरू केला. गलवान खोर्‍यातील चकमकींनंतर दोन्ही देशांमधील संबंध एवढे ताणले गेले होते की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही आंतरराष्ट्रीय मंचावर एकत्र आले असताना त्यांनी

परस्परांकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. काळाबरोबर परिस्थिती सुधारत गेली आणि महिनाभरापूर्वी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दोघांमध्ये हस्तांदोलन झाले. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये छोट्या-छोट्या सांकेतिक गोष्टींना फार महत्त्व असते आणि मोदी-जिनपिंग हस्तांदोलन ही त्याअर्थाने मोठी घटना मानली जात होती. त्यानंतर खरेतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती; पण झाले उलटेच ! चीनने तवांग परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला. घुसखोरी करणार्‍या चीनच्या सैनिकांना भारतीय वीरांनी चोख प्रत्युत्तर देऊन पिटाळले. त्यात दोन्ही बाजूंकडील काही सैनिक जखमी झाले.

चीनच्या भारतीय हद्दीतील घुसखोरीचा मुद्दा संसदेच्या अधिवेशनातही गाजला. तवांग सेक्टरमध्ये हिंसक चकमकी होत असताना चीनच्या हवाई हालचालींमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या असून, त्या भारताची चिंता वाढवणार्‍या आहेत. संसदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या निवेदनात, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला असल्याचे सांगितले होते, त्यांचे हे वक्तव्य सीमेवरील स्थितीचे गांभीर्य स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. विरोधकांनी संसदेत त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला आहे.

भारत-चीन सीमेवर बरेच काही घडत असताना आणि देशाच्या संसदेतही त्यावरून घमासान चर्चा होत असताना भारतासाठी काळजी करायला लावणारी आणखी एक बातमी आली. चीनने तिबेटमधील प्रमुख हवाई तळांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि लढाऊ विमाने तैनात केली असल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. त्यांच्या रेंजमध्ये भारताच्या ईशान्य भागाचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. चीनच्या वाढत्या हवाई कारवायांची दखल घेऊन भारतीय वायुसेना अरुणाचल प्रदेशच्या आकाशात गस्त घालत असताना ही बाब समोर आली. अरुणाचल प्रदेशच्या आकाशात चिनी विमानांनी भारतीय सीमेचे उल्लंघन केल्याचे गेल्या काही आठवड्यांमध्ये, भारतीय हवाई दलाच्या निदर्शनास आले.

बांगडा एअरबसच्या 14 डिसेंबरच्या चित्रात दोन फ्लँकर प्रकारची लढाऊ विमानेसुद्धा फ्लाईट लाईनवर दिसून आली. भारतीय हवाई दलाकडील रशियन बनावटीच्या सुखोई लढाऊ विमानांसारखीच ही चिनी बनावटीची विमाने आहेत. उपग्रह छायाचित्रांच्या माध्यमातून ज्या गोष्टी स्पष्ट होत आहेत, त्यातून चीनकडून भारतीय हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येत असल्याचे दिसून येते. भारतीय हवाई दल जेव्हा अरुणाचल प्रदेशात मोठ्या हवाई सरावामध्ये व्यस्त होते, त्याचवेळी चीन भारताच्या हवाई दल क्षमतेवर नजर ठेवून होता. 2020 मध्ये भारतासोबतच्या सीमेवर तणाव सुरू झाल्यापासून, चीनने आपल्या एअरबस आणि हवाई उपकरणांची क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे.

लढाऊ विमाने, वाहतूक विमाने, ड्रोन, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री यांचाही त्यामध्ये समावेश आहे. पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी रेल्वे लाईन टाकण्याबरोबरच तिबेटमध्ये ग्राऊंड एअर डिफेन्स, हेलीपोर्ट इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे आणि भारतासाठी हे दीर्घकालीन धोकादायक ठरणारे आहे. एकूणच चीनने भारतासमोर मोठे आव्हान उभे केले असून, त्याचा मुकाबला करण्यासाठी भारत अनेक पातळ्यांवर सज्जता करीत आहे. चिनी सैनिक सीमेवर जेव्हा

आगळीक करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भारतीय सैनिक त्यांना जशास तसे उत्तर देतात, हे गलवान खोर्‍यात आणि अलीकडे तवांग सेक्टरमध्येही पाहायला मिळाले. दुसरी लढाई आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीच्या पातळीवर करावी लागणार आहे. तर तिसरी लढाई ही युद्धसज्जतेच्या पातळीवरची आहे. ज्या चीनचे राज्यकर्ते स्वतःच्या नागरिकांचे दमन करतानाही दयामाया दाखवत नाहीत, त्यांच्याकडून शेजारी राष्ट्रांबाबत सहिष्णुतेची अपेक्षा करणे गैर आहे. भारताच्या चौफेर विकासात खोडा घालून महासत्तेच्या वाटचालीत अडथळे आणणे हा चीनचा एकमेव अजेंडा लपून राहिलेला नाही. अर्थातच भारताने त्यासाठी तयारी सुरू केली असून, अरुणाचल कॉरिडोरमध्ये ती स्पष्टपणे दिसून येते. जशास तसे उत्तर देण्यासाठी ही सज्जता ठेवताना भारत राजनैतिक पातळीवरही रणनीती आखेल, हे स्पष्टच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news