चीन ला दणका कधी ?

चीन ला दणका कधी ?
Published on
Updated on

सणांमध्ये चिनी फटाके उडवून आपण अर्थव्यवस्थेचे, पर्यावरणाचे आणि आरोग्याचेही नुकसान करत आहोत. भारतीय सणांच्या बाजारपेठेतही चीन ने घुसखोरी केली आहे. चीन भारतीयांच्या आवडीच्या वस्तू आवर्जून बनवून त्यांच्या विक्रीतून हजारो रुपये कमावतो. मात्र, तरीही भारताला नामोहरम करण्यासाठी अहोरात्र झटणार्‍या चीनला आर्थिक धक्का देण्याबाबत नागरिकांची एकजूट दिसत नाही.

अंतर्गत समस्यांनी ग्रस्त असूनही चीनने आपली आक्रमकता कमी केलेली नाही. याचे कारण चीन ने संपूर्ण जगाला परावलंबी करून बहुतांश देशांचे आपल्यावरील अवलंबित्व वाढवले आहे. त्यामुळेच कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाल्याचे आणि चीनने या महासंसर्गाचा प्रसार रोखण्यात अक्षम्य दिरंगाई केल्याचे स्पष्ट होऊनही जग चीनविरोधात ठोस कारवाई करू शकले नाही. तथापि, आता जगभरातून चीनच्या पर्यायाचा शोध सुरू आहे. भारत सरकारने यासाठी आत्मनिर्भर भारतसारखे अभियानही सुरू केले आणि ते सक्षमपणाने राबवलेही जात आहे. तथापि, याला देशातील नागरिकांचा, व्यापार्‍यांचा, उद्योजकांंचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. याखेरीज चीनमधून आयात होणार्‍या वस्तूंवरील आयात कर वाढवला गेला पाहिजे.

मुळात, ज्या वस्तू भारतात बनतात, त्या चीनमधून आयात करता कामा नयेत; परंतु अनेक भारतीय व्यापारी त्या वस्तू स्वस्त असतात म्हणून आयात करतात. हे लक्षात घेऊन अशा वस्तूंवरील आयात कर दुप्पट केला पाहिजे. तसे झाल्यास आपल्या उद्योजकांना चिनी मालाशी स्पर्धा करणे शक्य होईल. अर्थात, जिथे केवळ कच्चा माल आयात केला जातो त्यावरील आयात कर कमी असावा, जेणेकरून आपण तयार उत्पादन कमी किमतीत निर्माण करू शकू. आज औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये आपण कच्च्या मालासाठी जवळपास 90 टक्के चीनवर विसंबून आहोत. टेक्स्टाईल इंडस्ट्री किंवा कापड निर्मितीच्या क्षेत्रात चीन वेगळ्या पद्धतीने भारतात घुसखोरी करत आहे. चिनी माल बांगला देशमधून तयार होऊन स्वस्त दरात भारतामध्ये निर्यात केला जात आहेत. म्हणूनच दुसर्‍या देशांमधून भारतात येणार्‍या चिनी मालावरही आयात कर वाढवण्याची गरज आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे घरांत बसून गेल्याने यंदा दिवाळीचा सण उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्याचे बेत आखले जात आहेत. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीसारख्या सणांंना चिनी फटाके उडवून आपण अर्थव्यवस्थेचे, पर्यावरणाचे आणि आरोग्याचेही नुकसान करत आहोत. रक्षाबंधन, गणेशोत्सव यांसारख्या सणांच्या बाजारपेठेतही चीनने घुसखोरी केली आहे. आकाशकंदील, दिवे, विविध भेटवस्तूंनी फुललेल्या बाजारपेठांमध्ये अनेक वस्तू या चिनी असतात, हे नागरिकांना माहीत नसते. साधारणतः दरवर्षी सणासुदीच्या काळात चिनी विक्रेते भारतीय बाजारपेठेतून 2500 ते 4000 कोटींहून अधिक नफा कमावतात. याचे कारण फराळाचे पदार्थ वगळता दिवाळीच्या सर्व वस्तूंमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. चीन खास भारतासाठी वस्तू बनवून आपल्याकडील लहान, मध्यम उद्योगांना पद्धतशीरपणे बरबाद करत आहे. रंगीबेरंगी बाहुल्या, बॅटबॉल, चावीची खेळणी, टेडीबेअर या सगळ्या आपल्याकडच्या खेळण्यांमध्ये चीनने घुसखोरी करत वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे भारतीय खेळण्यांची मागणी घटली आहे. खेळण्यांचे मार्केट 80 टक्के चिनी बनावटीच्या खेळण्यांनी भरले आहे. चिनी बनावटीच्या 57 टक्के खेळण्यांमध्ये प्रमाणाबाहेर विषारी रसायने आढळल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. असे असूनही भारतीय नागरिक त्यांची खरेदी करतात हे दुर्दैव आहे.

आधुनिक काळात तर प्रत्यक्ष सैन्याची लढाई न होताही शत्रू राष्ट्राला खूप मोठा धक्का बसवण्याचे तंत्र उपलब्ध झाले आहे. आर्थिक घुसखोरी हा या हायब्रीड वॉरचाच एक भाग आहे हे समजून घेतले पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून चीन भारतात इनफ्लुएन्स ऑपरेशन्स राबवत आहे. याअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत भारतीयांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून भारताची धोरणे ही चीनच्या बाजूने होतील आणि चीनला आर्थिक, सामरिक आणि इतर अनेक फायदे होतील, अशी चीनची अटकळ आहे. चिनी इनफ्लुएन्स ऑपरेशनचा उद्देश म्हणजे, भारतातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये घुसायचे आणि त्यातून भारताच्या सामरिक क्षेत्रातील महत्त्वाची माहिती चोरायची. चीनने भारताच्या उद्योग क्षेत्रात म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रात, इनफ्लुएन्स ऑपरेशन्सचा वापर करून भारतीय उद्योजकांचे मत परिवर्तन केले आहे. भारतीय उद्योजकांना असे वाटते की, चीनशिवाय या क्षेत्रात प्रगती करणे शक्य नाही. भारतात काम करणार्‍या चिनी कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रचंड गैरवापर केला आहे. उदाहरणार्थ, झियोमी ही चिनी कंपनी भारतात चीनच्या बाजूने मतपरिवर्तन करते. 2015 पासून चीनने सात बिलियन डॉलर्स एवढी गुंतवणूक भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात केली आहे. भारतात जवळपास शंभर अँड्रॉईड अ‍ॅप्स वापरले जातात. त्यातील 44 हे चिनी आहेत. अशा महत्त्वाच्या क्षेत्रात चिनी घुसखोरी भारताकरिता धोकादायक आहे.

भारत सरकार चीनच्या या इनफ्लुएन्स ऑपरेशन्सला प्रत्युत्तर देत आहे; परंतु चीनच्या युद्धखोरीला प्रत्युत्तर द्यायचे असेल तर या लढाईत प्रत्येक भारतीयाला भाग घ्यावा लागेल. केवळ भारत सरकारवर हे काम सोडून चालणार नाही. आज बॉयकॉट चायना यांसारख्या मोहिमा राबवल्या जाऊनही अनेक भारतीय व्यापारी फक्त चिनी वस्तू विकत घेण्यावर आपले लक्ष केंद्रित करतात. दुसरीकडे, चिनी वस्तूंचे भारतात प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग केले जाते किंवा बेकायदेशीररीत्या आयात केली जाते. दरवर्षी 1000 ते 1500 कोटी रुपयांचा असा चोरटी आयात केलेला माल पकडला जातो. प्रत्यक्ष तस्करी ही त्याहून कितीतरी पट अधिक आहे. युद्धशास्त्रानुसार, आक्रमक शत्रू जर काही कारणांमुळे कमजोर झाला असेल तर ती त्याच्यावर कब्जा करण्याची सुयोग्य वेळ असते. तशाच प्रकारे आज चीन अंतर्गत समस्यांनी ग्रस्त झालेला आहे, जागतिक बाजारात चीनविषयीची नकारात्मकता वाढत आहे, अमेरिका चीनविरोधात आक्रमक झाला आहे, चीनची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. अशा वेळी जर चीनला आर्थिक दणका दिला तर तो निश्चितच अधिक चपखल ठरू शकतो. त्यामुळे येणार्‍या सणासुदीच्या काळात चिनी वस्तूची-मालाची, चिनी फटाक्यांची खरेदी न करण्याचा संकल्प सर्वांनीच करायला हवा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news