नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला पाच वर्षांनी निवडणूका घ्याव्या लागतात. त्या नुसार निवडणूक आयोग वेळेवरच निवडणुका घेणार आहे. पण, राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचे जाहीर करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांझोट्या बैठका घेतल्या आणि वेळकाढूपणा केला. आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झटका दिला असून निवडणूका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे आता ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही, हा प्रश्न आहे. पण आताही तीन महिन्यात इम्पेरिकल डाटा गोळा करुन, ओबीसींना आरक्षण द्यावे. नाही तर राज्यातील ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि भाजप या सरकार विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे या सरकारने पहिलेपासून ठरवले आहे. तीन महिन्यात सरकारने डेटा गोळा करून निवडणूका घेतल्या नाही तर ओबीसी समाज सरकारला माफ करणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.