चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : भद्रावती शहरापासून सुमारे ४० कि.मी.अंतरावर असलेल्या सीतारामपेठ या वनव्याप्त गावातील गुराख्याला पट्टेदार वाघाने हल्ला करुन जागीच ठार केल्याची घटना काल गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. नमू धांडे (वय-५०) असे मृतक गुराख्याचे नाव असून तो सीतारामपेठ येथील रहिवासी होता.
भद्रावती तालुक्याचे ठिकाणापासून सुमारे ४० कि.मी.अंतरावर सीतारामपेठ हे गाव वसले आहे. या वनव्याप्त गावातील गुराखी नमु धांडे यांनी आपली जनावरे गावापासून १ कि. मी. अंतरावर इरई धरणाकडे सरई रिसार्ट जवळ चरायला नेली. दरम्यान गुरे चारत असताना झुडुपात दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक नमू यांच्यावर हल्ला चढविला.
वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडत असताना काही लोकांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली असता नमू यांना सोडून वाघाने पळ काढला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, मृ नमू धांडे यांना ४ भाऊ होते. त्यापैकी त्याचे एका भावाचा ४ वर्षांपूर्वी सकाळी गावाबाहेर शौचास गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला करुन त्यांच्याही मृत्यू झाला. नमू यांचा दुधाचा व्यवसाय होता. त्यासाठी त्याने गुरे पाळली होती. रोज ते गुरे चरायला न्यायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि २ मुली आहेत.
दरम्यान, सीताराम पेठ, कोंढेगांव व मुधोली परिसरात मागील एक महिन्यापासून वाघाची दहशत होती. याबाबत वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता कोंढेगांव येथील सरपंच, ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थ यांनी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि वनविभागाला निवेदन सादर केले होते. परंतु दखल घेण्यात आलेली नाही. आतातरी प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सीताराम पेठ परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.