गुरू जवळील लघुग्रहांच्या अभ्यासासाठी ‘नासा’च्या ‘ल्युसी’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण

गुरू जवळील लघुग्रहांच्या अभ्यासासाठी ‘नासा’च्या ‘ल्युसी’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण

Published on

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : सूर्यमालेच्या सखोल अभ्यासासाठी 'नासा'च्या एका नव्या मोहिमेला सुरुवात झाली असून 1 हजार 500 किलो वजनी 6 मीटर लांबीच्या 2 सोलर पॅनलसह 'ल्युसी' या यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. 'टलस-5' या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील तळावरून 'ल्युसी' अंतराळात झेपावले. हे यान पुढील 12 वर्षे प्रवास करणार असून, गुरू ग्रहाच्या कक्षेतील 8 लघुग्रहांची छायाचित्रे घेणार आहे. गुरुच्या लघुग्रहांचा अभ्यास नासाकडून केला जाणार आहे.

गुरू ग्रहाच्या कक्षेत लघुग्रहांचे दोन मोठे समूह हे मागे आणि पुढे असे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या लघुग्रहांना गुरू ग्रहाचे ट्रोजन म्हटले जाते. हे लघुग्रह सूर्यमालेच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहेत, असा खगोलतज्ज्ञांचा अंदाज आहे. नासाच्या या मोहिमेमुळे सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल मोलाची नवी माहिती मिळेल, अशी अपेक्षा शास्त्रज्ञांना आहे.

गुरुचे ट्रोजन म्हणून ओळखल्या जाणार्‍या या लघुग्रहांची संख्या अडीच लाखांपेक्षा अधिक आहे. एक किलोमीटरपासून ते 100 किलोमीटर पर्यंत या लघुग्रहांचे व्यास आहेत. यातील 8 मोठ्या लघुग्रहांचा अभ्यास 'ल्युसी' यान करणार आहे.

'ल्युसी' नामकरण का?

आफ्रिका खंडातील इथियोपिया या देशामध्ये 1974 च्या सुमारास एका मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले होते. अध्ययनाअंती हे अवशेष तब्बल 32 लाख वर्षांपूर्वीचे असल्याचे स्पष्ट झाले होते. हा सांगाडा महिलेचा असल्याचेही निदर्शनाला आले. त्या काळातील एका प्रसिद्ध गाण्यातील 'ल्युसी' हा एक शब्द घेऊन हेच नाव (ल्युसी) या सांगाड्याला देण्यात आले.

या सांगाड्यामुळे मानववंशशास्त्र अभ्यासाची दिशाच बदलून गेली होती. नासाने प्रक्षेपित केलेले हे यानही सूर्यमालेबद्दलच्या अभ्यासाची दिशा बदलवून सोडेल, या आशावादातूनच ल्युसी हे या यानाचे नामकरण करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news