गुजरात निवडणूक : 81 मतदारांचे कुटुंब, धनाढ्य उमेदवार!

गुजरात निवडणूक : 81 मतदारांचे कुटुंब, धनाढ्य उमेदवार!
Published on
Updated on

जम्बो कुटुंबाचे जम्बो मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले असून सर्वांना आता दुसर्‍या टप्प्यातील मतदानाची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी अनेक लक्षवेधी घटना घडल्या. त्यात कामराज येथील जम्बो कुटुंबाच्या जम्बो मतदानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. तब्बल 81 लोकांचे कुटुंब असलेल्या सोलंकी परिवारातील 60 मतदारांनी एकाचवेळी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. या कुटुंबात मतदानासाठी पात्र असलेले सर्वात ज्येष्ठ शमजीबेन हे 82 वर्षांचे आहेत, तर सर्वात लहान पार्थ आणि वेदांत हे युवक 18 वर्षांचे आहेत. दोन्ही युवकांनी पहिल्यांदाच मतदान केले. नवागाम येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी सोलंकी कुटुंबीयाला अनेक गाड्या वापराव्या लागल्या. एखाद्या लग्नात जसा उत्साह अनुभवायला मिळतो, तसा उत्साह आम्हाला मतदानावेळी अनुभवायला मिळाला. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्व नागरिकांनी अवश्य मतदान केले पाहिजे, असे शमजीबेन यांचे पुत्र नंदलाल यांनी मतदान केल्यानंतर सांगितले.

मोदींची विशाल रॅली

दुसर्‍या टप्प्यात 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचा एकच जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अहमदाबादमध्ये मेगा रोड शो घेऊन भाजपची ताकत दाखवली.

अमरेलीमध्ये युवा उमेदवार घडविणार करिश्मा

सौराष्ट्रमधील अमरेली मतदारसंघात काँग्रेसचे नेते परेश धनानी यांचा दबदबा आहे. धनानी हे विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. धनानी यांच्या कडव्या आव्हानामुळे अमरेली मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. या मतदारसंघात पाटीदार समाजाचे प्राबल्य आहे. धनानी यांचा मुकाबला करण्यासाठी भाजपने पक्षाचे अमरेलीचे जिल्हाध्यक्ष कौशिक वखारिया यांना मैदानात आणले आहे. वखारिया हे युवा पाटीदार नेते आहेत. धनानी यांनी 2002 मध्ये पहिली निवडणूक लढविताना भाजपचे दिग्गज नेते पुरुषोत्तम रुपाला यांचा 16 हजार मतांनी पराभव केला होता. त्यावेळी त्यांचे वय अवघे 26 वर्षे होते. धनानी आता 46 वर्षांचे आहेत. धनानी यांच्यासमोर युवा नेता उभा करण्याची भाजपची व्यूहरचना यशस्वी होणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

जिग्नेश मेवानी यांचा विश्वास

गत विधानसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षांनी भाजपच्या नाकात दम आणला होता. त्यावेळी भाजपविरोधात जोरदार प्रचार करणार्‍यांमध्ये दलित नेते जिग्नेश मेवानी यांचा प्रामुख्याने समावेश होता. काँग्रेसचे आमदार असलेल्या मेवानी यांनी यावेळी मोठा चमत्कार होऊन काँग्रेसच सत्तेत येईल, असे भाकित वर्तवले आहे.

सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या कामगिरीकडे लक्ष

गुजरातच्या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून जयंती पटेल यांच्याकडे पाहिले जाते. पटेल हे भाजपकडून मनसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. अर्ज सादर करतेवेळी दिलेल्या माहितीनुसार पटेल यांची संपत्ती 661 कोटी रुपये इतकी आहे. गांधीनगर जिल्ह्यातील नभोई येथे जयंती पटेल राहतात. भाजपची स्थापना होण्याच्या आधी पटेल कुटुंब जनसंघाचे काम करीत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news