गर्भलिंग निदान करणार्‍या सूत्रधारासह ५ जेरबंद; कथित महिला डॉक्टर पसार

गर्भलिंग निदान करणार्‍या सूत्रधारासह ५ जेरबंद; कथित महिला डॉक्टर पसार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गर्भलिंग निदान करणार्‍या सूत्रधारासह ५ जणांना जेरबंद करण्यात आले आहे तर कथित महिला डॉक्टर पसार पसार झाली आहे.

परिते-कुरूकली (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी मुख्य संशयित महेश सुबराव पाटील (वय 30, रा. सिरसे, ता. राधानगरी) याच्यासह पाचजणांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्यात दोघा एजंटांचा समावेश आहे.

दरम्यान, कथित डॉक्टर राणी कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) पसार झाली आहे. सेंटरमधील खोलीतून गर्भलिंग तपासणी झालेल्या महिलांच्या नावांच्या नोंदी असलेल्या दोन डायर्‍या, सोनोग्राफी मशिन, वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा हस्तगत करण्यात आलाआहे.

या सेंटरमधून 45 हून अधिक महिलांची गर्भलिंग तपासणी झाल्याची माहिती पुढे आली आहे. संशयितांकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती टोळीच्या कृत्याची व्याप्ती चव्हाट्यावर येईल, असे करवीरचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले. राणी कांबळेला अटक केल्यानंतर साथीदारांसह आणखी एजंटांचीही नावे उघड होतील, असेही ते म्हणाले.

महेश पाटीलसह सचिन दत्तात्रय घाटगे (42, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी), साताप्पा कृष्णा खाडे, (42, परिते, ता. करवीर), अनिल भीमराव माळी (36), भारतकुमार सुकुमार जाधव (36, दोघेही रा. हुपरी, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य संशयित राणी कांबळे व राजमती यशवंत माळी (63, रा. हुपरी, ता. हातकणंगले) यांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही तपास अधिकार्‍यांनी सांगितले.

साताप्पा खाडे याच्या घरात गर्भलिंग निदान सेंटर चालविले जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यानुसार आर. आर. पाटील, मंगेश चव्हाण यांच्यासह संदीप कोळेकर यांनी पथकासह छापा टाकला. यावेळी गर्भलिंग निदानासाठी हुपरीतून आलेल्या महिलेसह पती, वयोवृद्ध महिला व संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बेकायदा तपासणी

छापा पडताच राणी कांबळेसह अन्य दोन संशयित मागील बाजूस असलेल्या खोलीतून पसार झाले. पोर्टेबल सोनोग्राफी मशिन असलेल्या खोलीत महेश पाटील आढळून आला. चौकशीत त्याच्याकडे कोणत्याही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अथवा वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंद नसल्याचे आढळून आले. डॉक्टर असल्याचे भासवून महेश पाटील व राणी कांबळे संगनमताने पंचक्रोशीतील असहाय महिलांची गर्भलिंग तपासणी करीत असल्याचेही उघडकीस आले.

दोन डायर्‍यांसह उपकरणे, औषधांचा साठा हस्तगत

राणी कांबळे पसार झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी पाठलाग करून तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; पण प्रयत्न निष्फळ ठरले. संशयित महेश पाटीलसह अन्य संशयितांवर पोलिसांनी प्रश्नांचा भडिमार केला. सिरसे येथील सनी ऊर्फ गजेंद्र बापू कुसाळे याच्याकडून 2017 मध्ये साडेतीन लाख रुपयांना सोनोग्राफी मशिन विकत घेतल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे शहर उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले. वैद्यकीय उपकरणे, डायर्‍यांसह औषधे, 30 हजार 100 रुपयांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

महिलेच्या पतीसह वयोवृद्ध महिलेवर गुन्हा

गर्भलिंग तपासणी केंद्रावर रविवारी सकाळी हुपरी येथील गर्भवती महिलेला तपासणीसाठी आणण्यात आले होते. संबंधित महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली. तिच्या पतीसह वयोवृद्ध महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला अटक करण्यात आल्याचेही निरीक्षक कोळेकर यांनी सांगितले.

गर्भलिंग निदान; दोषींवर कठोर कारवाई : बलकवडे

परिते येथील गर्भलिंग निदानप्रकरण गंभीर आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी तपास अधिकार्‍यांना सक्त सूचना दिल्या आहेत, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. मुख्य संशयित राणी कांबळे हिच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. आणखी दोन संशयितांचा सहभाग निश्चित झाला आहे. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. परितेत हा प्रकार किती दिवसांपासून सुरू आहे? आजवर किती महिलांचे गर्भलिंग निदान झाले? हे लवकरच स्पष्ट होईल. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुण्यासह कर्नाटकातूनही एजंटांद्वारे साखळी कार्यरत असावी, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.

राणी कांबळेवर यापूर्वीही गुन्हा दाखल

मुख्य संशयित राणी कांबळेविरुद्ध गर्भलिंग निदानप्रकरणी 2017 मध्येही गुन्हा दाखल झाला होता, असे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले. त्यांनतरच्या तिच्या हालचालींची माहिती शोधण्यात येत आहे. अन्य संशयित महिला राजमती यशवंत माळी हिला नोटीस बजावण्यात आली आहे. कोणत्याही क्षणी तिला अटक करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

एजंटांना 12 हजारांचे कमिशन

भारतकुमार जाधव व सचिन घाटगे हे एजंट असल्याचे निष्पन्न झाले आहे. एका पेशंटमागे या दोघांना 12 हजारांचे कमिशन देण्यात येत होते. मिळत असलेल्या घसघशीत कमिशनमुळे दोघेही महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून गर्भवती महिलांना सेंटरमध्ये आणून चाचणीसाठी नातेवाईकांना प्रवृत्त करीत होते, असे करवीरचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news