गंगूबाई काठियावाडी’ प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

गंगूबाई काठियावाडी’ प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट निर्माते आणि अभिनेत्री आलिया भट्टविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या फौजदारी दाव्या प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेल्या सन्मसला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली.

'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. त्या पुस्तकातील काही भाग बदनामीकारक असून गंगुबाईंची प्रतिष्ठा डागाळली आहे.

त्यामुळे गंगुबाईंच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. असा दावा करत गंगुबाई काठियावाडी यांचा दत्तक मुलगा बाबूजी रावजी शहा यांनी मुंबईतील महानगर दंडाधिकार्‍यांकडे या चित्रपटाच्या निर्माते आणि अभिनेत्री आलिया भट्टविरोधात मानहानीचा फौजदारी दावा केला आहे.

त्याची दखल घेत महानगर दंडाधिकार्‍यांनी चित्रपट निर्माते आणि अलियाला समन्स जारी केले होते. त्याला भन्साळी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड, संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्टने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर नुकतीच न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई'च्या लेखकांना कादंबरीच्या प्रकाशन, विक्री किंवा पुस्तकावर हक्क निर्माण करण्यापासून कायमस्वरुपी रोखण्यात यावे, अशी मागणी करणारा खटला फेटाळून लावल्याची बाब याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. आबाद पौंडा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत प्रतिवादींना नोटीस बजावत न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कारवाईला स्थगिती देत सुनावणी 7 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

* शहा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यात यावी आणि हुसैन जैदी या लेखक/प्रकाशकांना गंगूबाईंच्या जीवनावर इतर कोणतीही कथा लिहिण्यापासून रोखण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी कऱणारी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्या. नितीन सांबरे यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, व्यक्तीच्या मृत्यूसह त्यांच्याविरोधातील (बदनामीकारक) कोणतीही बाबही मृत ठरते. तसेच याचिकाकर्ते (शहा) हे गंगूबाई काठियावाडींचा दत्तक मुलगा आहेत, हे पटवून देण्यास प्रथमदर्शनी अपयशी ठरले असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि शहा यांची मागणी फेटाळून लावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news