खुर्ची

खुर्ची
Published on
Updated on

प्रसंग किती साधा बरं होता. निलंबित खासदारांना भेटायला साहेब आले म्हणून धावपळ करून त्यांनी तुला उचलून आणलं. आता साहेबांचं वय लक्षात घेता प्रसंगावधान राखून ते त्यांनी सहजपणानं केलं, तर त्याचा केवढा गाजावाजा. मला हे कळत नाही की, साध्या खुर्चीमुळं कुणाच्या नाकाला मिरच्या का म्हणून बरं झोंबाव्यात? काय काय तरी अर्थ लावत बसले लोक! काही लोकांना पोटदुखी सुरू झाली; पण काही म्हणे खुर्चीबाई तशी नशिबवान ठरलीस की तू! एका दिवसात मीडियात पॉप्युलर झालीस. नाही तर, कोपर्‍यात पडून असायचीस तू. कुणीही तुझा वापर करायचं. आता तू म्हणशील की मी दिल्लीवाली खुर्ची आहे; पण म्हणून तुला काही वेगळं महत्त्व द्यायची गरज नाही. दिल्लीत काय ढिगानं खुर्च्या आहेत; पण प्रत्येक खुर्चीचा मान वेगळा.

संसदेत, राष्ट्रपती भवनात, पंतप्रधान कार्यालयात, मंत्रालयात..! जाशील तिथं तुझ्यासारख्या आणि तुझ्यापेक्षाही श्रीमंत, देखण्या कितीतरी खुर्च्या आहेत. निवडणुका झाल्या की देशभरातून नवे लोक येतात. त्यांची सेवा करत राहणं, हेच तुझ्यासारख्यांचं खरं काम. तुझा शोध कुणी लावला माहीत नाही; पण तुझा आधार घेतला की, माणूस एकदम वेगळाच वागायला लागतो. मग, तो शाळेतला मास्तर असो, नाही तर ग्रामपंचयातीचा सरपंच.

देशात मार्गदर्शन करणार्‍यांची गदीर्र् तुझ्यामुळंच वाढली असावी. तुला काय वाटतं, महत्व तुला आहे? नाही. ज्या पदासाठी तुला निर्माण केलं त्या पदाला महत्त्व. तू निमित्तमात्र आहेस, हे लक्षात घे. उगीच प्रसिद्धी मिळाली म्हणून भाव खाऊ नकोस. दोन दिवस मीडियावाले चर्चा करतील आणि विसरून जातील. तू साधी खुर्ची आहेस. अगं तुझाच मागचा इतिहास काढून बघ.

इतिहासात अनेक राजे-महाराजे झाले. त्यांच्या सिंहासनांची काय गत झाली, ते आठवून बघ. काही नसंत बरं. चार पाय, दोन हात आणि वर खाली टेकायला फळी असली म्हणजे तयार होतं तुझं रूप. निर्जीवच असतं ते. अगदी कुणीही बसण्यासाठी तुझा वापर करतं. तुझं अधिक मोठ्ठ रूप म्हणजे सिंहासन. राजे-महाराजांच्या काळात तर हे सिंहासन सोन्याचं असायचं. हिरे माणकांनी ते सुशोेभीत केलं जायचं.

काळाच्या ओघात लोकशाही राष्ट्रे निर्माण झाली आणि राजे महाराजांची जागा लोकप्रतिनिधींनी घेतली; पण त्यांच्यासाठी हिरे-माणकाचं, सोन्याचं सिंहासन नसलं, तरी त्यांचं आसन तुझ्सासारखं सामान्य नसतं. पदाच्या दर्जाला साजेल अशी त्याची रचना असतेच. लोकशाहीत आसन कसं आहे, त्यापेक्षा त्या आसनावर कोण बसतो, त्याला महत्त्व अधिक. आता दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत राहणार्‍या तुला सत्तेचं महत्त्व सांगायला नको. सत्तेमुळं तुला महत्त्व. ज्याची सत्ता त्याची तू गुलाम, सेवक. येवढं जरी लक्षात घेतलंस, तरी तुझं चार पाय जागेवर राहतील.

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news