खस्ता तिथे एस. टी.?

खस्ता तिथे एस. टी.?

Published on

मग काय? सुटलात एकदाचे कोरोनाच्या कटकटीतून? झालात मोकळे हवं तिथे जायला?
कुठलं आलंय? दात आहेत तर चणे नाहीत, अशी अवस्था झालीये.
म्हणजे? म्हणजे, आता प्रवासाची परवानगी आहे; पण वाहन कुठेय? आमच्या गावी जायला एस.टी.च सर्वात स्वस्त आणि मस्त! पण, ती लालपरी अजून रुसलेली आहेच.
गाव कुठलं तुमचं?

बिरवाडी जवळंचं खेडं. आता महाड, बिरवाडी या ठिकाणी अगदी व्होल्वोसुद्धा जातात; पण पुढच्या आसगावला एस.टी.च सोयीची वाटायची. परवापरवा पर्यंत. आता एस.टी.ने आपलं बोधवाक्यंच बदललंय. त्याला काय करायचं?
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बदललं?नाही हो. ते आहे टिकून; पण 'रस्ता तिथे एस.टी.' असं होतं ना पूर्वी, त्याचं आता 'खस्ता तिथे एस. टी.' झालंय बहुधा.

प्रवाशांना फार खस्ता खायला लावतेय आता ही एस्टी.
इतके दिवस एस.टी.ला नावं ठेवणारे तुम्हीच होतात ना? लाल डबा, डबडं, खटारा असं काय काय म्हणायचा.
होय हो. आता कळतंय तिचं महत्त्व! एस.टी. होती म्हणून गावाकडचे फणस, आंबे शहरात आणता यायचे. ते त्या रणरणीत उन्हाने तापलेल्या लाल डब्यात आपोआप पिकायचे.गरोदर बायांना एस.टी.तून धक्के खात खात दवाखान्यात पोहोचवलं की, त्यांची बाळंतपणंसुद्धा सोपी जायची म्हणे.पूर्वी सामान्य प्रवाशांची नानाप्रकारे सोय करायची हो ती. तेही स्वस्तात. आता नुसत्या खस्ता!
त्यांचे कर्मचारी तरी काय कमी संकटात आहेत? तेही खस्ताच खाताहेत. पाच-पाच महिने पगार नाही झालेले काहींचे!
तरी सद्बुद्धी सुचेना?

संपकरी तेच म्हणताहेत. फक्त मॅनेजमेंटबद्दल म्हणताहेत. मुळात एस. टी. कर्मचार्‍यांना पगार कमी, सुविधा कमी, शासकीय सेवेचे अधिकार नाहीत, हे सुधारायची सद्बुद्धी दूरच राहिली.. मग कर्मचार्‍यांनी बापड्यांनी करावं काय?असला संप तरी करू नये. उगाच चालत्या गाड्याला खीळ लावून सर्वांचं नुकसानच केलं ना त्यांनी? आपल्या महाराष्ट्राच्या एस.टी.चं जाळं आणि भरवश्याची सेवा हा इतर राज्यांच्या हेव्याचा विषय असायचा मिस्टर.

पण, त्यातल्या काहींना राज्य सरकारमध्ये विलीन व्हायचे डोहाळे लागले.
ते शक्य नव्हतं. ते सोडून बाकी सगळ्या अटी मान्य केल्याच ना संपकर्‍यांच्या? गेल्या वर्षीच्या 27 ऑक्टोबरपासून चाललंय हे एस.टी.च्या इतिहासातलं सर्वात लांबलेलं आंदोलन. इकडे आधीच तोट्यात असलेलं महामंडळ दिवसादिवसाने गाळात चाललंय. तिकडे खेडोपाडीचे रुग्ण, छोटे व्यावसायिक आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी पार भरडून निघताहेत.
गावाकडे तुमच्या घरात कोणी विद्यार्थी आहेत का?
नाही. मग, काही आंबे, फणस वगैंरेचा उद्योग?
नाही. तसंही काही नाही.

मग, गावी जाता येत नाही म्हणून एवढा त्रास करून घेताय का? हे सगळं माझ्या एकट्यासाठी नाही चाललंय. तुम्ही बघताय ना? उन्हाळा वाढतोय. प्रवासी हंगाम येऊ घातलाय. कोरोनानंतर आताशी कुठे प्रत्येकाचं आयुष्य थोडंथोडं लायनीवर यायला बघतंय. आता आपल्या सवयीच्या, हक्काच्या एस्टीने तेवढी साथ द्यायला हवीये. थोड्या लोकांच्या प्रश्नासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीला धरू नका म्हणावं!

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news