क्रीडा : नवसॉकर सिटी कोल्हापूर !

क्रीडा : नवसॉकर सिटी कोल्हापूर !
Published on
Updated on

स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरच्या जनतेने फुटबॉल व कुस्ती या खेळांवर विशेष प्रेम केले. या खेळांना आपलेसे केले. त्यावर सोनेरी कळस चढविला तो येथील राजघराण्याने. पूर्वीपासूनच, अगदी राजर्षी शाहू महाराजांपासून ते 'केएसए'चेचीफ पेट्रन शाहू महाराज व अध्यक्ष मालोजीराजे यांच्यापर्यंत राजघराण्यातील सर्वांनीच कला व क्रीडा क्षेत्रावर प्रेम केले आहे. म्हणूनच या खेळांना लोकाश्रयही मिळाला आहे.

फुटबॉलचा विश्वचषक सुरू होऊन चार-पाच दिवस झालेत. परंतु कोल्हापूरमध्ये मात्र विश्वचषकाचा ज्वर भलताच शिगेला पोहोचला आहे. गल्लीबोळातून विविध संघांचे समर्थक आपल्या संघाच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करण्यात दंग आहेत. जल्लोषी वातावरण निर्माण झालेले आहे. यामध्ये पहिल्या फेरीत पराभूत झाल्यामुळे अर्जेंटिना व जर्मनीच्या समर्थकांची निराशा मात्र लपून राहू शकलेली नाही. आपणच आपली समजूत काढून पुढील फेरीत नक्कीच आपले संघ जिंकणार, असा आशावाद त्यांना आहे. एक मात्र नक्की की, फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या फुटबॉलची चर्चा संपूूर्ण देशातील दैनिकांनी घेतलेली आहे. एकवेळ मुंबई, बंगळूर, गोवा याठिकाणी सामने पाहायला गर्दी होणार नाही; पण कोल्हापुरातील स्थानिक सामन्यांना मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारच. इतकं पोषक वातावरण कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळाच्या बाबतीत पाहायला मिळते. हे असे का, याचे कारण म्हणजे पूर्वीपासून कोल्हापूरच्या क्रीडा विश्वाला मिळालेला राजाश्रय आणि लोकाश्रय होय.

कोल्हापूर शहर व त्याच्या आसपासचा भाग भौगोलिक समृद्ध असल्याने, इथले हवामान चांगले असल्याने कोल्हापूरचे क्रीडा क्षेत्र पूर्वीपासूनच अधिक विकसित झालेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरच्या जनतेने फुटबॉल व कुस्ती या खेळांवर विशेष प्रेम केले. या खेळांना आपलेसे केले. त्यावर सोनेरी कळस चढविलेला आहे तो येथील राजघराण्याने. पूर्वीपासूनच अगदी राजर्षी शाहू महाराजांपासून ते आजच्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्यापर्यंत राजघराण्यातील सर्वांनीच कला व क्रीडा क्षेत्रावर प्रेम केलेले आहे. म्हणूनच या खेळांना लोकाश्रय मिळालेला आहे. म्हणूनच कृष्णराव माणगावे मास्तरांसारखे बिनीचे शिलेदार प्रॅक्टिस क्लबकडून राईट बॅक या जागेवर फुटबॉल ही खेळले आणि 1952 च्या हेलिसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कुस्तीगीर म्हणूनही चौथा क्रमांकही मिळविला.

कोल्हापूरच्या फुटबॉलला राजश्रय मिळाला तो खर्‍या अर्थाने छत्रपती शहाजी महाराजांच्या रूपाने. तत्कालीन देवासचे राजे विक्रमसिंह महाराज अत्यंत फुटबॉलप्रेमी. 1929 ते 1932 या काळात ते राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेजचे कर्णधार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. कालांतराने सैन्य दलात कॅप्टन पदावर असणारे विक्रमसिंह महाराज कोल्हापूरच्या गादीवर (पान 4 वर)

श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज म्हणून विराजमान झाले. या काळात त्यांनी न्यू पॅलेस येथील जयभवानी फुटबॉल संघाची निर्मिती केली. महाराजांच्या राज्यारोहण समारंभानिमित्त त्यांनी कोल्हापुरात राजाराम कॉलेजच्या मैदानावर (सध्याचे शिवाजी स्टेडियम) राज्यारोहण चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत ब्रिटिशांच्या ताब्यात असणारे वळीवडे येथील पोलंडचे दुसर्‍या महायुद्धातील युद्धकैदी खेळाडूंची दर्जेदार टीमही सहभागी झाली होती. उपांत्य सामना प्रॅक्टिस वि. शिवाजी असा झाला. सलग सहा दिवस बरोबरीत सुटलेला सामना अखेर सातव्या दिवशी शिवाजीने जिंकला. अंतिम सामना जयभवानी व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झाला. या सामन्याला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती.

या सामन्यामुळे कोल्हापुरात जणू काही भारत बंदसद़ृश परिस्थिती निर्माण झाली होती. अंतिम सामना शिवाजी त. मंडळाने जिंकला खरा; पण कोल्हापूरच्या जनतेचं खरं फुटबॉलवरील प्रेम नंतरचे दोन महिने शिवाजी तरुण मंडळाने अनुभवले. दोन महिने शिवाजीचे खेळाडू स्वत:च्या घरात जेवले नव्हते. असे फुटबॉलवेडे खेळाडू व फुटबॉलवेडे कोल्हापूरकर. आजही तितकंच प्रेम या खेळावर कोल्हापूरने केलेले आहे. आजही शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ या जुन्या कोल्हापुरात घराघरातून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत फुटबॉल खेळ खेळला जातो.

पूर्वीच्या काळी शालेय स्तरावर खेळाडूंना फारशी स्पर्धा खेळायला मिळत नव्हती. शासकीय स्पर्धा तर अस्तित्वातच नव्हत्या. त्या 1970 पासून सुरू झाल्या. पण सध्याच्या खेळाडूंना वयाच्या 12 व्या वर्षापासून विविध स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळत आहे. कोल्हापुरात फुटबॉल खेळामध्ये आज आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. पूर्वीचा धुसमुसळा खेळ कमी होऊन आज नियमांच्या चाकोरीतील खेळ जोपासला जात आहे. आज कोल्हापूरचे संघ शालेय, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत आहेत. शालेय व आंतरविद्यापीठ स्पर्धेत मुंबई, गोवासारख्या संघांना सातत्याने पराभूत करत आहेत. केएसएचे विविध गटातील संघ राज्य स्पर्धेत विजयी होत आहेत. मुलींंचे संघही याला अपवाद नाहीत. मुलीही अत्यंत दर्जेदार कामगिरी करीत आहेत. याचे कारण म्हणजे आज कोल्हापुरात अस्तित्वात असलेले डी लायसन्स पात्र प्रशिक्षक, सातत्याने होत असलेल्या सीनियर डिव्हिजनच्या स्पर्धा व पालकांमध्ये निर्माण झालेली जागरुकता, अभिरुची होय. त्यांचा मिळत असलेला पाठिंबा होय.

आज कोल्हापुरी फुटबॉल म्हटलं की डोळ्यासमोर येते ती छ. शाहू स्टेडियमवरील हिरवळ, मोठमोठ्या बक्षिसाच्या स्पर्धा, नेटके संयोजन, रांगड्या प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम, त्या गर्दीला सामोरे जाऊन जिद्दीने खेळ करणारे खेळाडू. या खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीला मनापासून दाद देणार्‍या प्रेक्षकांच्या शिट्ट्या, टाळ्या, मध्यच खेळाडू व पंचांकरिता होणार्‍या काही खास प्रेक्षकांच्या कॉमेंटस. हे गेली सत्तर वर्षे अखंडितपणे चालू असून खेळाडू, पंच, संघटना, प्रेक्षक या सर्वांनीच या बाबींची सवय लावून घेत गुण्यागोविंदाने सर्व सोपस्कार पार पाडलेले आहेत. आज कोल्हापूरचा फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला आहे. परंतु या कोल्हापूरच्या फुटबॉल खेळास चालना देण्यासाठी, खेळ वाढीस लागण्यासाठी पूर्वीपासून अनेकांनी हातभार लावलेला आहे.

आज कोल्हापुरातील अनेक खेळाडू देशातील नामवंत संघांकडून खेळताना दिसतात. अनिकेत जाधव, निखिल कदम, अजिंक्य नलवडे अशी अनेक नावे घेता येतील. आजअखेर रिची फर्नांडिस, अजिंक्य गुजर, दिपराज राऊत, सागर केकरे, निखिल जाधव या खेळाडूंनी शालेय अशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तर कैलास पाटील, अजिंक्य नलवडे, योगेश कदम, रोहन आडनाईक, सागर चिले या खेळाडूंनी मुंबई व गोव्यातील क्लबकडून खेळून नावलौकिक मिळविलेला आहे. विश्व शिंदे या खेळाडूची 17 वर्षाखालील भारतीय संघातून मलेशिया येथे निवड झालेली होती. सध्याच्या काळात अनिकेत जाधव हा तर कोल्हापूरच्या युथ फुटबॉलचा आयकॉन समजला जात आहे. पाच वर्षापूर्वी भारतात झालेल्या 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत खेळणारा अनिकेत हा कोल्हापूरचा पहिला खेळाडू ठरला. सध्या तो ईस्ट बंगाल एफ.सी. संघाकडून आय.एस.एल. स्पर्धा खेळत आहे. त्याच्याबरोबरच निखिल कदम हासुद्धा सध्या कोलकाता येथील भवानीपूर एफ. सी. संघाकडून कोलकाता सुपर लीग खेळत आहे. अनेक खेळाडू संतोष ट्रॉफीसारखी नामवंत स्पर्धा खेळलेले आहेत. अशाप्रकारे कोल्हापुरातील गल्लीत खेळणारा फुटबॉल खेळाडू आज देशपातळीवर व देशाबाहेर खेळत आहे. किंबहुना त्यामुळेच आज कोल्हापूरचे नाव भारतीय फुटबॉलच्या पटलावर आवर्जून घेतले जात आहे. म्हणूनच कोल्हापूरला सॉकर सिटी म्हणतात हे सहज समजून येण्यासारखे आहे.

प्रा.डॉ. अभिजित वणिरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news