क्रीडा : धोनी मेंटॉर होण्याचा अन्वयार्थ

क्रीडा : धोनी मेंटॉर होण्याचा अन्वयार्थ
क्रीडा : धोनी मेंटॉर होण्याचा अन्वयार्थ
Published on
Updated on

अनिरुद्ध संकपाळ

बीसीसीआयने यूएईमध्ये होणार्‍या टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय संघाशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो.

ज्यावेळी धोनी टीम इंडियाचा मेंटॉर होणार अशी घोषणा झाली, त्यावेळी धोनी चाहत्यांनी सोशल मीडियावर दिवाळीच साजरी केली. कारण धोनी आहेच तितका खास. दोन वर्ल्ड कप नावावर असलेल्या कर्णधाराचा अनुभवही तितकाच दांडगा असणार. त्याचबरोबर त्याचे तीन आयपीएल टायटलही विसरून चालणार नाहीत.

शास्त्री सक्षम नाहीत?

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री जुलै 2017 पासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांना ज्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक केले त्यावेळी अनिल कुंबळे यांच्यापेक्षा वर्षाला तब्बल दीड कोटी मानधन वाढ करून देण्यात आली होती. बीसीसीआय त्यांच्यावर वर्षाला 8 कोटी रुपये खर्च करते. विशेष म्हणजे बीसीसीआयने ऑगस्ट 2019 ते 2021 चा टी 20 वर्ल्ड कप होईपर्यंत पुन्हा त्यांची नियुक्त केली. त्यांना पुन्हा नियुक्ती मिळाली म्हणजे त्यांचे काम चांगलेच असणार असे आपण गृहीत धरू. मग असे असताना पुन्हा मेंटॉर म्हणून एम. एस. धोनीची का नियुक्ती झाली? शास्त्री संघाला आपल्या अनुभवाच्या जोरावर मार्गदर्शन करण्यास सक्षम नाहीत का? जर असतील तर मग धोनीची नेमणूक करण्याची गरजच काय?

आता धोनीची नियुक्ती झाली आहे म्हटल्यावर बीसीसीआयला शास्त्रींच्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास नाही असा संदेश जातो. मग कोणाच्या हट्टापाई शास्त्रींना एकदा एक्स्टेंशन आणि टी 20 वर्ल्ड कप पर्यंत पुन्हा नियुक्ती देण्यात आली? हे सर्व प्रश्न धोनीच्या नियुक्तीनंतर शास्त्रींच्या बाबतीत उपस्थित होत आहेत.

विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

एम. एस. धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला मला आता निवृत्त समजा, असे म्हणत इन्स्टाग्रामवरून भारतीय संघाचा निरोप घेतला होता. धोनी निवृत्त झाला त्यावेळी त्यावेळी त्याच्याकडे संघाचे नेतृत्व नव्हते. त्याने एकदिवसीय आणि टी 20 मधील नेतृत्व 2017 मध्येच विराट कोहलीकडे सोपवले होते. त्यावेळी विराटकडे संघाचा नेता म्हणून 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी संघ तयार करण्यासाठी दोन वर्षे होती. विराटने संघाचे नेतृत्व हातातही घेतले. मात्र त्यावेळी संघात एम. एस. धोनी त्याचा मार्गदर्शक म्हणून उपस्थित होता.

त्यामुळे विराटच्या नेतृत्वावर धोनीचा प्रभाव असणे साहजिकच आहे. मात्र ज्यावेळी धोनीने 2019 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर संघाची ड्रेसिंग रूम सोडली, त्यानंतर विराटच्या नेतृत्वाची खरी कसोटी सुरू झाली. दरम्यान, आयपीएलमध्ये रोहित शर्मा आपल्या नेतृत्वाचे दमदार दाखले देत होता. त्याने आयपीएल टायटल जिंकण्यामध्ये धोनीलाही मात दिली होती. या शर्यतीत विराट कुठेच दिसत नव्हता. काही कालावधीनंतर विराटच्या नेतृत्व करण्याच्या शैलीवर, त्याच्या संघ निवडीवर टीका होऊ लागली. त्यातच कसोटीत त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका प्रमुख खेळाडू नसताना जिंकून दाखवली.

त्यामुळे तिन्ही प्रकारच्या संघाचे कर्णधार वेगवेगळे असावे अशी चर्चा सुरू झाली. आणि आता टी 20 वर्ल्ड कपसाठी मेंटॉर म्हणून धोनीला अचानक पाचारण करण्यात आले. याचा अजून एक अर्थ निघतो की, विराट कोहली टॅक्टिकल गेम प्लॅनमध्ये कमी पडतो. त्यामुळेच ही कमतरता पूर्ण करण्यासाठी धोनीला बोलावण्यात आले आहे. संघ निवडीबाबतही विराटने इतिहासात अनेक चुका केल्या आहेत. ते पाहता टी 20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत याचा फटका बसू नये म्हणून धोनीला संघासोबत राहण्याची विनंती केली की काय, अशी शंका मनात येते.

धोनीच्या आडून रोहितवर निशाना

टी 20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी आयपीएल होणार आहे. त्याआधीही सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत भारताकडून सर्वात चांगली फलंदाजी करत आहे तो रोहित शर्मा. त्याने चौथ्या कसोटी सामन्यात 127 धावांची खेळी करून कसोटी संघातले आपले स्थान अढळ केले. रोहित एकदिवसीय आणि टी 20 प्रकारात संघाचा उपकर्णधार आहे. आता त्याने कसोटी संघातील आपले स्थान बळकट केल्याने त्याचे संघातील महत्त्व वाढले आहे. याचा थेट अर्थ रोहितने आता विराट कोहलीच्या नेतृत्वाला धोका निर्माण केला आहे. रोहितने आयपीएल आणि संधी मिळेल त्यावेळी टीम इंडियाचे यशस्वी नेतृत्व करून आपले नेतृत्वगुण सिद्ध करून दाखवले आहेत.

रोहितच्या नावावर पाच आयपीएल टायटल आहेत. याचबरोबर त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कप जिंकला होता. मात्र विराट कोहली वेळोवेळी नेतृत्वाच्या बाबतीत कमी पडतो हे जाणवत आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवेळी त्याची सदोष संघनिवड प्रकर्षाने जाणवली. आता आयपीएल आणि पुढे टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट आणि रोहितच्या नेतृत्वाची थेट तुलना होणार हे नक्की आहे. मात्र आता मेंटॉर म्हणून धोनी संघासोबत आल्याने रोहित – विराटच्या थेट तुलनेची धारच कमी झाली आहे.

चर्चा विराटच्या पायउतार होण्याची

ज्यावेळी धोनी टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मेंटॉर होणार असे घोषित करण्यात आले, त्यानंतर काही दिवसांमध्येच भारतातील एका इंग्रजी वृत्तपत्रात वर्ल्ड कपनंतर विराट कोहली स्वतःच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील टीम इंडियाचे नेतृत्व सोडणार असल्याचा दावा करण्यात आला.

विराट कोहली आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नेतृत्वाचा भार रोहित शर्माच्या खांद्यावर टाकणार असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले होते. याबाबत दोघांची चर्चाही झाली असल्याचा दावा करण्यात आला. मात्र जसजशी या बातमीची ऐन वर्ल्ड कपच्या तोंडावर चर्चा रंगू लागली, तशी बीसीसीआयने यात उडी घेतली.

बीसीसीआयच्या एक पदाधिकार्‍याने दोन फॉरमॅटसाठी दोन कर्णधार, अशी कोणतीही चर्चा बीसीसीआयमध्ये झालेली नाही. हे सगळे माध्यमांचे 'खयाली पुलाव' असल्याचे सांगितले. दरम्यान, ज्या जय शहा यांनी धोनीला टीम इंडियाचा मेंटॉर केल्याची घोषणा केली होती, त्या जय शहा यांनीच माध्यमांना जोपर्यंत संघ चांगला खेळत आहे तोपर्यंत नेतृत्वबदलाचा प्रश्नच येत नाही असे सांगितले.

जय शहा यांच्या वक्तव्याचा गांभीर्याने विचार केला तर ते जर-तरची भाषा बोलत आहेत. म्हणजेच बीसीसीआयमध्ये विराटच्या नेतृत्वावर विशेष करून वन डे, टी 20 मधील नेतृत्वावर चर्चा झाली असल्याची दाट शक्याता वाटते. जर सगळेच आलबेल असते तर मग धोनीला अचानकपणे मेंटॉर म्हणून का आणण्यात आले? विराट कोहलीवर त्याच्या फलंदाजीवरून किंवा फॉर्मवरून फारशी टीका होत नाही. याला इंग्लंड दौर्‍यावरील कसोटी मालिका अपवाद आहे. मात्र विराटच्या नेतृत्वाची कायम चर्चा असते.

विराटचे नेतृत्व वादातीत आहे असे नाही. मात्र भारतीय क्रिकेट रसिक फार हुशार आहेत. ते 'दूध का दूध आणि पानी का पानी' करतातच. त्यामुळे जरी धोनीच्या छत्रछायेखाली टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली तरी ही कामगिरी विराटच्या खात्यात जमा करण्यास प्रेक्षक आणि जाणकारही नकार देतील. या उलट चांगल्या कामगिरीचे सगळे श्रेय धोनीलाच जाणार यात शंका नाही. कारण धोनीची जनमानसातील क्रेझ अजूनही तशीच कायम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news