कौशल्यवृद्धीकडे कल; तरुणाईस मिळतेय पाठबळ

कौशल्यवृद्धीकडे कल; तरुणाईस मिळतेय पाठबळ
Published on
Updated on

कोल्हापूर : प्रवीण मस्के : शिवाजी विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राकडे आतापर्यंत 250 तरुण व नवसंशोधकांनी स्टार्टअपची प्राथमिक नोंदणी केली आहे. दहा उत्कृष्ट स्टार्टअप्सना मान्यता दिली असून त्यांना मार्गदर्शनाबरोबरच अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.

शिवाजी विद्यापीठात 2018 रोजी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र स्थापन झाले. पश्चिम महाराष्ट्र स्टार्टअपचे हब होण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस केंद्राचे संचालक प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांनी व्यक्त केला.

दीपक पवार हे सध्या उद्यमनगरमध्ये वेल्डर म्हणून काम करीत आहेत. त्यांनी स्टार्टअप अंतर्गत कणिक मळणी यंत्र तयार केले आहे. सध्या घरी, वसतिगृह, रेस्टॉरंटमध्ये गव्हाचे पीठ हाताने मळून गव्हाचे रोटे बनवले जातात. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. याचा विचार करूनच कणिक मळणी यंत्र तयार केले. पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे हे यंत्र विकसित करू शकलो. कमीत कमी ते जास्तीत जास्त कोणत्याही प्रमाणात पीठ मळून घेते. मेहनत आणि वेळ वाचते, असे पवार म्हणाले.

मुग्धा सावंत ही विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी विभागातील फूड सायन्सची विद्यार्थिनी आहे. तिने 'डिकॅफ : कॅफ्फेईन फ्री कॉफी' पर्याय तयार केला आहे. डिकॅफ हा कॉफी सारखा समान चव देणारे उत्पादन आहे. कॉफी बीन्स न वापरता त्यामध्ये समान चव विकसित केली आहे. हा पदार्थ प्रोटीन व कॅल्शियम जास्त प्रमाणात देतो. जास्त प्रमाणात कॉफी घेतल्यामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता हे उत्पादन बनवले आहे. काही आजारासाठी कॅफेन असणारे पदार्थ टाळावे लागतात, अशा समस्यांसाठी हे उत्पादन तयार केले आहे. जे कमीत कमी किमतीत स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे, असल्याचे मुग्धाने सांगितले.

पारंपरिक ऊस लागवड खूप कष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. ही गोष्ट विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी संग्राम पाटील याने ऊस लागवड यंत्र तयार केले आहे. ऊस लागवड व तोड, मजुरीचा खर्च वाढत असून शेतकर्‍यांना मजूर वेळेवर मिळत नाहीत. हे रोटरी मेकॅनिझमवर काम केलेले ट्रॅक्टर चालविणारे मशिन आहे. हे ड्रम व रोटरी डिस्कद्वारे बांधले जाते. शेतकर्‍यांच्या गरजेनुसार दोन ओळी, दोन छडीमधील वेगळे अंतर समायोजित करण्यासाठी उपयोगी असल्याचे संग्राम यांनी सांगितले.

पैलवान थंडाईस अमृत म्हणतात. पारंपरिक थंडाई बनवण्याची प्रक्रिया कठीण, वेळखाऊ आहे. त्यामुळे लोक घरी थंडाई बनवण्याचे टाळतात. आज रेडी टू ड्रिंक कॅटेगरीत अनोखी थंडाई सुरू करण्याचा विचार कोणी केला नव्हता. हा विचार करून शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी धनंजय वडेरने 'बदाम थंडाई' तयार केली आहे. हे पेय हार्मोन्स संतुलित स्थितीत पुनर्संचयित करते. ते बद्धकोष्ठता नियंत्रित करते, पचनक्रिया सुधारते, असे वडेर म्हणाले.

अस्थमा व फुफ्फुसाच्या आजाराच्या रुग्णांना नियमितपणे नेब्युलायझरची आवश्यकता भासते. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वस्त दर व रुग्णांची गरज हे मुद्दे लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी दिग्विजय आजरेकरने 'अल्ट्रा नेब्युलायझर' बनविले आहे. अल्ट्रा नेब्युलायझर विकसित केले असून नवीन जाळी तंत्रज्ञानाशी जुळवून घेते. मोबाईल फोन, पॉवर बँक, लॅपटॉप, कार चार्जर आदींसह 5 ते 12 व्ही मधील कोणत्याही यूएसबी पुरवठ्यासह वापरता येते. असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news