संग्रहित
संग्रहित

जागतिक क्षयरोग दिन : कोव्हिडनंतर वाढला क्षयाचा धोका

Published on

क्षयरोग म्हणजे ट्यूबरक्यूलोसिस.( टीबी) या आजाराला पृथ्वीतलावरून नाहीसे करण्यासाठी, गेल्या एकशे चाळीस वर्षांपासून माणसाने जंगजंग पछाडले आहे, पण आजपर्यंत त्यामध्ये त्याला यश आले नाही. 24 मार्च 1882 या दिवशी 'रॉबर्ट कॉक' नावाच्या शास्त्रज्ञाने क्षयाच्या जंतूचा शोध लावला. त्याप्रीत्यर्थ 24 मार्च हा दिवस 'जागतिक क्षयरोग दिन' म्हणून पाळला जातो.

दरवर्षी क्षयरोगाच्या निर्मूलन – उच्चाटनासाठी जगभर प्रयत्न केले जातात. पण, गेल्या दोन वर्षांत कोव्हिडने जगभर थैमान घातल्याने, संपूर्ण समाजाचेच स्वास्थ्य बिघडून गेले आहे. आधीपासून निरोगी असणार्‍या व्यक्‍तींना कोव्हिडने गाठले, पण त्याबरोबरच कोव्हिडमध्ये अनेक आजारांचे गणित बिघडले. त्यात क्षयरोगाचा पहिला नंबर लागतो.

गेल्या दोन वर्षांत क्षयरोगाचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. गेल्या दशकभरात जगभरात क्षयरुग्णांची संख्या दरवर्षी कमी होत आहे, पण गेल्यावर्षी कोव्हिडमुळे ती पहिल्यांदाच वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. कोव्हिड काळात सार्‍या जगाचे आणि अर्थातच वैद्यकीय यंत्रणांचे लक्ष कोव्हिडवर केंद्रित झाल्यामुळे इतर आजारांकडे काहीसे दुर्लक्ष झाले. समाजातील – विशेषत: तळागाळातील क्षयरुग्णांची शोधमोहीम काहीशी थंडावली आणि क्षयरुग्णांवरील उपचारात शिथिलता आली. त्याचाच परिणाम क्षयरुग्णांची संख्या वाढण्यात झाला.

पंधरा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये क्षयरोग निदान आणि उपचार यामध्ये जवळपास 90 देशांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा खूपच दरी पडल्याचे दिसून आले आहे. अशा मुलांपैकी निम्म्याहून अधिक मुले उपचारापासून वंचित राहिल्याचे आढळून आले आहे. याचा परिणाम अर्थातच क्षयरुग्णांची संख्या वाढण्यात झाला आहे.

सामाजिक – आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्‍ती, ज्यांना आधीपासूनच क्षयरोगाचा धोका होता, त्यांच्यामध्ये कोव्हिडमुळे हा धोका अधिकच वाढला.

मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे क्षयरोग (टी.बी.) उद्भवतो. शरीरात कुठेही होणारा हा आजार मुख्यत्वेकरून फुप्फुसांमध्ये आढळतो. उघड्यावर शिंकणे, खोकणे, थुंकणे, मोठ्याने बोलणे – गाणे इत्यादी क्रियांमधून क्षयाचे जंतू क्षयरुग्णांकडून निरोगी व्यक्‍तींमध्ये पसरतात आणि क्षयरोगाचा संसर्ग होतो.

क्षयरोगाचा संसर्ग आणि क्षयरोगाचा आजार या दोन गोष्टी काहींशा भिन्‍न आहेत. जेव्हा क्षयाचा जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतो, तेव्हा शरीरात क्षयजंतूंची वाढ होते, पण त्याचे रूपांतर प्रत्यक्ष आजारात होत नाही. अशा रुग्णांमध्ये क्षयाची लक्षणे दिसून येत नाहीत. या स्थितीला अव्यक्‍त क्षयरोग (Latent Tuberculosis) असे म्हणतात. अशा व्यक्‍तींपैकी जवळपास दहा टक्के व्यक्‍तींना भविष्यात क्षयरोग होतो. कोव्हिड संसर्गामुळे अशा अव्यक्‍त क्षयरुग्णांमध्ये क्षयरोग झपाट्याने वाढत चालल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत अधिक सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे ठरते.

जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षीचे घोषवाक्य आहे, 'Invest to end TB. Save lives.' क्षयरोग संपवण्यासाठी गुंतवणूक करा, आयुष्ये वाचवा. अर्थात… क्षयरोग मुक्‍तीसाठी झटा. आयुष्ये वाचवा. आरोग्य यंत्रणेमधील अधिकाधिक गुंतवणूक क्षयाच्या निदानासाठी आणि उपचारासाठी व्यतित केली तर, क्षयरोगावर वेगाने मात करता येईल.' असा या घोषवाक्याचा संदेश आहे.

ज्यांना तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला आहे, संध्याकाळचा ताप येतो, रात्रीचा घाम येतो, भूक लागत नाही, वजन कमी झाले आहे, थोड्याशा श्रमाने धाप लागते, खोकल्यातून रक्‍त पडते… अशा सर्व व्यक्‍तींनी आपली आरोग्यतपासणी करून घ्यावी आणि तो क्षयरोग तर नाही ना, याची खातरजमा करून घ्यावी.

ज्यांना ज्यांना कोव्हिडचा संसर्ग झाला होता… मग तो डेल्टा व्हेरियंट असो किंवा ओमायक्रॉन असो, जर पोस्टकोव्हिड कालावधीमध्ये श्‍वसनाच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी विनाविलंब डॉक्टरांकडे जावे आणि पोस्टकोव्हिड तक्रारी कशामुळे आहेत, याची तपासणी करून त्यानुसार उपचार घ्यावेत.

क्षयरोगाचे निदान करण्यासाठी रुग्णाची थुंकी तपासणी, रक्‍त तपासणी, छातीचा एक्स-रे, लसिका ग्रंथी वाढली असेल तर त्याची एफ. एन. ए. सी. किंवा बायोप्सी चाचणी करून क्षयरोगाचे निदान करता येते. जर थुंकीत क्षयाचे जंतू सापडले नाहीत तर, फायबर ऑप्टिक ब्राँकोस्कोपी नावाची एंडोस्कोपी करून श्‍वासनलिकेतील स्राव तपासून त्यानुसार क्षयरोगाचे निदान करता येते.

क्षयरोग हा रुग्णसंख्येनुसार जगातील नंबर एकचा संसर्गजन्य रोग आहे, पण त्यावर मात करता येते. क्षयरोगावर उपचार आहेत. क्षयरोग बरा होतो. जर एखाद्या रुग्णाने नियमित औषधोपचार घेतला नाही किंवा औषधोपचार घेण्यात टाळाटाळ केली तर, कालांतराने क्षयाचे जंतू औषधोपचाराला दाद देत नाहीत. अशा प्रकारच्या क्षयरोगाला एमडीआर टीबी किंवा एक्सडीआर टीबी असे संबोधतात. एमडीआर किंवा एक्सडीआर टीबी असलेला रुग्ण दरवर्षी नवीन पंधरा लोकांना क्षयाचा प्रसाद देतो आणि तो अशाच प्रकारचा गंभीर क्षयरोगअसू शकतो. ही बाब सार्वजनिक आरोग्याच्या द‍ृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

क्षयरोगाचा प्रसार थांबवता येतो, पण त्यासाठी अशा रुग्णांचे त्वरित निदान करून, उत्तम औषधोपचार देऊन त्यांना रोगमुक्‍त करणे आणि त्यांच्यापासून समाजात पसरणारा क्षयरोग थांबवणे, हे महत्त्वाचे पाऊल ठरते. यासाठी शासकीय पातळीवर असे प्रयत्न जसे महत्त्वाचे आहेत, तसेच सर्वसामान्य व्यक्‍तींनी क्षयरोगाबद्दल माहिती करून घेऊन व्यक्‍तिगत आणि सार्वजनिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

उघड्यावर शिंकणे, कुठेही उघड्यावर थुंकणे, क्षयरोगावरील औषधोपचारात टाळाटाळ करणे आणि एकंदर आरोग्याकडे दुर्लक्ष करणे अशा विविध कारणांमुळे क्षयरोग वाढत जातो. काळ पुढे सरकतो आहे. क्षयरोगाचे रुग्ण वाढतच आहेत. क्षयरोग थांबवण्यासाठी सर्वच पातळ्यांवर पावले उचलण्याची गरज आहे. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने आपण एवढे जरी समजावून घेतले तरी, आजचा क्षयरोग दिन आपण साजरा केला असे नक्‍की म्हणता येईल.

डॉ. अनिल मडके

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news