कोवळी तरुणाई गुन्हेगारी च्या विळख्यात!

कोवळी तरुणाई गुन्हेगारी च्या विळख्यात!

अजून ओठावर मिसरूडही फुटलं नाही अन् म्हणतो, मी चौकातला दादा, डॉन… शिक्षणाचा गंध नाही… कष्टाची जाणीव नाही. पाच पैशाची कमाई नसतानाही गड्याचा काय तो रुबाब… गळ्यात सोन्याचा गोफ, बोटात लखलखणार्‍या अंगठ्या… दिमतीला आलिशान मोटारी… धंदा काय तर खंडणी वसुली… दिवस सरला की, दारूच्या बाटल्या, सिगारेटचा धूर आणि अमली पदार्थांचा जलवा… शहर, जिल्ह्यात भीषण आणि मनाची घालमेल वाढविणारे चित्र… सतरा ते पंचवीस वयोगटातील शेकडो कोवळी मुले आज गंभीर गुन्ह्यात रेकॉर्डवर येऊ लागली आहेत. गुन्हेगारीच्या विळख्यात सापडू लागली आहेत.

लॉकडाऊनमुळे दीड वर्ष सारेच शांत होते. रोजगार गेल्याने मिळकत थांबली, पोटापाण्यासह इतर खर्च थांबला. सायंकाळला घसा कोरडाच राहू लागला. अडचणीच्या काळात सराईत गुंडांसह काळेधंदेवाले भेटले. सकाळ-सायंकाळला त्यांच्याकडून रतीबच लागले. दारूच काय, मटणाच्या पार्ट्या… सोबत गांजा, चरससह नशेल्या पदार्थांचाही मुबलक पुरवठा होऊ लागला. व्यसनाच्या आहारी गेलेली गोरगरीब घराण्यातली तरुण मुले गुन्हेगारी टोळ्यांत सक्रिय होऊ लागली आहेत.

मिसरूड फुटण्यापूर्वीच दहशत!

कुख्यात गुंड आणि दोनवेळा 'मोका'अंतर्गत कारवाई झालेल्या आदर्श जर्मनी टोळीने कोवळ्या वयात गुंडांच्या बळावर खूनसत्र वाढविले. मिसरूड फुटण्यापूर्वीच त्याने टोळीची दहशत वाढविली. शहरासह इचलकरंजी, शहापूर परिसरातील अनेक कोवळी मुले सक्रिय झाली आहेत. खंडणी, लूटमारी, दरोड्यांसह खुनाच्या गंभीर गुन्ह्यांतही त्यांचा सहभाग निष्पन्न होऊ लागला आहे.

18 वर्षांखालील 205 मुले कोठडीत

अलीकडच्या काळात शहर, जिल्ह्यात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने 2019 ते सप्टेंबर 2021 या काळात तब्बल 205 संशयितांची बालसुधारगृहात रवानगी झाली आहे. शिवाय, कळंबा कारागृहात 1,700 वर बंदिस्त कैद्यांपैकी 18 ते 25 वयोगटातील 350 वर कैद्यांचा समावेश आहे. गंभीर गुन्ह्यातील तरुणाईचा वाढता टक्का धक्कादायक ठरत आहे.

अल्पवयीन मुलाने थंड डोक्याने केली बापाची हत्या

समाजात फोफावणार्‍या बालगुन्हेगारीसंदर्भात समाजात चिंतेचे सावट असतानाच औरंगाबाद येथे अल्पवयीन मुलानेच प्राध्यापक असलेल्या पित्याची थंड डोक्याने हत्या केल्याचे उघडकीला आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह कुटुंबीयही हादरले आहेत. प्रा. डॉ. राजन शिंदे हे मौलाना आझाद कॉलेजच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख होते. मोबाईलमध्ये बेवसीरिज पाहण्यात गुंग असलेल्या मुलाला शहाणपणाचा सल्ला दिला खरा; पण काळ बनून आलेल्या मुलानेच प्राध्यापक बापाची हत्या केली.

बालगुन्हेगारांनी केला खेळ खल्लास…

इचलकरंजी येथील संतोष जाधव यांची दोन दिवसांपूर्वी भरचौकात हत्या झाली. चौकशीत निष्पन्न संशयित 21 ते 23 वयोगटातील आहेत. त्यात दोन तरुण 18 वर्षांखालील आहेत. याच बालगुन्हेगारांनी रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या जाधव यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना खल्लास केल्याचे उघड झाले आहे. ज्या वयात आयुष्याची दिशा ठरवायची, त्याच वयात हे क्रूरकर्म… शहर, जिल्ह्यात वर्षभरात घडलेल्या अनेक गुन्ह्यांत बालगुन्हेगारांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

गुंडांकडून कोवळ्या मुलांचा चलाखीने वापर

18 वर्षांखालील बालगुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद नसल्यामुळे संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून कोवळ्या मुलांचा चलाखीने वापर करून घेतला जातो. यापूर्वी बालगुन्हेगारांचा पाकीटमारी, चोरी, घरफोडीसाठी वापर केला जात होता. सध्या मात्र मोठमोठ्या रकमांच्या सुपार्‍या घेऊन खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांत मुलांचा वापर करण्याचा फंडा गुन्हेगारी जगतात चालविला जात आहे. पोलिसांच्या चौकशीत बालगुन्हेगारांची नावे चव्हाट्यावर येतात. मात्र, खरे गुन्हेगार पडद्याआड राहतात. राजकीय आश्रय आणि चिरीमिरीच्या जोरावर कारवाईपासून लांब राहतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news