कोल्हापूर, आशिष शिंदे : बदलत्या हवामानामुळे वातावरणात कमालीचे बदल पाहायला मिळत आहेत. कोल्हापूरचा पारा 34 अंशांवर गेल्याने कमालीचा उकाडा जाणवत आहे. दुपारी रखरखते ऊन आणि सायंकाळी व पहाटेनंतर बोचरी थंडी, यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून कमाल तापमानात वाढच होत असल्याने दुपारी थंडावा मिळण्यासाठी नागरिक रस्त्यावरील हलक्या प्रतीची थंडपेये पीत आहेत. वातावरणातील या दुहेरी बदलांमुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
गेल्या आठवडाभरापासून वातावरणात सुरू असलेल्या बदलांमुळे ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी यासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. याशिवाय दिवसभर उन्हामध्ये फिरल्यामुळे आणि कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील क्षारांचे आणि पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेनसारख्या समस्यादेखील काहींना जाणवत आहेत.
आणखी चार दिवस जाणवणार उकाडा
आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. मंगळवारी कमाल तापमानात 1 अंशाने वाढ होऊन पारा 33.6 अंशांवर गेला होता; तर किमान तापमानातही 2 अंशांची वाढ होऊन पारा 17.8 अंशांवर स्थिरावला होता. निरभ्र आकाश आणि वाढते तापमान, यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत आहे. पुढील चार दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
लहान मुलांमध्ये सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले
रखरखते ऊन, बोचरी थंडी आणि वायू प्रदूषणाचा वाढता स्तर, याचा फटका लहान मुलांना व वयोवृद्धांना बसत आहे. यामुळे लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, छाती भरण्याचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.