कोल्हापूरचा रेडीरेकनर ६.४५ टक्क्यांनी वाढला

कोल्हापूरचा रेडीरेकनर ६.४५ टक्क्यांनी वाढला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात रेडीरेकनरमध्ये (वार्षिक बाजारमूल्य दर तक्ता) यावर्षी 6.45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवार (दि. 1) पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यात सरासरी 5.77 टक्के वाढ केली असून, ग्रामीण भागात सर्वाधिक 6.96 टक्क्यांनी रेडीरेकनर वाढवण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची घर खरेदी महागणार आहे. कोल्हापूर शहरात फ्लॅटच्या किमतीत सरासरी दोन ते पाच लाखांपर्यंत वाढ होणार आहे. जिल्ह्यातील शेतजमिनीही महागणार आहेत.

राज्य शासनाने 2017-18 साली रेडीरेकनर जाहीर केला होता. त्यानंतर सलग दोन वर्षे कोरोनामुळे 2018-19 व 2019-20 मध्ये 2017-18 या वर्षातील दर कायम ठेवले होते. कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांचा विचार करून 2020-21 साठीसाठीही वार्षिक दर मूल्य तक्ता कायम ठेवला होता.

दरम्यान, 12 सप्टेंबर 2020 रोजी नोंदणी विभागाने 2021-22 सालाचे दर तक्ते प्रसिद्ध केले. मात्र, त्यालाही राज्य शासनाने स्थगिती दिली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाने 2022-23 या वर्षाकरिता बार्षिक बाजार मूल्य दर तक्ता गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार कोल्हापूर महापालिका क्षेत्रात 6.45 टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील मिळकतींचे भाव वाढणार आहेत. कोल्हापूर महापालिका हद्दीतील वन-बीएचके फ्लॅटसाठी सरासरी एक ते दीड लाखापर्यंत, टू-बीएचके प्लॅट सरासरी दोन ते चार आणि थ—ी-बीएचके प्लॅटच्या दरात सरासरी 5 लाखांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील 14 नगरपालिका व नगरपंचायती आहेत. या क्षेत्रात 3.62 टक्के इतकी वाढ केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक 6.96 टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतजमिनींचे भाव वाढणार आहेत. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागाला प्रभाव क्षेत्र म्हणून घोषित केले जाते, कोल्हापूर जिल्ह्यातील अशा प्रभाव क्षेत्रासाठी सरासरी 3.90 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.

कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील वाढ स्पष्ट करण्यात आली असली, तरी जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्र आणि प्रभाव क्षेत्रात प्रत्यक्ष किती वाढ झाली, त्यानुसार वेेगवेगळ्या ठिकाणी रेडीरेकनरचे नेमके दर किती असतील, हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news