कोल्हापूर : सोन्याच्या दागिन्यांसाठी आता 6 अंकी हॉलमार्क!

कोल्हापूर : सोन्याच्या दागिन्यांसाठी आता 6 अंकी हॉलमार्क!

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : सोन्याच्या आणि सोनेजडित अलंकारांच्या दर्जामध्ये होणारी फसवणूक थांबविण्यासाठी केंद्र सरकारने संबंधित दागिन्यांच्या विक्रीसाठी सहा अंकी कोड असलेला हॉलमार्क बंधनकारक केला आहे. 1 एप्रिलपासून असा हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील संपूर्ण सराफी आणि जडजवाहिरांच्या बाजारपेठेतील व्यापारीवर्गाला त्याद़ृष्टीने सज्ज राहावे लागेल.

कारण, या नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने देशभरात पथकांची नियुक्ती केली असून कायद्याचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 3 मार्च रोजी भारतीय मानके संस्थेची (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्) एक बैठक झाली. यात सोन्याचे दागदागिने आणि जडजवाहीरयुक्त सोन्याच्या कलाकृती यांच्या विक्रीमधील दर्जाचा आढावा घेण्यात आला. यानंतर या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल. केंद्रीय अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या वतीने याविषयी एक अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून देशातील ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांकडूनही दर्जाचे पालन केले जाईल, याची खातरजमा केली जाणार आहे.

सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्कची सक्ती करणारा विषय यापूर्वीही चर्चेत आला होता. केंद्राने असा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील सराफ व्यावसायिकांनी हॉलमार्कविषयीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याकडे लक्ष वेधत त्याला विरोध केला होता. यानंतर केंद्राने पायाभूत सुविधांसाठी कृती आराखडा तयार केला. त्याच्या परवान्यावर 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा निर्णयही घेतला होता. उत्तरपूर्व राज्यांत सुविधांच्या कमतरता लक्षात घेऊन नव्या सुविधा प्रस्थापित होण्यासाठी 10 टक्के अतिरिक्त सूट देण्यात आली.

यापूर्वी विक्री केल्या जाणार्‍या सोन्याच्या दागिन्यांवर 4 अंकी हॉलमार्क होता. आता 6 अंकी हॉलमार्कमुळे संबंधित दागिना कोठे तयार केला, कोणी विक्री केला, त्याचे वजन काय होते, याचा संपूर्ण तपशील आता कोणत्याही ठिकाणी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news