कोल्हापूर, सांगलीच्या पुराचे पाणी वळविणे, निमित्त की सोय?

कोल्हापूर, सांगलीच्या पुराचे पाणी वळविणे, निमित्त की सोय?

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : राज्य शासनाने कोल्हापूर, सांगलीत येणार्‍या महापुरापासून दोन जिल्ह्यांतील जनतेला दिलासा देण्यासाठी पाणी नाशिक, मराठवाड्याकडे वळविण्याचा एक प्रस्ताव तयार केला आहे. एक लाख कोटी रुपये खर्चाची ही योजना राबविताना राज्याच्या अर्थसंकल्पाला कोणताही धक्का लागणार नाही, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या योजनेमुळे कोल्हापूर, सांगलीचे पाणी कृष्णेतून यथावकाश वळविलेही जाईल.

परंतु, ही योजना राबवित असताना ज्या दोन जिल्ह्यांमध्ये पूर थैमान घालतो, त्या जिल्ह्यांतील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाटबंधारे प्रकल्पांची कालव्यासह कामे पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम निधीची तरतूद होणे आवश्यक आहे; अन्यथा पुराच्या नावाखाली दक्षिण महाराष्ट्राचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे वळवले जाईल आणि ज्यांनी कालव्यासह धरणांसाठी जमिनी दिल्या, कालव्याचे पाणी शिवारात उतरेल, याचे स्वप्न पाहात ज्या पिढ्या काळाच्या पडद्याआड गेल्या, त्यांना फसवण्याचा धोका अधिक आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पाणी मराठवाडा आणि उस्मानाबादपर्यंत वळविण्याचा हा विषय काही नवा नाही. त्याला समन्यायी पाणी योजनेच्या भूमिकेतून विरोधही असण्याचे कारण नाही. या योेजनेद्वारे एकदा पाण्याला वाट मोकळी झाली, की सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोसळणारे पाणी मराठवाडा काय, नाशिकपर्यंतही पोहोचेल, पण जिथे धरणे आहेत आणि कोरडवाहू वा जिरायत शेतीचे प्रमाण मोठे आहे, तेथे पाणी पाटाने पोहोचविण्यासाठी अनेक दशकांपूर्वी ज्या कालव्यांच्या योजना तयार केल्या गेल्या, त्या कालव्यातून पाणी केव्हा देणार, असा प्रश्न उपस्थित होतो.

तर दाहकता समजेल!

दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या दप्तरातील या विषयीच्या काही फायलींवरील धूळ झटकली, तर या विषयाची दाहकता समजून येईल. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या नावाखाली दक्षिण महाराष्ट्रातील पाणी कृष्णेतून निरा नदीत आणि तेथून पुढे उस्मानाबादपर्यंत पाणी नेण्याचा घाट घातला होता, तेव्हा सत्तेत खासदार मंडलिक यांनी विरोधात दंड थोपटले होते. कोेल्हापूरच्या अपुर्‍या पाटबंधारे प्रकल्पांना न्याय द्या आणि मग पाणी वळविण्याची योजना राबवा, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news